नाशिक : दारणा खोऱ्यात धुमाकूळ घालणारा बिबटय़ा गुरुवारी पिंजऱ्यात बंद झाला. गेल्या महिन्याभरातील हा सहावा बिबटय़ा आहे. या बिबटय़ाला सुरक्षितरीत्या गंगापूर रस्त्यावरील रोपवाटिकेत ठेवण्यात आले आहे. वरिष्ठांच्या आदेशानुसार बिबटय़ाला बोरिवली येथील राष्ट्रीय उद्यानात हलविण्यात येणार आहे.

काही महिन्यांपासून नाशिक तालुक्याच्या दारणा खोऱ्याकडील गावांमध्ये बिबटय़ांचा धुमाकूळ सुरू आहे. आतापर्यंत तीन जणांवर हल्ले, तीन जणांचा बळी बिबटय़ांनी घेतला आहे. नाशिक रोड परिसरातील चांदगिरी येथील के. के. फार्म परिसरात कंपनीचे फार्म हाऊस आहे. या ठिकाणी बिबटय़ा दिसल्याचे ग्रामस्थांनी सांगितल्यावर पोलीस पाटलांच्या मागणीनुसार पिंजरा लावण्यात आला. गुरुवारी सकाळी बिबटय़ा या पिंजऱ्यात अडकल्याचे दिसून आले.

वन विभागाचे मधुकर गोसावी, गोविंद पांढरे आणि अन्य कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. बिबटय़ाला सुरक्षितरीत्या तेथून गंगापूर रस्त्यावरील रोपवाटिकेत हलविण्यात आले. बिबटय़ा मादी असून सव्वा वर्षांची असल्याची माहिती वन विभागाचे अधिकारी पंकज भदाणे, गोसावी यांनी दिली. वन विभागाकडे पोलीस, पोलीस पाटील आणि ग्रामस्थांकडून बिबटय़ा दिसल्याचे अनेक दूरध्वनी येत असतात.

या पाश्र्वभूमीवर वन विभागाने बिबटय़ाचा संचार असलेल्या परिसरात ३६ कॅमेरे लावले आहेत. याशिवाय बिबटय़ाच्या पाऊलखुणा पाहता काही ठिकाणी पिंजरे लावण्यात आले आहेत.