17 November 2019

News Flash

शाळांमध्ये ‘स्टुडंट पोलीस कॅडेट’ उपक्रमास सुरुवात

निवडक विद्यार्थ्यांची निवड करून प्रशिक्षण देण्याचा निर्णय

निवडक विद्यार्थ्यांची निवड करून प्रशिक्षण देण्याचा निर्णय

नाशिक : विद्यार्थ्यांमध्ये नीतिमूल्ये रुजावीत, ते जबाबदार नागरिक व्हावेत यासाठी विविध माध्यमांतून प्रयत्न होत आहे. याआधी तत्कालीन पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांच्या मार्गदर्शनाने ‘छोटा पोलीस’ उपक्रम शाळा स्तरावर राबविण्यात आला. आता केंद्र स्तरावरून विद्यार्थ्यांसाठी ‘स्टुडंट पोलीस कॅडेट’ हा उपक्रम राबविण्यात येत असून, नाशिक शहर पोलिसांच्या या उपक्रमास विद्यालयांमध्ये सुरुवात झाली आहे.

शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना शिकविण्यात येणारी विविध मूल्ये त्यांच्यामध्ये रुजावीत, त्यांच्या मनात पोलिसांविषयी असणारी भीती जावी यासाठी याआधी ‘छोटा पोलीस’ उपक्रमाच्या माध्यमातून प्रयत्न झाले. पुढील टप्प्यात केंद्र सरकारच्या सूचनेनुसार ‘स्टुडंट पोलीस कॅडेट’ उपक्रम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत नाशिक पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील आणि उपआयुक्त माधुरी कांगणे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक  सदानंद इनामदार काम पाहत आहेत.

या माध्यमातून गुन्ह्य़ास प्रतिबंध करणे, रस्ते सुरक्षा आणि वाहतूक जागरूकता, भ्रष्टाचार निर्मूलन संवेदनशीलता आणि सहानुभूती, महिला आणि बालकांची सुरक्षितता, समाजाचा विकास, दृष्ट सामाजिक प्रवृत्तीस आळा घालणे, नीतिमूल्य, शिस्त, आपत्ती व्यवस्थापन आणि स्वच्छता या विषयांवर मुलांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी सुकाणू समिती स्थापन करण्यात आली आहे. यामध्ये जिल्हाधिकारी सूरज मांढरे अध्यक्ष म्हणून काम पाहणार असून जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी वैशाली झनकर, पोलीस उपआयुक्त माधुरी कांगणे, अप्पर पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर हे सदस्य म्हणून काम पाहत आहेत. तसेच इनामदार यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी वन आणि पर्यावरण, युवा कल्याण, परिवहन, शालेय शिक्षण, गृहरक्षक दल, नागरी संरक्षण दल या खात्यांची मदत घेण्यात आली आहे. शहर परिसरातील मराठा हायस्कूल, मनपा शाळा मखमलाबाद नाका तसेच अंबड येथील शाळांमध्ये हा उपक्रम राबविण्यात आला आहे.

शाळांमधील निवडक विद्यार्थ्यांची यासाठी निवड करत त्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. पोलिसांचे कामकाज, शिस्त, कर्तव्य याविषयी माहिती देताना गुन्ह्य़ांना आळा कसा घालावा, नागरिकांची सुरक्षितता कशी जपावी, आपत्ती काळात नागरिक म्हणून आपली भूमिका याविषयी माहिती देण्यात येणार आहे.

First Published on July 4, 2019 3:52 am

Web Title: student police cadet program start in schools zws 70