खरेदीसाठी रांगा; मागणी-पुरवठय़ातील तफावतीचा परिणाम

नाशिक : जिल्ह्यात तब्बल साडेसहा हजार करोना रुग्णांना रेमडेसिविरची गरज भासत असताना मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी झाल्याची परिणती मंगळवारी शहर, ग्रामीण भागात रेमडेसिविरच्या तुटवडय़ात झाली. ज्या ठिकाणी सवलतीच्या दरात हे इंजेक्शन मिळते, त्या गोळे कॉलनी आणि सीबीएसलगतच्या विक्रेत्यांकडे रुग्णांच्या नातेवाईकांची एकच गर्दी के ली. यावर तोडगा काढण्यासाठी अन्न औषध प्रशासनाने जिल्ह्यात येणाऱ्या रेमडेसिविरच्या साठय़ावर स्वत:चे नियंत्रण प्रस्थापित करीत करोना रुग्णालये, विक्रेत्यांना ते मिळण्याचे नियोजन केले. तसेच प्रतिदिन आठ ते १० हजार कुप्यांची मागणी नोंदविण्यात आली आहे. अतिरिक्त साठा प्राप्त झाल्यानंतर रेमडेसिविरचा तुटवडा दूर होईल, असा दावा केला जात आहे.

शहर, जिल्ह्यात करोनाबाधितांच्या संख्येत झपाटय़ाने वाढ होत आहे. दररोज साडेचार ते पाच हजार नवीन रुग्ण सापडतात. सक्रिय रुग्णांची संख्या ३१ हजारांचा टप्पा गाठण्याच्या मार्गावर आहे. यात गंभीर स्थिती असणारे अर्थात रेमडेसिविरची गरज भासणारे साधारणत सहा हजार रुग्ण आहेत.

इंजेक्शनची कमतरता भासू नये म्हणून खबरदारीच्या उपाययोजना केल्याचा दावा अन्न, औषध प्रशासनाने केला होता. परंतु, मागणी-पुरवठय़ात तफावत निर्माण झाल्याने दोन दिवसांत हे नियोजन कोलमडले. या इंजेक्शनची मूळ किंमत पाच हजार ४०० रुपये आहे. अन्न, औषध प्रशासनाने काही औषध विक्रेते आणि करोना रुग्णालयाशी संलग्न औषध विक्रेत्यांना इंजेक्शन १२०० रुपयांत रुग्णांसाठी उपलब्ध करण्यास तयार केले. त्यामुळे ज्या विक्रेत्यांकडे ते सवलतीत मिळते, तिथे खरेदीसाठी रांगा लागल्याचे पाहायला मिळाले.

पुरेसा साठा नसल्याने अनेकांना ती मिळाली नाहीत. नागपूरहून ही इंजेक्शने येतात. नाशिकची मागणी सहा हजार ४५६ इंजेक्शनची आहे. सोमवारी ३३०० इंजेक्शने प्राप्त झाली. उशिराने वाहन आल्याने समतोल बिघडला. त्यामुळे ही स्थिती निर्माण झाली. उपलब्ध साठय़ाचे वितरण अन्न औषधने स्वत:च्या देखरेखीत केले. यातून ४५ करोना रुग्णालयांना ती उपलब्ध करण्यात आल्याचे या विभागाच्या सहआयुक्त माधुरी पवार यांनी सांगितले. दरम्यान, करोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना रेमडेसिवरची कुणी जाणीवपूर्वक कृत्रिम टंचाई निर्माण करीत आहे का, अशी साशंकता व्यक्त होत आहे. जिथे सवलतीच्या दरात इंजेक्शन मिळते, तेथील इंजेक्शन एखाद्या रुग्णाच्या नावे खरेदी करून अन्य ठिकाणी त्यांची विक्री वा वापर होत आहे का, याची पडताळणी करण्याची गरज व्यक्त होत आहे.

प्रतिदिन आठ ते १० हजार कुप्यांची मागणी

खासगी रुग्णालयाशी संलग्न औषध विक्रेत्यांकडे रेमडेसिविर उपलब्ध आहे. परंतु, ते महागात मिळत असल्याने सवलतीच्या दरात ते खरेदी करण्याचा नातेवाईकांचा प्रयत्न आहे. अशा ठिकाणी खरेदीसाठी गर्दी झाली. याची माहिती समजल्यानंतर अन्न औषधच्या सहआयुक्त माधुरी पवार यांनी सीबीएसलगतच्या दुकानात भेट दिली. रांगेत उभ्या असणाऱ्या ग्राहकांकडील चिठ्ठय़ा पडताळून चर्चा केली. विक्रेत्यांकडे जितकी इंजेक्शन शिल्लक आहेत, तितकी देऊन उर्वरित ग्राहकांना नवीन साठा उपलब्ध झाल्यावर नोंदणीनुसार तो उपलब्ध करण्याचे निर्देश त्यांनी दिले. रेमडेसिविरची मागणी वाढत आहे. त्यामुळे आता दैनंदिन आठ ते १० हजारांची मागणी उत्पादकांकडे नोंदविण्यात आली. जेणेकरून वाहतुकीत वा अन्य कारणांनी विलंब झाला तरी काही प्रमाणात अतिरिक्त साठा उपलब्ध राहील. रुग्णालयात ते उपलब्ध झाले तर खरेदीसाठी चिठ्ठी बाहेर येणार नाही, असा प्रयत्न केला जात आहे.

इंजेक्शने नेमकी जातात कुठे?

ज्या रुग्णाच्या नावाने रेमडेसिविरची चिठ्ठी दिली गेली, त्या रुग्णासाठी ते इंजेक्शन खरोखर वापरले जातात का,  याची छाननी अन्न औषध प्रशासन करणार आहे. ज्या रुग्णासाठी रेमडेसिवर इंजेक्शनची खरेदी झाली. त्या चिठ्ठय़ा संकलित केल्या जात आहेत. नंतर रुग्णालयाने संबंधित रुग्णासाठी ते इंजेक्शन वापरले की नाही, याची तपासणी केली जाणार आहे.

– माधुरी पवार (सहआयुक्त, अन्न औषध प्रशासन)