भाजपला एकच पालिका तर काँग्रेस, राष्ट्रवादीचा धुव्वा

नोटाबंदीमुळे उडालेला चलनकल्लोळ, कृषिमाल नियमनमुक्त करताना आणि चलनकल्लोळात रखडलेले व्यवहार, त्याची कृषिमालाचे भाव घसरण्यात झालेली परिणती.. अशा वेगवेगळ्या घडामोडींचे प्रतिबिंब जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुकीत उमटले. त्याची किंमत या निर्णयांचा गवगवा करणाऱ्या भाजपला मोजावी लागली.

दुसरीकडे सत्ताधारी असूनही विरोधी पक्षाच्या भूमिकेत वावरणाऱ्या शिवसेनेला त्याचा चांगलाच लाभ झाल्याचे पाहावयास मिळाले. शिवसेनेने चार नगरपालिकांवर एकहाती वर्चस्व प्रस्थापित करत ग्रामीण भागात जोरदार मुसंडी मारली. येवला नगराध्यक्षपद मिळवण्यात भाजपला यश आले. परंतु, मनमाड आणि भगूर पालिकेत त्यांना भोपळाही फोडता आला नाही. सिन्नर, मनमाड, नांदगाव व भगूर नगराध्यक्षपदी सेनेचे उमेदवार विजयी झाले. सटाणा नगराध्यक्षपदावर शहर विकास आघाडीने कब्जा करत सत्ताधारी भाजपसह शिवसेनेला अस्मान दाखविले. राष्ट्रवादी आणि मनसेचे नामोनिशाणही राहिले नाही.

नगराध्यक्ष

भगूर – अनिता करंजकर                  (शिवसेना)

सिन्नर – किरण डगळे                     (शिवसेना)

नांदगाव – राजेश कवडे                    (शिवसेना)

सटाणा – सुनील मोरे (शहर              (विकास आघाडी)

मनमाड – पद्मावती धात्रक                (शिवसेना)

येवला – बंडू क्षीरसागर                     (भाजप)

 

येवल्यात भाजपचा करिष्मा

येवल्याचे नगराध्यक्षपद पटकावत भाजपने माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या विधानसभा मतदारसंघातील वर्चस्वाला काहीअंशी धक्का देण्यात यश मिळविले. भाजपचे बंडू क्षीरसागर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार उषाताई शिंदे यांचा अवघ्या ७७९ मतांनी पराभव केला.

क्षीरसागर यांना १२७९४ तर शिंदे यांना १२०२७ मते मिळाली. बेहिशेबी मालमत्तेच्या प्रकरणात भुजबळ सध्या कारागृहात आहेत. त्यांच्या अनुपस्थितीत ही निवडणूक झाली. भुजबळ समर्थकांनी नगरपालिका राखण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. २४ पैकी १० जागा राष्ट्रवादीने कायम ठेवल्या.

परंतु, नगराध्यक्षपद मात्र त्यांना राखता आले नाही. संघनिष्ठ क्षीरसागर यांना उमेदवारी देऊन भाजपने ही पालिका ताब्यात घेण्यासाठी कंबर कसली. त्यासाठी काही प्रभागात सेनेशी युतीही केली गेली. तरीदेखील सेना-भाजप युतीला जोरदार मुसंडी मारता आली नाही.

राष्ट्रवादीने दहा जागांवर विजय मिळविला. शिवसेनेला पाच, भाजपला चार तर अपक्षांनी पाच जागा मिळविल्या. विजयी उमेदवारांमध्ये भाजपचे पुष्पा गायकवाड, प्रमोद ससकर, गणेश शिंदे, छाया क्षीरसागर तर शिवसेनेच्या दयानंद जावळे, छायाबाई देसाई, सूरज पटणी, सरोजिनी वखारे व किरणबाई जावळे यांचा समावेश आहे.

