अपघातप्रवण क्षेत्रांवरील धोके कमी करण्यासाठी कायमस्वरूपी उपाय

शहर, ग्रामीण भागातील रस्त्यांवर काही विशिष्ट ठिकाणी वारंवार होणाऱ्या अपघातांचा धोका संपुष्टात आणण्यासाठी रस्ता सुरक्षा समितीने जिल्ह्यत विविध मार्गावर सर्वेक्षणाअंती निश्चित केलेल्या १०७ ‘ब्लॅक स्पॉट’ अर्थात अपघातप्रवण क्षेत्रांवर तात्पुरत्या उपायांपाठोपाठ आता कायमस्वरूपी उपाय योजण्याची तयारी सुरू झाली आहे. यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी निधीची मोठय़ा प्रमाणात आवश्यकता असून त्यासाठीचा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर करण्यात आला आहे. यंत्रणा कार्यान्वित झाली तर काही वर्षांत नाशिक अपघात मुक्त होऊन येथील नागरिकांचा प्रवास सुखकर होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे.

दरवर्षी जिल्ह्यत वाहन अपघातांमध्ये शेकडो जणांना प्राण गमवावे लागतात. सुरक्षित वाहतुकीसाठी जनजागृती होत असली तरी नियमांचे पालन करण्याकडे दुर्लक्ष केले जाते. भरधाव वेग, पुढे जाण्यासाठीची चढाओढ, चालकाचे नियंत्रण सुटणे, धोकादायक वळण, रस्त्यावरील काही दोष, रस्ता ओलांडण्यासाठी आकलन न करता केलेली व्यवस्था अशी नानाविध कारणे अपघातांना नियंत्रण देणारी ठरतात. दिवसागणिक वाढणारे अपघात रोखण्यासाठी केंद्र सरकारच्या निर्देशानुसार रस्ता सुरक्षा समितीने मध्यंतरी जिल्ह्यातील सर्व मार्गावरील अपघात प्रवण क्षेत्र शोधण्याचे काम हाती घेतले होते. अनेक महिने चाललेल्या सर्वेक्षणातून जिल्ह्यात एकूण १०७ अपघातप्रवण क्षेत्र असल्याचे निष्पन्न झाले. त्यामध्ये राष्ट्रीय महामार्गावरील ४१, राज्य मार्गावरील ३५ आणि महामार्ग वगळता महापालिका, जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील रस्त्यांवर ३१ अपघातप्रवण क्षेत्राचा समावेश आहे. गंभीर बाब म्हणजे, या अपघातप्रवण क्षेत्रांवर गेल्या तीन वर्षांत पाच अपघात झाले आहेत. त्यामध्ये १० किंवा त्याहून अधिक जणांचा मृत्यू झाला. एखादा अपघात झाला की, तात्पुरते उपाय करून वेळ मारून नेण्याकडे शासकीय यंत्रणेचा कल असतो. त्यामुळे अशा ठिकाणी अपघात रोखण्यासाठी कायमस्वरूपी उपाय करण्यासाठी आजवर न झालेली  विचारप्रक्रिया या निमित्ताने सुरू झाली आहे.

पहिल्या टप्प्यात तातडीचे उपाय म्हणून संबंधित क्षेत्रात पट्टे मारणे, सूचना फलक बसविणे, रिफ्लेक्टर, बसविणे आदी तात्पुरते उपाययोजना तातडीने हाती घेण्यात आल्या. पुढील टप्प्यात कायमस्वरुपी उपायांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. सर्वेक्षणात प्रत्येक ब्लॅक स्पॉटवर अपघातांच्या कारणांचा अभ्यास केला गेला. काही ठिकाणी रस्ता ओलांडण्यासाठी महामार्गावर चुकीच्या ठिकाणी दुभाजकात ठेवलेली जागा तर काही ठिकाणी तीव्र वळणामुळे अपघात घडत आहेत. प्रत्येक क्षेत्रावरील कारणे लक्षात घेऊन उपाय निश्चित करण्यात आल्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळस्कर यांनी सांगितले.

जिल्ह्यतील ‘ब्लॅक स्पॉट’ची यादी आणि कायमस्वरूपी उपायांवर येणाऱ्या खर्चाचा अंदाज बांधून प्रस्ताव तयार करण्यात आला. हा प्रस्ताव नुकताच शासनाला सादर करण्यात आला आहे. शहरातही काही अपघात प्रवण क्षेत्र आहेत.

त्या परिसरातील अपघाताचे धोके कमी करण्यासाठी मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाण पूलाची लांबी विस्तारण्याची योजना हा त्याचाच एक भाग आहे. या मार्गावरील रासबिहारी शाळेलगतचा चौक, जत्रा हॉटेललगतचा चौक या ठिकाणी भुयारी मार्गाद्वारे स्थानिकांसाठी कायमस्वरूपी व्यवस्था करण्यात येणार असल्याचे कळस्कर यांनी सूचित केले.

‘ब्लॅक स्पॉट’ (अपघाती क्षेत्र) म्हणजे काय ?

एखाद्या रस्त्यावरील ५०० मीटरच्या पट्टय़ात तीन वर्षांत पाच अपघात झाले असतील आणि त्यामध्ये १० जणांचा मृत्यू झाला असल्यास ते अपघाती क्षेत्र अर्थात ‘ब्लॅक स्पॉट’ मानले जाते. ही ठिकाणे शोधण्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यांकडील अपघातांची माहिती घेण्यात आली. त्याआधारे अपघात नेमक्या कोणत्या ठिकाणी झाले, याची माहिती संकलित करण्यात आली. उपरोक्त निकषानुसार ब्लॅक स्पॉट निश्चित झाल्यानंतर त्या ठिकाणी ज्या यंत्रणेच्या अखत्यारीत तो मार्ग आहे, त्यांच्या समवेत संबंधित ठिकाणांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. अपघाताच्या कारणांचा शोध घेऊन तो धोका कमी करण्यासाठी त्या त्या ठिकाणी काय उपाय करण्याची गरज आहे, याचा प्रत्येक अपघात प्रवण क्षेत्रनिहाय स्वतंत्रपणे अभ्यास करण्यात आला आहे.

अपघातप्रवण क्षेत्राची स्थिती

  • एकूण अपघातप्रवण क्षेत्र – १०७
  • राष्ट्रीय महामार्ग – ४१
  • राज्य मार्ग – ३५
  • महामार्ग वगळता महापालिका, जिल्हा परिषदेचे रस्ते – ३१