जागतिक स्तरावर बाल हक्क संरक्षणाच्या माध्यमातून सुरू झालेल्या ‘सेव्ह द चिल्ड्रन’ या मोहिमेचे उद्घाटन मंगळवारी येथे बाल कलाकार ओवी दीक्षित हिच्या हस्ते झाले. सिन्नर तालुक्यातील २२ जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी संस्था सक्रिय असून पुढील टप्प्यात ही चळवळ व्यापक स्वरूपात पुढे नेण्यासाठी कामाचे नियोजन करण्यात आल्याचे प्रकल्पप्रमुख संध्या कृष्णन यांनी सांगितले.
सेव्ह द चिल्ड्रनने नाशिकमध्ये ‘एव्हरी लास्ट चाइल्ड’ ही जागतिक मोहीम सुरू केली. त्याअंतर्गत दोन वर्षांपासून सिन्नर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये हे काम सुरू होते. या शाळांमध्ये शिक्षणाचा दर्जा सुधारणे हे मुख्य लक्ष्य आहे. बालकांचे हक्क आणि त्यांना प्राप्त झालेले अधिकार यावर काम करताना शैक्षणिक गुणवत्ता वाढविणे, जिल्हा परिषदेच्या शाळांतील मुलांची पटनोंदणी करणे व त्यांना शाळेत टिकवून ठेवणे, विद्यार्थ्यांना भाषा, गणित व संगणक या विषयाच्या वृद्धीसाठी सातत्याने प्रयत्न करणे या अनुषंगाने संस्थेचे काम सुरू आहे. संस्थेच्यावतीने यासाठी सूचना पेटी, कार्पेट, ग्रंथालय पुस्तके, संगणक, भाषा व गणित साहित्य देण्यात आले आहे. संस्था दोन वर्षांत ३६०० विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली असून २२० मुले पुन्हा शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आली. पुढील टप्प्यात पाच लाख विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचे लक्ष्य असून तळागाळातील मुलगादेखील शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी प्रयत्न होणार आहेत.
ही सर्व प्रक्रिया जवळून अनुभवणाऱ्या ईश्वरी सहाणे या चिमुरडीने समाजातील प्रत्येक वंचित घटक हा शब्द जेव्हा ऐकला तेव्हा वंचित म्हणजे काय हे समजत नसल्याचे सांगितले. माझ्या मैत्रिणी शाळेत येत नव्हत्या. मी ताईला सांगितले. या मोहिमेच्या माध्यमातून मुलगा-मुलगी भेद न करता सर्वांपर्यंत शिक्षण पोहोचत असल्याचा आनंद अधिक असल्याचे तिने नमूद केले. रोशन चव्हाणने संस्था मुलांना आपले प्रश्न सोडविण्यासाठी उद्युक्त करते. शाळेत येताना मैदानावर होणारा चिखल हा आमच्यासाठी महत्त्वाचा विषय होता. त्यामुळे कपडे खराब व्हायचे. शिवाय वर्गात बसतानाही अडचण व्हायची. हा प्रश्न संस्थेने तयार केलेल्या ‘बालगट’ समितीसमोर ठेवला. बालगटाने मुख्याध्यापक तसेच ग्रामपंचायतीला पत्र देत त्याकडे लक्ष वेधले. यामुळे हा प्रश्न निकाली निघाला. अशा अनेक प्रश्नांची सोडवणूक करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे रोशनने सांगितले.
दरम्यान, ओवीच्या हस्ते या मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले. शिक्षण हा जगण्याचा अविभाज्य भाग आहे. मोहिमेचा उद्देशच शेवटच्या घटकापर्यंत असा आहे. आपण अशा मुलांपर्यंत पोहोचणे गरजेचे असल्याचे ओवीने सांगितले. एक तरी शाळाबाह्य़ मुलाला शिकवले पाहिजे असे आवाहन तिने केले. या वेळी विद्यार्थ्यांनी काढलेल्या छायाचित्रांचे प्रदर्शनही उपस्थितांना पाहण्यासाठी खुले ठेवण्यात आले होते.