ऑनलाइन अध्यापनाचा तिढा कायम, विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद

नाशिक : करोना महामारीमुळे नऊ महिन्यांपासून बंद असलेल्या शहरासह जिल्ह्य़ातील शाळा सोमवारी पुन्हा सुरू झाल्या. इतक्या दिवसांनंतर पहिल्यांदा शाळेत आल्याचा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर होता. करोनाविषयक आजाराविषयी प्रबोधन करण्यासाठी शाळेच्या फलकांवर देण्यात

आलेली माहिती, शाळेच्या आवारात प्रवेश करण्यापासून वर्गात जाईपर्यंत सर्वत्र करोनाविरोधातील नियमांचे पालन, वर्गातही सर्वाच्या तोंडांवर मुखपट्टी, यामुळे विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी करोना एके  करोना

असाच अनुभव आला. शाळा प्रत्यक्ष सुरू झाली असली तरी ऑनलाइन अध्यापनाचा तिढा कायम आहे. राज्यात करोनाचा संसर्ग फैलावण्यास सुरुवात झाल्यानंतर पहिल्या टप्पात शाळा, महाविद्यालये, शिकवणी वर्ग बंद करण्यात आले. मार्चपासून बंद झालेली शाळा सोमवारी सकाळच्या सत्रात सुरू झाली. शासनाने केलेल्या सूचनेनुसार के वळ ५० टक्के  विद्यार्थ्यांना बोलावण्यात येऊन एक दिवसाआड वर्गातील विद्यार्थ्यांना बोलावण्यात येणार आहे. सुरुवातीला मधली सुट्टी नसून तीन ते चार तासांची शाळा होणार आहे. इंग्रजी, विज्ञान, गणित हे विषय शिकविण्यात येत आहेत. काही शाळांमध्ये भाषा विषयही वेळापत्रकात घेण्यात आला आहे.

पहिल्या दिवशी सर्व शाळांकडून करोनाविरुद्धच्या सुरक्षेच्या नियमांचे काटेकोर पालन करण्यात आले. शाळेच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेरच तीन- तीन फु टांच्या अंतरावर वर्तुळांची आखणी करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या शरीरातील तापमानाची नोंद करण्यात आली.

प्राणवायूची पातळी मोजण्यात आली. मुलामुलींसाठी वेगवेगळ्या प्रवेशद्वारांतून शाळेत ने-आण करण्याची व्यवस्था करण्यात आली. प्रार्थना न झाल्याने काही विद्यार्थी हिरमुसले. काही शाळा पूर्णवेळ तर काही शाळा अर्धवेळ सुरू होत्या.

ज्या पालकांनी हमीपत्र भरून दिले अशाच विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देण्यात आला.

विद्यार्थ्यांनीही खबरदारीचा उपाय म्हणून मुखपट्टी, हातमोजे, गरम पाण्याची बाटली सोबत ठेवली होती. शालेय वर्ग प्रत्यक्ष सुरू झाले असले तरी जे विद्यार्थी शाळेत येत नाहीत अशा विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन शाळा सुरू राहणार आहे. वर्गात विद्यार्थी येण्याच्या प्रमाणात दिवसागणिक वाढ होत जाईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

नाशिक जिल्ह्य़ातील नववी ते बारावीचे वर्ग सोमवारी सुरू झाले. त्यातील एक हजार ३२४ शाळांपैकी ८४६ शाळा सुरू झाल्या. शाळेच्या पहिल्या दिवशी एक लाख २१,५७९ विद्यार्थी उपस्थित राहिले. शाळा सुरू करण्यापूर्वी सात हजार ६३ मुख्याध्यापक, शिक्षकांची तसेच २५०० शिक्षके तर कर्मचाऱ्यांची करोना चाचणी करण्यात आली. त्यापैकी ६२ मुख्याध्यापक, शिक्षक आणि १० शिक्षके तर कर्मचारी करोनाबाधित आढळले.

मराठा शाळेतील वर्गात शारीरिक अंतर ठेवण्यासह विद्यार्थ्यांना मुखपट्टीचा वापर. असेच चित्र इतरही शाळांमध्ये होते.       (छाया- यतीश भानू)