उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर गर्दी आवरण्याची जबाबदारी

नाशिक : करोनाच्या पार्श्वभूमीवरसध्या देशी दारू किंवा वाइन दुकानांमध्ये येणाऱ्या ग्राहकांना हात स्वच्छ करण्यासाठी खास सॅनिटायझरची व्यवस्था उपलब्ध आहे. उत्पादन शुल्क विभागाच्या सूचनेची विक्रेते अंमलबजावणी करीत आहेत. बंदीमुळे मॉल्स, चित्रपटगृह, पान-गुटख्याची दुकाने ओस पडली असताना देशी दारू, वाइन दुकानांसमोर गर्दी आहे. ही दुकाने कधीही बंद होतील, या धास्तीतून मद्यप्रेमी शक्य तितका साठा करण्यात मग्न आहेत. सॅनिटायझरकडे बघायला कोणालाही उसंत नाही. महत्त्वाची बाब म्हणजे, या दुकानांसमोर होणारी गर्दी रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागास अधिकारी-कर्मचारी तैनात करण्याची वेळ आली आहे.

आजवर निवडणूक काळात किंवा नववर्ष स्वागतावेळी मद्य विक्रीची दुकाने, परमिटरूम-बिअरबार ग्राहकांच्या गर्दीने ओसंडून वाहतांना अनेकदा दिसली आहेत. यामध्ये आता करोनाचे निमित्तही समाविष्ट झाल्याचे चित्र आहे. या आजाराला प्रतिबंध करण्यासाठी प्रशासनाने सार्वजनिक तसेच खासगी ठिकाणी गर्दी रोखण्यासाठी अनेक निर्णय घेतले. शाळा, महाविद्यालयांना सुटी दिली. चित्रपटगृह, मॉल (जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता), जलतरण तलाव, व्यायामशाळा, बगीचे, जॉगिंग ट्रॅक, मंगल कार्यालये, लॉन्स आदी बंद केले. सामाजिक, राजकीय, धार्मिक, क्रीडाविषयक कार्यक्रमांवर प्रतिबंध आणले. लग्न सोहळ्यातील गर्दी नियंत्रित केली. यामुळे सर्वत्र शुकशुकाट पसरला असताना मद्य विक्रीच्या दुकानांसमोर मात्र ग्राहकांच्या रांगा आहेत.

मद्य विक्रीची दुकाने कोणत्याही क्षणी बंद केली जातील, या धास्तीतून खरेदीला उधाण आले असून त्याचा त्रास या दुकानांच्या आसपासचे रहिवासी, रस्त्यावरून मार्गस्थ होणाऱ्या वाहनधारकांना सहन करावा लागत आहे. सायंकाळनंतर शहरातील बहुतांश मद्य विक्री दुकानांसमोर अक्षरश: जत्रा भरते. गर्दीमुळे रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत होते. मद्यप्रेमींना करोनापेक्षा मद्य खरेदी करता येणार नसल्याची अधिक भीती असल्याची संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. पाच ते सहा दिवसांत मद्य खरेदी वाढली. याबाबत उत्पादन शुल्क विभागाकडून मद्य विक्रीची दैनंदिन माहिती उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले.

प्रत्येक महिन्यात ही आकडेवारी उपलब्ध होते. जिल्ह्य़ात ‘परमिट रूम-बिअर बार’ आणि देशी दारू, वाइनची अशी सुमारे १२०० दुकाने आहेत. गर्दी मुख्यत्वे देशी दारू, वाइन दुकानांमध्ये होते. करोनाच्या पाश्र्वभूमीवर, तिथे सॅनिटायझर ठेवण्याची सूचना केली गेली आहे. मद्य विक्रीची दुकाने बंद करण्याबाबत शासन स्तरावरून कोणताही आदेश नाही. ही दुकाने बंद केल्यास अवैध मद्य विक्रीला चालना मिळते, असेही या विभागातील अधिकारी सांगतात. तूर्तास गर्दी रोखण्यासाठी प्रत्येक अधिकारी-कर्मचाऱ्यास प्रत्येकी सहा दुकानांवर लक्ष ठेवावे लागत आहे. परंतु, मद्य विक्री दुकानांसमोरील गर्दी हटत नसल्याची स्थानिकांची तक्रार आहे.

‘परमीट रूम आणि बिअर बार’मध्ये गर्दी होण्याचा प्रश्न नसतो. देशी दारू, वाइन शॉपवर गर्दी होत असते. जिल्ह्य़ात अशी सुमारे ३०० दुकाने आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे ५० अधिकारी-कर्मचाऱ्यांवर गर्दी होऊ न देण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. संबंधितांकडून दररोज सकाळी आणि सायंकाळनंतर दुकानांवर लक्ष दिले जाते. एखाद्या ठिकाणी प्रचंड गर्दी झाल्यास संबंधित दुकान बंद करण्याची सूचना करण्यात आली आहे.

मनोहर अनचुळे (अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग, नाशिक.)