नाशिक : सव्वा वर्षांनी होणाऱ्या महापालिका निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून सर्वच राजकीय पक्षांनी त्या अनुषंगाने तयारी सुरू केली आहे. डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेकडून शहरात धूर फवारणी वा पेस्ट कंट्रोलची कामे केली जात नाही, अशी तक्रार करत शिवसेनेने धूर फवारणीची यंत्रे विभाग प्रमुखांना देत संपूर्ण शहरात धूर फवारणीची तयारी केली आहे. या उपक्रमातून प्रभागनिहाय सर्व नागरिकांपर्यंत पोहोचून सत्ताधारी भाजपचे अपयश दर्शविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
ममता दिनानिमित्त शिवसेनेच्या वतीने बुधवारी आयोजित कार्यक्रमात मीनाताई ठाकरे यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी खासदार हेमंत गोडसे, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, जिल्हाध्यक्ष विजय करंजकर, महापालिकेतील विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते उपस्थित होते. या कार्यक्रमात सेनेच्या विभाग प्रमुखांना सहा धूर फवारणी यंत्र वितरित करण्यात आली. आगामी महापालिका निवडणुकीची सेनेकडून तयारी सुरू आहे. मध्यंतरी स्थानिक पातळीवर संघटनात्मक बदल करण्यात आले.
पालिकेतील सत्ताधारी भाजपला घेरण्याची व्यूहरचना आखली जात आहे. धूर फवारणी यंत्र हा त्याचाच एक भाग. मुळात डासांचे निर्मूलन करण्यासाठी धूर फवारणी, पेस्ट कंट्रोल ही महापालिकेची कामे आहेत, परंतु दोन वर्षांपासून ती ठप्प असून डासांमुळे आरोग्याचे वेगळे प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.
यामुळे शिवसेनेने प्रत्येक प्रभागात धूर फवारणीचा कार्यक्रम आखल्याचे महानगरप्रमुख बडगुजर यांनी सांगितले. पंचवटी विभागातून या धूर फवारणीचा श्रीगणेशा होत आहे. प्रत्येक प्रभागात चार शाखाप्रमुख आहेत. त्यांच्यामार्फत त्या त्या भागात धूर फवारणी केली जाईल.
एकूण ३१ प्रभाग असून महिनाभरात सर्वत्र धूर फवारणी पूर्ण होईल, असा कार्यक्रम आखण्यात आला आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 7, 2021 2:20 am