बारावी व इतर महाविद्यालयांचे निकाल जाहीर होत असल्याने सेतू कार्यालयात विविध स्वरुपाचे शैक्षणिक दाखले घेण्यासाठी विद्यार्थ्यांची गर्दी होऊ लागली आहे. सेतू कार्यालयातील कर्मचारी विद्यार्थ्यांना उडवाउडवीची उत्तरे देतात तर दुसरीकडे दलालांमार्फत गेल्यास सहजपणे दाखले प्राप्त होतात. सेतू कार्यालयास दलालांच्या तावडीतून मुक्त करावे आणि विद्यार्थ्यांचा आर्थिक व मानसिक त्रास कमी करावा, अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने जिल्हा प्रशासनाकडे केली आहे. या संदर्भात तातडीने बैठक घेऊन आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आश्वासन देण्यात आले.
शहर व जिल्ह्यातील बहुतांश महाविद्यालयांचे निकाल जाहीर होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. नवीन शैक्षणिक वर्षांत प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे दाखले सेतू कार्यालयातून काढावे लागतात. परंतु, नाशिक शहरातील सर्व सेतू कार्यालयांना दलालांचा वेढा पडल्याचे आज पहावयास मिळत आहे. सेतूतील कर्मचारी हे विद्यार्थी व पालकांना योग्य ती माहिती देत नाही तसेच कर्मचाऱ्यांना सविस्तर माहिती विचारली असता उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. दुसरीकडे दलाल मंडळींना सेतू कार्यालयाच्या मागील दरवाजातून थेट प्रवेश दिला जातो, अशी तक्रार करण्यात आली आहे. एखादा दाखला काढून देण्यासाठी रितसर जो कालावधी लागतो, त्यापेक्षा जलदगतीने दलाल तो काढून देतात. म्हणजे दलालांना विहित मुदतीच्या आधी दाखला मिळतो पण नियमात राहून अर्ज दाखल केलेल्या विद्यार्थ्यांची पिळवणूक केली जात असल्याची तक्रार राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष चिन्मय गाडे यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली. यामुळे विद्यार्थ्यांना प्रचंड मानसिक आणि आर्थिक त्रास होत आहे. महाविद्यालयातील प्रवेशास अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे प्रशासनाने या प्रश्नात लक्ष घालून सेतू कार्यालये दलालमुक्त करावीत, अशी मागणी करण्यात आली आहे. विद्यार्थी हिताचा निर्णय न घेतल्यास आंदोलन छेडण्याचा
इशाराही राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने दिला आहे.