राष्ट्रवादीच्या तेहसीन शेख, निसार शेख, मोमीन साबीयन, संकेत शिंदे, शेख रईसा बानो, निता परदेशी, सचिन शिंदे, शितल शिंदे, प्रवीण बनकर, शेख परवीन निसार यांनी विजय मिळविला. अपक्षांनी पाच जागांवर विजय मिळवला. शेख शफीक, पद्मा शिंदे, रुपेश लोणारी, सचिन मोरे व अमजद शेख यांनी विजय संपादित केला.

भगूरकरांचा सेनेवर विश्वास

नाशिक शहराला लागून असणाऱ्या भगूर नगपालिकेवर सलग चौथ्यांदा आपले वर्चस्व अबाधित राखण्यात शिवसेनेला यश मिळाले. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत सेनेच्या अनिता करंजकर यांनी राष्ट्रवादीच्या प्रेरणा बलकवडे यांना पराभूत केले. या निवडणुकीत भाजपची वाईट अवस्था झाली. नगराध्यक्षपदाचा भाजप उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला तर नगरसेवक पदावर एकही उमेदवार विजयी होऊ शकला नाही. १६ जागा शिवसेनेने मिळविल्या तर काँग्रेसला जेमतेम एका जागेवर समाधान मानावे लागले. १५ वर्षांपूर्वी थेट नगराध्यक्षपद निवडणुकीत विजय करंजकर यांनी विजय मिळविला होता. यंदाच्या निवडणुकीत त्यांच्या पत्नी अनिता करंजकर ३३०० मतांनी विजयी झाल्या. करंजकर यांना ५४२० तर राष्ट्रवादीच्या बलकवडे यांना २०३५ मते मिळाली. भाजपचा उमेदवार स्पर्धेतही राहिला नाही. नगरसेवकपदाच्या निवडणुकीतही यापेक्षा वेगळी स्थिती नव्हती. या ठिकाणी स्वाती झुटे, भाऊसाहेब गायकवाड, विजय करंजकर, अश्विनी साळवे, उत्तम आहेर, जयश्री देशमुख, सुदाम वालझाडे, शकुंतला कुंडारिया, संगिता पिंपळे, मनिषा कस्तुरे, दीपक बलकवडे, कविता यादव, संजय शिंदे, आर. डी. साळवे, प्रतिभा घुमरे, अनिता ढगे हे सेनेचे उमेदवार विजयी झाले. काँग्रेसचे एकमेव मोहन करंजकर हे विजयी झाले. भाजप व राष्ट्रवादीने आघाडी करत दिग्गज नेत्यांना प्रचारात उतरवत ही पालिका ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न केले. परंतु, सेना या लढाईत भाजपसह सर्वाना पुरून उरली. निकाल जाहीर झाल्यानंतर करंजकर गल्ली ते शिवाजी पुतळ्यापर्यंत विजयी मिरवणूक काढण्यात आली.

