राज्यपाल श्रीनिवास पाटील यांचा नाशिकमध्ये ‘एसकेएच संवाद’ शिबिरात विद्यार्थ्यांशी संवाद
स्त्रीला निसर्गत: सोशिकपणा व सहनशीलता दिल्याने ती सामथ्र्यशाली आहे. मात्र तिची सुरक्षितता हा आजही मोठी समस्या आहे. मुलींच्या सुरक्षिततेला सिक्कीममध्ये प्राधान्य दिले जात असून प्रत्येक नवजात बालिकेच्या जन्माचे स्वागत करण्यात येते. तिच्या जन्माबद्दल आनंद व्यक्त करत तिला मान दिला जातो. त्याचप्रमाणे सपकाळ नॉलेज हब परिसरात विद्यार्थ्यांनी सुरक्षिततेला प्राधान्य दिले जात असल्याचा आनंद वाटतो असे उद्गार सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी काढले.
अंजनेरी येथील कल्याणी चॅरिटेबल ट्रस्ट संचालित सपकाळ नॉलेज हबतर्फे सपकाळ महाविद्यालयात आयोजित ‘एसकेएच संवाद’ शिबिरात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. सपकाळ नॉलेज हबच्या विविध उपक्रमांविषयी त्यांनी समाधान व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची त्यांनी मिश्कील भाषेत उत्तरे दिली. आपल्या राजकीय प्रवासाविषयी बोलताना शरद पवार साहेब आणि आपण पोस्ट चिकटवण्याचे काम करत असे.
पवारांची उंची दोन इंचांनी जास्त असल्याने ते पोस्टर लावीत आणि मी खळ लावीत. त्यामुळे ३४ वर्षांनंतरही काहीही खळखळ न होता काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितल्यावर संपूर्ण एकच सभागृहात हशा पिकला.
संस्थेचे अध्यक्ष रवींद्र सपकाळ यांनी सिक्कीम राज्यात याच धर्तीवर एखादी संस्था उभारण्याचा मानस व्यक्त केला. तसेच सिक्कीम येथील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची ‘युथ एक्स्चेंज’अंतर्गत देवाणघेवाण करणे शक्य आहे, असा विचार त्यांनी मांडला.
या कार्यक्रमास रंजना पाटील, कल्याणी सपकाळ, विश्वास बँकेचे अध्यक्ष विश्वास ठाकूर आदी उपस्थित होते. या वेळी राज्यपालांच्या हस्ते महाविद्यालयाच्या रोहन देवरे व राजेश दीक्षित यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
सिक्कीममधील पर्यटनाविषयी उपलब्ध असलेल्या संधीची माहिती चित्रफितीतून यावेळी दाखवण्यात आली. अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विठ्ठल गोंड यांनी आभार मानले.

अंजनेरी येथील सपकाळ नॉलेज हबमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील. समवेत संस्थेचे प्रमुख रवींद्र सपकाळ, विश्वास ठाकूर आदी.