पोलीस म्हणतात, हा तर ‘शॉर्ट सर्किट’चा परिणाम
शहर परिसरातील वाहन जाळपोळ सत्र सुरूच असून मंगळवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास डीजीपीनगर परिसरातील इमारतीतील सहा दुचाकी समाजकंटकांनी जाळल्या. पोलिसांनी हा प्रकार जाळपोळीचा नसून शॉर्टसर्किटने घडल्याचा दावा केला आहे. दुसरीकडे स्थानिकांनी ही वाहने जाळण्यात आल्याचे म्हटले आहे. जाळपोळीची घटना समजल्यानंतर लोकप्रतिनिधींनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र त्यांनाही नागरिकांच्या रोषास तोंड द्यावे लागले.
अंबड परिसरातील डीजीपीनगर हा कामगार वस्तीचा भाग. मंगळवारी मध्यरात्री महालक्ष्मीनगरमधील श्री अपार्टमेंट या इमारतीच्या वाहनतळास संशयितांनी लक्ष्य केल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. या ठिकाणी १२ दुचाकी आणि एक चारचाकी वाहन लावण्यात आले होते. मंगळवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास समाजकंटकांनी इमारतीच्या वाहनतळ परिसरात प्रवेश करत दुचाकीच्या पेट्रोल नळ्या कापून टाकल्या. पेट्रोल इतरत्र पसरत असतांना वाहने पेटवून दिली गेली. ही जाळपोळ सुरू असतांना इमारतीतील वाल्मीक चौधरी यांना जाग आली. आगीची दाहकता पाहिल्यावर त्यांनी मदतीसाठी आरडाओरड केली असता स्थानिकांनी इमारतीकडे धाव घेतली. तसेच इमारतीतील रहिवाशांनी घरातील पाणी आणून आग विझविण्याचा प्रयत्न केला. आग आटोक्यात येईपर्यंत सहा दुचाकी जळून खाक झाल्या. आग विझविण्याच्या प्रयत्नात इमारतीतील शिंदे यांचा हात भाजला. दरम्यान, या घटनेची माहिती नागरिकांनी पोलीस व अग्निशमन विभागाला दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले मात्र इमारत मुख्य वस्तीपासून काहीशी दूर असल्याने अग्निशमन दलास पोहचण्यास वेळ लागला.
या घटनेची माहिती समजल्यानंतर आ. सीमा हिरे, नगरसेवक सुधाकर बडगुजर यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यावेळी नागरिकांच्या रोषाचा सामना त्यांना करावा लागला. आम्ही कामगार आहोत, आम्हाला पुन्हा नव्या गाडय़ा घेणे जमणार नाही. सरकारने ही नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली. दरम्यान, पोलिसांनी ही आग कोणी लावली नसून ती शॉटसर्किटमुळे लागल्याचे म्हटले आहे. मात्र शॉर्ट सर्किट झाले असते तर इमारतीचा वीजपुरवठा खंडित झाला असता. मात्र तसे घडले नाही. पोलिसांच्या दाव्याबद्दल स्थानिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. या घटनेमुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

असा प्रकार घडलाच नाही..
अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या डीजीपीनगर परिसरातील महालक्ष्मीनगर येथील श्री अपार्टमेंट येथे सहा दुचाकी जळून भस्मसात झाल्या. सकाळपासून प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी आणि लोकप्रतिनिधींच्या गाठीभेटी या ठिकाणी झाल्या. या घटनेची चौकशी करण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह पथक घटनास्थळी दाखल झाले. मात्र त्याचा तपशील मिळविण्यासाठी अंबड पोलीस ठाण्यात संपर्क साधला असता ‘आमच्या हद्दीत असा कोणताही प्रकार घडलाच नाही’ असे अजब उत्तर देण्यात आले.