पोलिसांकडून कोणतीही आक्रमक कारवाई होत नसल्याने शहर व परिसरात चोर आणि गुन्हेगार मोकाट सुटल्याचे चित्र दिसत असून घरफोडी, लूटमार, सोनसाखळी खेचणे यांसारख्या गुन्ह्य़ानंतर चोरटय़ांनी आता मंदिरांनाच लक्ष्य केले आहे. रामकुंड परिसरातील गंगा गोदावरी मंदिरातील देवीच्या मूर्तीवरील दागिन्यांची चोरी होऊन चोवीस तासही उलटत नाही तोच आडगाव येथे महालक्ष्मी मंदिरातून १३ किलोची पितळी मूर्तीच चोरटय़ांनी गायब केली. मंदिरांमध्ये चोऱ्या होऊ लागल्याने नागरिकांमध्ये पोलिसांविषयी असंतोष वाढू लागला आहे.
रामकुंड परिसरात पुरोहित संघाचे गंगा गोदावरी मंदिर आहे. हे मंदिर बारा वर्षांतून एकदाच सिंहस्थानिमित्त दर्शनासाठी खुले होते. सध्या सिंहस्थ पर्व असल्याने ते दिवसा खुलेच राहते. शुक्रवारी रात्री मंदिराचा कडी-कोयंडा तोडून चोरटय़ांनी देवीच्या अंगावरील दागिन्यांची लूट केली. या चोरीचा तपास लागत नाही तोच शनिवारी रात्री आडगाव येथे महालक्ष्मी मंदिरातून अडीच फूट उंचीची मूर्तीच चोरण्यात आली. मूर्तीसह दागिन्यांचीही लूट करण्यात आली. मूर्ती चोरीमुळे आडगाव परिसरातील नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. अनेक महिन्यांपासून शहर व परिसरात कित्येक गुन्हे घडूनही पोलिसांकडून कोणतीच कठोर कारवाई करण्यात न आल्यानेच गुन्हेगारांचे धैर्य वाढत असल्याची प्रतिक्रिया उमटत आहे. आतापर्यंत सर्वसामान्यांची लूट करणारे गुन्हेगार आता मंदिरांमध्येही डल्ला मारू लागले असून या परिस्थितीमुळे सामाजिक असंतोष निर्माण होऊ शकतो. गुन्हेगार हाती लागल्यास त्यांना त्वरित जामीन मिळणार नाही याची व्यवस्था होण्याची गरज आहे. मोक्कान्वये कारवाईच्या प्रमाणात पोलिसांनी वाढ करण्याची मागणी होत आहे.