भरती प्रक्रियेवेळी मोठी गर्दी

नाशिक : शहरात करोनाचा उद्रेक झाला असताना रुग्णांवर उपचारांसाठी भासणारी मनुष्यबळाची कमतरता भरून काढण्यासाठी महापालिकेने आरोग्य विभागात विविध पदांसाठी सुरू केलेल्या भरती प्रक्रियेवेळी मंगळवारी पालिका मुख्यालयात मोठी गर्दी उसळली. सुरक्षित अंतराचे पथ्य बाजूला सारले गेले. गर्दीच्या नियंत्रणासाठी पालिकेचे सुरक्षारक्षक वगळता कोणी नसल्याने गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. इच्छुक उमेदवारांना बराच वेळ अपेक्षित माहिती न मिळाल्याने तेही खोळंबून राहिले.

शहरात करोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत असून बाधित रुग्णांना महापालिका, सरकारी रुग्णालयात खाटा मिळणे अवघड झाल्याच्या तक्रारी होत आहेत. एकूण रुग्णसंख्येने आठ हजारांचा टप्पा ओलांडला आहे. करोनामुळे ३५१ जणांचा मृत्यू झाला. महापालिकेच्या आरोग्य विभागात पुरेसे कर्मचारी नाहीत. करोनासाठी तातडीने डॉक्टर, परिचारिका आणि आवश्यक ते कर्मचारी नियुक्त करण्यासाठी थेट मुलाखतीद्वारे मानधनावरील भरती प्रक्रियेला मागील आठवडय़ात सुरुवात करण्यात आली. या अंतर्गत एकूण ८११ पदांवर भरती केली जाणार आहे.

यात फिजिशियन, रेडिओलॉजिस्ट, वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस) मानसोपचारतज्ज्ञ, भूलतज्ज्ञ, आयुष (बीएएमएस) वैद्यकीय अधिकारी अशा १७९ पदांची भरती केली जाईल. तर उर्वरित पदे परिचारिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, मिश्रक, रेडिओग्राफर, आहारतज्ज्ञ, समुपदेशक, एएनएम, आरोग्य सेवक यांची आहेत. महापालिकेच्या मुख्यालयात सरळ मुलाखतीद्वारे ही प्रक्रिया राबवितानाचे नियोजन मंगळवारी विस्कळीत झाले. काही विशिष्ट पदांसाठी मोठय़ा प्रमाणात उमेदवार आले. मुलाखत प्रक्रियेत काही पदे आधीच भरली गेली आहेत. परंतु, त्याची माहिती न मिळाल्याने उमेदवारांची मोठी गर्दी पालिकेच्या मुख्यालय परिसरात झाली होती. बाजारपेठांमध्ये गर्दी करू नका, सुरक्षित अंतर आणि मुखपट्टी परिधान करण्याचे आवाहन पालिकेकडून सातत्याने केले जाते. महापालिका गर्दीमुळे सुरक्षित अंतराचा निकष बासनात गुंडाळला गेला.

प्रवेशद्वारासमोरील मोकळ्या जागेत मोठय़ा संख्येने उमेदवार जमलेले होते. सुरक्षारक्षक त्यांना आतमध्ये सोडत होते. प्रवेशद्वारावर गर्दी होऊ नये म्हणून काळजी घेतली गेली. परंतु, आवारात बरीच गर्दी जमलेली होती. त्यांना माहिती देण्यासाठी वा नियंत्रणासाठी सुरक्षारक्षक वगळता पालिकेचे कोणी अधिकारी फिरकले नाहीत. अनेक जण सकाळपासून आवारात थांबलेले होते. दुपारी कोणती पदे भरली गेली त्याचा फलक लावण्यात आला. संबंधितांना तोपर्यंत ताटकळत बसावे लागले.