14 December 2018

News Flash

गिधाडांच्या अभ्यासासाठी लवकरच विशेष संशोधन प्रकल्प

उपाहारगृह उपक्रमाकडे गिधाडांची पाठ

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

उपाहारगृह उपक्रमाकडे गिधाडांची पाठ

राज्यात नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या गिधाडांना वाचविण्यासाठी हरसूलच्या खोरीपाडा येथे प्रथमच साकारलेल्या उपाहारगृह उपक्रमाकडे गिधाडे अकस्मात पाठ फिरवू लागल्याची बाब उघड झाली आहे. वास्तविक, या उपक्रमामुळे काही वर्षांत जिल्ह्य़ात गिधाडांची संख्या वाढत असल्याचे आशादायक चित्र होते. अचानक अंतर्धान पावलेल्या आणि इतरत्र अस्तित्वात असणाऱ्या गिधाडांचा सखोल अभ्यास करण्यासाठी वन विभागाने आता १०० किलोमीटरच्या परिघात विशेष संशोधन प्रकल्प हाती घेण्याची तयारी केली आहे. त्या अंतर्गत गिधाडांच्या आढळ क्षेत्राचे सर्वेक्षण, त्यांची भ्रमंती, एका ठिकाणी वास्तव्याचा कालावधी अशा अनेक प्रश्नांची उकल करण्यात येईल. विशेष म्हणजे, त्यासाठी बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी दहा ते वीस गिधाडांच्या पाठीवर ‘प्लॅटफॉर्म ट्रान्समीटर’ हे खास उपकरण बसवून त्यांची दिनचर्या, भ्रमंतीचा तपशील संकलित करणार आहे.

मृत जनावरांचे भक्षण करणारा गिधाड पक्षी निसर्गात स्वच्छतादूत म्हणून भूमिका बजावतो. यामुळे निसर्गाच्या अन्नसाखळीतील तो महत्त्वपूर्ण घटक मानला जातो. स्थानिक पातळीवर लांब चोचीचे व पांढऱ्या मानेच्या गिधाडांच्या प्रजाती आढळून येत असल्या तरी त्याही नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. गिधाडांच्या संख्येत घट होण्याचे मुख्य कारण म्हणजे, ‘डायक्लोफिनेक’ औषधाचे अंश असणाऱ्या प्राण्याच्या मांसाचे भक्षण. हे औषध पाळीव प्राण्यांना वेदनाशामक म्हणून दिले जाते. उपचारादरम्यान त्या प्राण्याचा मृत्यू झाल्यास आणि अशा मृत प्राण्याचे मांस गिधाडाने भक्षण केल्याने त्याचाही मृत्यू होतो. ही बाब त्यांची संख्या घटण्यास कारक ठरली. जिल्हय़ात अंजनेरी, ब्रह्मगिरी, मुळेगाव, वरसविहीर, चांदवड, हरसूल, केळझर, ओझरखेड, ब्रह्मगिरी आणि पहिने या गावांतील डोंगर कपारीत आणि जंगल परिसरात गिधाडांचे अस्तित्व आढळते. लुप्त होण्याच्या स्थितीत असलेली गिधाडांची घरटी तसेच त्यांचा आढळ असलेल्या ठिकाणांची माहिती घेऊन हरसूल तालुक्यातील मौजे खोरीपाडा येथे संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या सहकार्याने वन विभागाने २०११ मध्ये गिधाडांसाठीचे राज्यातील पहिले उपाहारगृह सुरू केले होते. नैसर्गिकपणे मृत पावलेल्या (डायक्लोफिनेक औषधाचे अंश नसलेले) पाळीव प्राण्यांचे मांस त्यांना या ठिकाणी उपलब्ध केले जाते. त्यावर ताव मारण्यासाठी येणाऱ्या गिधाडांबरोबर त्यांची घरटी आणि पिलांची संख्या वाढल्यामुळे या प्रजातीचे संवर्धन करण्यास उपाहारगृह महत्त्वाची भूमिका निभावत असल्याचे अधोरेखित झाले. परंतु, गेल्या काही महिन्यांत गिधाडांचा उपाहारगृहास मिळणारा प्रतिसाद अकस्मात कमी झाल्याचे उपवनसंरक्षक (नाशिक पश्चिम) टी. बेऊला इझिल मथी यांनी सांगितले. त्यामागील कारणांची अद्याप स्पष्टता झाली नसल्याचे त्यांनी सूचित केले.

उपाहारगृहात येणाऱ्या गिधाडांनी आपली आश्रयस्थाने बदलली असावीत, असा अंदाज आहे. या पाश्र्वभूमीवर, गिधाडांचा अभ्यास करण्यासाठी वन विभाग पाच वर्षांसाठी संशोधन प्रकल्प हाती घेत आहे. अंजनेरीच्या डोंगर कपारीत वास्तव्य करणाऱ्या गिधाडांची संख्या मोठी आहे. अंजनेरीच्या १०० किलोमीटरच्या परिघात हा प्रकल्प राबविला जाईल. त्यात ग्रामस्थांचा सहभाग घेतला जाणार असल्याचे टी. बेऊला इझिल मथी यांनी सांगितले. एखादे जनावर मृत झाल्यास गिधाडे ते खाण्यास येतात का, त्यांची घरटी व तत्सम माहिती प्रश्नावलीद्वारे ग्रामस्थांकडून संकलित करण्यात येणार आहे. या संशोधनात बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी मदत करणार आहे. त्यांच्यामार्फत जिल्हय़ातील काही निवडक गिधाडांवर ‘प्लॅटफॉर्म टान्समीटर’ यंत्र बसविले जातील. त्या आधारे गिधाडे कुठे भ्रमंती करतात, कुठे वास्तव्य करतात, एखाद्या ठिकाणावरून अन्य ठिकाणी स्थलांतरित होण्याचा कालावधी अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे टी. बेऊला इझिल मथी यांनी सांगितले. डायक्लोफिनेक औषधांच्या वापरावर बंदी आहे. तरीदेखील त्याचा वापर होत असल्याने सर्वेक्षणात त्याची छाननी होणार आहे.

उपाहारगृहाचा प्रवास

काही वर्षांपूर्वी हरसूल परिसरात बोटावर मोजता येतील इतकीच गिधाडे होती. उपाहारगृह सुरू झाल्यानंतर भोजनाचा आस्वाद घेण्यासाठी येणाऱ्या गिधाडांची संख्या वाढू लागली. २०१४ मध्ये ८२ गिधाडांवर असणारा आकडा २०१५ मध्ये दुपटीने वाढला. घरटय़ांची संख्या वाढू लागली. परंतु, सध्याच्या वर्षांत उपाहारगृहात येणाऱ्या गिधाडांची संख्या कमी झाली आहे. कुठेही पाळीव प्राण्याचा मृत्यू झाल्यास पशू वैद्यकीय अधिकाऱ्यामार्फत तपासणी आणि डायक्लोफिनेक औषधाची मात्रा नसल्याची खात्री केल्यावर वन विभाग ते स्वखर्चाने उपाहारगृहात नेते. सात ते १५ दिवसांच्या कालावधीनंतर नियमितपणे भोजनाची व्यवस्था केली जाते. उपाहारगृह सुरू असले तरी प्रतिसाद कमी झाल्याचे वन विभागातील अधिकाऱ्यांनी मान्य केले.

First Published on November 15, 2017 1:49 am

Web Title: special research project for study about vulture bird