नवे निरपूर येथील शेतातून चंदनाच्या झाडांची चोरी

शहराप्रमाणे ग्रामीण भागातही मुख्यत्वे बागलाण तालुक्यात चंदन तस्करांची टोळी पुन्हा सक्रिय झाली आहे. या तालुक्यातील नवे निरपूर येथील शेतातून सुमारे दोन लाख रुपये किमतीची चंदनाची चार झाडे चोरून पोबारा केल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी वन विभागाकडे तक्रार करण्यात आली आहे.

काही महिन्यांपासून नाशिक शहरात चंदनाची झाडे चोरीस जाण्याचे प्रकार वाढले आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे, पोलीस अधिकाऱ्यांच्या निवासस्थान परिसरातील चंदनाची झाडे चोरीला गेली होती. सातत्याने घडणाऱ्या या घटनांची दखल घेत शहर पोलिसांनी चंदन तस्करांचा छडा लावला. काही संशयितांना अटकही केली, परंतु चंदन तस्कर हाती आल्यानंतरही हे प्रकार सुरू राहिले.

शहरात चंदनाची झाडे लंपास करण्याच्या घटना वाढत असताना ग्रामीण भागातही त्याचे लोण पोहचले आहे. बागलाणच्या नवे निरपूर येथील गोरख कचवे या शेतकऱ्याने १० वर्षांपूर्वी दुष्काळाला तोंड देत आपल्या अडीच एकर क्षेत्रात वन विभागाच्या मार्गदर्शनानुसार ३०० चंदन रोपांची लागवड केली होती. सध्या ही झाडे तोडणीयोग्य झाल्याने कचवे यांनी झाडे तोडून विक्रीचा परवाना मिळावा, यासाठी वन विभागाकडे परवानगी मागितली होती. या दरम्यान तस्करांनी त्यांच्या शेतातील दोन लाख रुपये किमतीची चार झाडे तोडली आणि दोन फुटाचे तुकडे करून लंपास केली. याबाबत वन विभागाकडे तक्रार केल्यानंतर कचवे हे सटाणा पोलीस ठाण्यात गेले होते. परंतु पोलिसांनी तक्रार दाखल करून घेण्यास टाळाटाळ केल्याची तक्रार कचवे यांनी केली.

गेल्या वर्षी चंदन तस्करांच्या टोळीने कचवे यांच्या शेतातून एक फूट व्यासाचे झाड कापून नेले होते. त्यावेळी त्यांनी सटाणा पोलीस ठाणे आणि वन विभागाकडे तक्रार केली होती. मात्र तस्करांचा ठावठिकाणा लावण्यात तपास यंत्रणेला अपयश आले. पोलीस आणि वन विभागाने या घटनेची तातडीने दखल घेऊन तस्करांना जेरबंद करावे आणि संबंधित शेतकऱ्यांच्या शेतातील चोरीस गेलेल्या झाडांचा पंचनामा करून त्यांना तात्काळ नुकसान भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी परिसरातून करण्यात येत आहे.