भाविकांची गैरसोय होत असल्याची तक्रार

सप्तशृंग गडावरील विविध विकास कामे मंजूर असूनही ती सुरू न झाल्याने भाविक व ग्रामस्थांची गरसोय होत आहे. संबंधित विभागाला कामे तत्काळ सुरू करण्यासंदर्भात निर्देश द्यावेत, अशी मागणी शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख तथा सप्तशृंग गडचे उपसरपंच गिरीश गवळी यांनी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. पालकमंत्री गिरीश महाजन यांनी भाविकांची गरसोय दूर करण्यासाठी विशेष बाब म्हणून गडावर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची लवकरच बठक घेऊन सदर कामे मार्गी लावली जातील, अशी ग्वाही दिली.

सप्तशृंग गड ग्रामपंचायतीच्या माध्यमातून नियोजन समितीच्या बठकीत भक्त निवास बांधकाम, गावांतर्गत रस्ते, भवानी पाझर तलावाची गळती थांबवून उंची वाढविणे आदी कामे सुचविण्यात आली होती. या कामांना मंजुरीही देण्यात आली होती. मात्र संबंधित विभागाकडून कामे सुरू करण्यासंदर्भात कोणतेच पाऊल उचलले गेले नाही. ही विकास कामे सुरू करण्यासाठी पालकमंत्री गिरीश महाजन यांची उपसरपंच गवळी यांच्या नेतृत्वाखालील ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने नाशिक येथे भेट घेतली. यापूर्वीही शिवसेनेचे सहकार राज्यमंत्री दादा भुसे यांच्या नेतृत्वाखाली यासंदर्भात निवेदन देण्यात आले होते. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न महत्वाचा असल्याने व पावसाळा जवळ आला असताना संबंधित विभागाने एकदाच भवानी पाझर तलावाला भेट देऊन पाहणी केली आहे. परंतु, दुरुस्ती व उंची वाढविण्यासंदर्भात कोणतेच काम सुरू न केल्याने या पावसाळ्यात पावसाचे संपूर्ण पाणी वाहून जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील वर्षीही फेब्रुवारी महिन्यानंतर सप्तशृंग गड ग्रामस्थांसह सप्तशृंगी निवासिनी देवस्थान व भाविकांना तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. हा धोका लक्षात घेऊन पालकमंत्री महाजन यांनी तत्काळ संबंधित विभागांना सूचनावजा आदेश करून संबंधित कामे मार्गी लावावी, अशी मागणी उपसरपंच गवळी यांनी केली आहे. यावेळी आमदार बाळासाहेब सानप, वसंत गीते, ग्रामपंचायत सदस्य जगन बर्डे, राजेश गवळी, दीपक जोरवर, नरेंद्र मुदगल आदी उपस्थित होते. सप्तशृंग देवीच्या गडावर टंचाई पाचवीलाच पुजली आहे. या ठिकाणी वर्षांतून दोन वेळा यात्रा भरते. देशभरातून लाखो भाविक दर्शनासाठी हजेरी लावतात. मात्र येथे पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याकडे शासकीय यंत्रणा दुर्लक्ष करत असल्याने नागरिक, देवस्थान व भाविकांना टंचाईचा त्रास कायमच सहन करावा लागतो, अशी व्यथा उपसरपंच गवळी यांनी मांडली आहे. तर ग्रामपंचायत सदस्य जगन बर्डे यांनी सप्तशृंग गडावरील जिवंत कुंडांचा शोध घेऊन पाणी साठवणुकीसाठी त्यांचा वापर करण्याची सूचना केली आहे. गडावर १०८ जिवंत कुंड असून त्यापैकी २० ते २५ कुंड वापरात आहेत. इतर कुंड मातीने बुजली आहेत. याशिवाय गाव अंतर्गत रस्त्यांची विशेष बाब म्हणून कामे सुरू करण्याची मागणीही त्यांनी केली.