राजू शेट्टी यांची रेल्वेमंत्र्यांकडे चौकशीची मागणी

देशांतर्गत बाजारात रेल्वे व्ॉगनद्वारे कांदा पाठवण्यात नाशिक जिल्ह्यातील काही ठरावीक बडय़ा व्यापाऱ्यांची एकाधिकारशाही आहे. त्यास रेल्वेच्या अधिकाऱ्यांचे पाठबळ मिळत आहे. या संगनमतामुळे देशात मालाचा पुरवठा आणि किमतीवर नियंत्रण ठेवण्याची संधी संबंधित व्यापारी साधतात. कांद्याची कृत्रिम टंचाई निर्माण करण्यात रेल्वे अधिकारी व व्यापाऱ्यांचा सहभाग असल्याची तक्रार करीत या प्रकाराची सखोल चौकशी करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खा. राजू शेट्टी यांनी रेल्वेमंत्र्यांकडे केली आहे. तथापि, व्यापारी संघटनेने हे आक्षेप फेटाळले असून तक्रारदाराने वस्तुस्थिती समजावून घ्यावी आणि या प्रकरणाची खुली चौकशी करण्याचे आव्हान दिले आहे.

देशात सर्वाधिक कांद्याचे उत्पादन घेणारा जिल्हा म्हणून नाशिकची ओळख आहे. वर्षभरात कांदा दराची स्थिती दोलायमान आहे. निश्चलनीकरणापूर्वी नवीन लाल कांद्याचा १३०० रुपये क्विंटलवर असणारा भाव महिनाभरात निम्म्याने घसरला आहे. कांदा भावातील घसरणीने शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता असतानाच बाजारातील अनिष्ट प्रथांकडे खा. शेट्टी यांनी लक्ष वेधले आहे. कांद्याचे भाव कृत्रिमरीत्या वाढविणे आणि पाडणे यामागे व्यापाऱ्यांची खेळी कारणीभूत असल्याची तक्रार नेहमी केली जाते. भाववाढीमुळे सर्वसामान्य ग्राहक भरडला जातो. तशीच अवस्था भाव कोसळल्यावर शेतकऱ्याची होते. अनेकदा भाववाढीचा लाभ शेतकऱ्याला कमी आणि व्यापाऱ्यांना जास्त, अशी स्थिती असते. नाशिक जिल्ह्यातील कांदा बाजारावर काही विशिष्ट व्यापाऱ्यांचे वर्चस्व आहे. त्याचे उपव्यापारी इतर बाजार समित्यांमध्ये कार्यरत असल्याचे या क्षेत्रातील जाणकार नेहमी सांगतात. व्यापाऱ्यांच्या कार्यपद्धतीचा उलगडा शेट्टी यांनी रेल्वेमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात केला आहे.

मनमाड, येवला, नांदगाव, कुंदेवाडी व खेरवाडी या स्थानकातून रेल्वे व्ॉगनमधून कांदा देशातील वेगवेगळ्या भागांत पाठविला जातो. अनेक वर्षांपासून काही विशिष्ट व्यापाऱ्यांचा त्यावर प्रभाव आहे. रेल्वे अधिकाऱ्यांच्या सहकार्याशिवाय हे अशक्य आहे. दहा ते बारा व्यापारी आपला आर्थिक फायदा लक्षात घेऊन रेल्वे व्ॉगनमध्ये कांदा कधी भरायचा कधी पाठवायचा हे ठरवतात. त्यांना शेतकऱ्यांशी कोणतेही देणे-घेणे नाही. महाराष्ट्र शासनाने कृषिमाल नियमनमुक्त केल्यानंतर व्यापारीवर्गाने महिनाभर लिलाव बंद ठेवून शेतकरीवर्गाला कोंडीत पकडले. बडे व्यापारी आणि रेल्वे अधिकारी यांच्या संगनमताने चाललेला हा प्रकार धक्कादायक असून त्याची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी शेट्टी यांनी रेल्वेमंत्र्यांकडे केली आहे.

राजू शेट्टींनी आरोप केलेले कांदा व्यापारी

रेल्वेमंत्र्यांकडे केलेल्या तक्रारीत खा. राजू शेट्टी यांनी नाशिक जिल्ह्यातील बडय़ा कांदा व्यापाऱ्यांची नावे देऊन त्यांची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्यामध्ये सोहनलाल भंडारी, विजयकुमार बाफना, करसन ठक्कर, अतुल शहा, हिरालाल पगारिया, सुरेश पारख, इंदरसेठ चोपडा, रामेश्वर कलंत्री, अनिल करवा, रमेश करवा, जैन या नावांचा उल्लेख आहे. संबंधितांनी एकाधिकारशाही निर्माण केल्याचा आरोप शेट्टी यांनी केला. त्यावर सर्व व्यापाऱ्यांची बाजू संघटनेचे अध्यक्ष भंडारी यांनी मांडली आहे.

आरोपांमध्ये तथ्य नाही – व्यापारी संघटना

रेल्वे व्ॉगनची सुविधा सर्वासाठी खुली आहे. शेतकऱ्यांपासून ते व्यापाऱ्यांविरुद्ध तक्रार देणाऱ्या खासदारांपर्यंत कोणीही कांदा रेल्वेद्वारे इतर बाजारपेठेत पाठवू शकतो. शेतकरी बाजार समितीत माल विकतो. तो इतर राज्यात विक्री करण्यासाठी जात नाही. जिल्ह्यात जवळपास ५०० कांदा व्यापारी काम करतात. एका व्ॉगनमधून १६०० टन कांदा पाठवला जातो. हा माल सर्व व्यापाऱ्यांचा मिळून एकत्रित स्वरुपात असतो. यामुळे केवळ काही ठरावीक व्यापाऱ्यांचे या प्रक्रियेवर वर्चस्व आहे, असे म्हणणे योग्य नसल्याचे लासलगाव कांदा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सोहनलाल भंडारी यांनी सांगितले. व्यापाऱ्यांबद्दल जी तक्रार दिली गेली, तिची खुली चौकशी करावी. पाच रेल्वे स्थानकांवरून कांदा पाठवला जातो. प्रत्येक ठिकाणी एक व्यापारी समन्वयक एजंट म्हणून काम करतो. वेगवेगळ्या व्यापाऱ्यांकडून मालमोटारीतून आलेला माल उतरविणे, हमालांच्या मदतीने तो रेल्वेत भरणे, व्ॉगन सील करणे ही कामे समन्वयकाकडून केली जातात. तो समन्वयाची भूमिका पार पाडत असल्याने त्याचे नाव समोर येते. जिल्ह्यात कोणालाही रेल्वे व्ॉगनमधून आवश्यक ते निकष पूर्ण करून माल पाठवता येईल. जे हा व्यापार करीत नाही, त्यांनी वस्तुस्थिती जाणून घेण्याची गरज असल्याचे भंडारी यांनी सूचित केले.