महाआरोग्य शिबिरात ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांची घोषणा

आरोग्यावर होणारा खर्च पाहता तळागाळातील लोकांपर्यंत आरोग्य सेवा पोहचविण्यासाठी शासन प्रयत्नशील असतांना त्या योजना आजही लाभार्थीपर्यंत पोहचत नाहीत, अशी खंत ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केली. ही परिस्थिती सुधारण्यासाठी लवकरच ‘मुहल्ला क्लीनिक’ या संकल्पनेवर राज्यात दवाखाने सुरू होणार असल्याचे  भुसे यांनी सांगितले.

जिल्हा शासकीय रुग्णालयात सोमवारी महाआरोग्य शिबिरास सुरुवात झाली. शिबीर उद्घाटन सोहळ्यास महापौर रंजना भानसी, आमदार देवयानी फरांदे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी, जिल्हा परिषद अध्यक्षा शीतल सांगळे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे आदी उपस्थित होते.

उपचारापासून रुग्ण वंचित राहू नये यासाठी आरोग्य विभाग प्रयत्नशील असून महाशिबिरात त्या दृष्टीने सूक्ष्म नियोजन केले आहे. वेगवेगळ्या आजारांवर शिबिरात उपचार होणार आहेत. त्यासाठी शासकीय योजना फायदेशीर ठरतील. परंतु योजनांची माहिती लाभार्थीना नसल्याने त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नाही. ही परिस्थिती बदलण्यासाठी प्रभाग-वॉर्डनिहाय ‘मुहल्ला’ क्लीनिक सुरू करण्यात येणार असल्याचे भुसे म्हणाले.  जिल्हाधिकारी मांढरे यांनी आज जन्म शस्त्रक्रियेव्दारे आणि मृत्यू व्हेंटिलेटरच्या साहाय्याने होत असल्याची वस्तुस्थिती मांडली. आरोग्यावर होणारा खर्च पाहता सर्वसामान्यांची आर्थिक घडी विस्कटली जाते. यासाठी राज्य शासनाच्या योजना जास्तीजास्त लोकांपर्यंत पोहचल्या पाहिजे, अशी गरज मांढरे यांनी व्यक्त केली. शेवटच्या रुग्णापर्यंत योग्य औषध, उपचार मिळतो की नाही याची वेळोवेळी पाहणी होणे गरजेचे आहे, असे मांढरे यांनी सांगितले. आमदार फरांदे यांनी सरकारी योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचत नसल्याचे सांगत यासाठी स्वतंत्ररीत्या आरोग्य शिबीर घेऊन  त्याची माहिती मतदारांपर्यंत पोहचविल्याचे सांगितले. जिल्हा परिसरातून हजाराहून अधिक रुग्णांनी महाआरोग्य शिबिरात सहभाग घेतला. ‘पीसीपीएनडीटी’ कायद्याची माहिती देणारा शिक्का यापुढे जिल्हा शासकीय रुग्णालयातील रुग्ण तपासणी कागदावर मारण्यात येणार आहे. ‘आरोग्य दर्शनी’ या प्रदर्शनाचे उद्घाटन यावेळी करण्यात आले.

असेही रुग्ण

आरोग्य विभागाकडून ‘महाआरोग्य शिबीर’ भरविले जात असताना प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालयात त्यांची प्राथमिक तपासणी करून गरज पडल्यास पुढील उपचारासाठी त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात होणाऱ्या महाआरोग्य शिबीरात संदर्भित केले जात असल्याचा दावा आरोग्य विभागाने केला आहे. प्रत्यक्षात शिबिराच्या पहिल्याच दिवशी शासकीय आश्रमशाळेचे विद्यार्थी, महापालिका शाळेतील विद्यार्थी शाळेच्या वेळेत दप्तरासह रुग्ण नोंदणीसाठी उपस्थित होते. काही मंडळी हरसुल, पेठ, सुरगाणा या दुर्गम भागातून केवळ सर्दी-खोकला सारखा येतो ही तक्रार घेऊन आले होते. रुग्ण नोंदणीत अपंग (अंध-अपंग) यांचा विचार झाला नसल्याने बाहेरगावहून येणाऱ्या अशा विशेष रुग्णांना नेमकी नोंदणी कुठल्या कक्षावर करायची, तपासणीसाठी कुठे जायचे याची माहिती नसल्याने इकडून तिकडे फिरण्याची वेळ आली.