मनमाडमध्ये राष्ट्रवादीला धक्का

मनमाड नगरपालिकेच्या अतिशय चुरशीच्या निवडणुकीत नगराध्यक्षपदासह नगरसेवक पदाच्या २० जागांवर शिवसेना-रिपाइं युतीने दणदणीत विजय मिळवत भाजप व राष्ट्रवादीला चांगलीच धोबीपछाड दिली. पालिकेच्या आजवरच्या निवडणुकीत सेनेचा हा सर्वात मोठा विजय मानला जातो. या निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादीने प्रत्येकी पाच तर रिपाइं (आठवले गट) दोन आणि एका जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाला. लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत सेनेने सलग दुसऱ्यांदा विजय मिळविला. बहुरंगी लढतीत शिवसेनेच्या पद्मावती धात्रक यांनी राष्ट्रवादीच्या रुपाली पगारे यांना पराभूत केले. धात्रक यांना १४,११४ तर पगारे यांना १०९६८ मते मिळाली. भाजपच्या कुसुम दराडे यांना ७१७८ मते मिळाली. नगरसेवकपदाच्या निवडणुकीत सेना-रिपाइं युतीने असेच वर्चस्व राखले. त्यांचे कविता कोटकर, दिलीप भाबड, शेख शाहीन गालीब, विनय आहेर, कल्पना खोटरे, गणेश धात्रक, महेंद्र शिरसाठ, उषा तेजवानी, राणी विजय मिश्रा, प्रवीण नाईक, संगीता पाटील, सुरेखा मोरे, कैलास हिरंनवाले, प्रमोद पाचोरकर, विनोद ठाकरे, सविता गिडगे, किरण शिंदे, लियाकत शेख, राजेंद्र आहिरे, नुतन पगारे हे विजयी झाले. काँग्रेसने स्वबळावर निवडणूक लढविली. त्यांचे मिलिंद उबाळे, कुरेशी तबस्सुम मुश्ताक, रवींद्र घोडेस्वार, सीमा निकम, संतोष आहिरे यांनी विजय मिळविला. राष्ट्रवादीचे शेख यास्मिन रफीक, पठाण अमजद रशीद खा, रुपाली पगारे, थॉमस मेरी पीटर, कैलास पाटील यांनी तर अपक्षांमधून डॉ. अर्चना जाधव या विजयी झाल्या. भाजपने नगराध्यक्षपदासह विविध प्रभागात २४ उमेदवार उभे केले होते. त्यांचा एकही उमेदवार विजयी होऊ शकला नाही.

नांदगावमध्ये राष्ट्रवादीच्या सत्तेला सेनेला सुरुंग

सलग दहा वर्षांपासून नांदगाव नगर पालिकेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्तेला सुरुंग लावण्यात शिवसेना यशस्वी ठरली. नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत सेनेचे राजेश कवडे यांनी मोठय़ा अंतराच्या फरकाने राष्ट्रवादीचे उमेदवार अरुण पाटील यांना पराभूत केले. नांदगाव व येवला हे भुजबळ कुटुंबीयांचे विधानसभा मतदारसंघ आहेत. आ. पंकज भुजबळ प्रतिनिधित्व करत असलेल्या मतदार संघातील नगरपालिकेवर दहा वर्षांपासून राष्ट्रवादीचे वर्चस्व होते. सेनेने अथक प्रयत्नांती त्यावर भगवा फडकाविण्यात यश मिळविले. बेहिशेबी मालमत्तेच्या प्रकरणात माजी मंत्री छगन भुजबळ हे काही महिन्यांपासून कारागृहात आहेत. त्यांच्या अनुपस्थितीत होणाऱ्या या निवडणुकीत काय निकाल लागणार याकडे सर्वाचे लक्ष होते. भुजबळ कुटुंबीयांच्या अनुपस्थितीचा लाभ सत्ताधाऱ्यांनी प्रयत्न केला. नगरसेवकपदासाठी एकूण ६० उमेदवार रिंगणात होते. त्यात शिवसेनेचे अभिषेक सोनवणे, कामिनी साळवे, चांदणी खरोटे, कारभारी शिंदे, शोभा कासलीवाल, किरण देवरे, वंदना कवडे, सविता शेवरे, मनिषा काकळीज, नितीन जाधव, सुनंदा पवार हे विजयी झाले. काँग्रेसच्या संगीता जगताप, नंदा कासलीवाल तर राष्ट्रवादीच्या वाल्मिक टिळेकर, वनिता पाटील, बालेमिया अब्दुल शेख, योगिता गुप्ता यांनी विजय संपादित केला.

सटाण्यात शहर विकास आघाडी

जिल्ह्यात शिवसेनेने जोरदार मुसंडी मारली असताना सटाणा नगरपालिकेत मात्र या पक्षाला दारूण पराभवाला तोंड द्यावे लागले. सेनेसह भाजपला रोखण्यात शहर विकास आखाडीला यश आले. भुजबळ समर्थकांच्या पुढाकारातून स्थापन झालेल्या या आघाडीचे सुनील मोरे यांनी भाजपचे उमेदवार बाळासाहेब सोनवणे यांचा साडे तीन हजारहून अधिक मतांनी पराभव केला. मोरे यांना ८४९१ तर सोनवणे यांना ४६५७ मते मिळाली. सेनेवर खातेही उघडू न शकण्याची नामुष्की ओढावली. नगरसेवक निवडणुकीत शहर विकास आघाडीचे वर्चस्व राहिले. या आघाडीला सात, भाजपला सहा, राष्ट्रवादी काँग्रेसला पाच, काँग्रेसला दोन तर एक अपक्ष निवडून आला. नगराध्यक्षपदासाठी पाच उमेदवार रिंगणात होते. त्यातील चार मराठा तर एक ओबीसी प्रवर्गाचा होता. चार उमेदवारांमध्ये झालेल्या मत विभागणीचा लाभ विकास आघाडीला मिळाला. आघाडी अल्पसंख्याकांची मोट बांधण्यात यशस्वी ठरली. भाजपच्या प्रदेशाध्यक्षांपासून संरक्षण राज्यमंत्र्यांनी सभा घेत सटाणा पालिकेची सत्ता हस्तगत करण्याचे प्रयत्न केले. परंतु, त्यांना यश मिळाले नाही. शिवसेनेची बिकट स्थिती झाली. विजयी उमेदवारांमध्ये विकास आघाडीचे बाबू बागूल, सुनिता मोरकर, सोनाली बैताडे, संदीप सोनवणे, भारती सूर्यवंशी, राकेश खैरनार, सुवर्णा नंबाळे, भाजपचे महेश देवरे, पुष्पा सूर्यवंशी, निर्मला भदाणे, आरिफ शेख, लता सोनवणे, दीपक पाकळे तर राष्ट्रवादी काँग्रेसचे सुरेखा बच्छाव, शाम मन्सुरी, शमीम मुल्ला, नितीन सोनवणे, सुलोचना चव्हाण, काँग्रेसचे दिनकर सोनवण,राहुल पाटील तर अपक्ष  संगीता देवरे यांचा समावेश आहे.

सिन्नरमध्ये वाजेंची कोकाटेंवर पुन्हा मात

विधानसभा निवडणुकीत भाजपला धक्का देण्यात यशस्वी झालेल्या शिवसेनेने सिन्नर नगरपालिका निवडणुकीतही कोकाटे गटाची पालिकेवरील सद्दी संपुष्टात आणली. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत सेनेचे किरण डगळे यांनी सव्वा चार हजारहून अधिकच्या फरकाने भाजपच्या अशोक मोरे यांच्यावर विजय मिळविला. या पालिकेवर नेहमी पक्षांतर करणारे कोकाटे गटाची सत्ता होती. विधानसभा निवडणुकीत सेनेने भाजपवासी झालेल्या कोकाटेंना पराभूत केले होते.

आता नगरपालिका निवडणुकीतही त्यांच्याकडून सत्ता खेचून घेण्यात सेनेला यश आले. शिवसेनेने १७ जागा जिंकून सिन्नर नगरपालिकेवर भगवा फडकावला. भाजपला दहा जागा मिळाल्या तर एक अपक्ष उमेदवार विजयी झाले.

विजयी उमेदवारांमध्ये सेनेचे बाबू उगले, नलिनी गाडे, सुजाता भागत, प्रमोद चोथवे, विजया बर्डे, हेमंत वाजे, शैलेंद्र नाईक, सुजाता तेलंग,, निरुपमा शिंदे, गोविंद लोखंडे, ज्योती वामणे, सोमनाथ पावशे, गिता वरंदळ व पंकज मोरे, रुपेश मोठे व मालती भोळे यांचा समावेश आहे.

भाजपच्या चित्रा लोंढे, प्रीती वायचळ, वासंती देशमुख, सुहास गोजरे, अलका बोडके, मल्लू पाबळे, शितल कानडे व संतोष शिंदे, नामदेव लोंढे यांनी विजय मिळविला. प्रणाली भाटगिरे या अपक्ष म्हणून निवडून आल्या.