विद्यार्थ्यांचे मनोगत

नाशिक : नाविन्यपूर्ण कल्पना मांडतांना जुन्या संदर्भाशी केलेली गुंफण, सादरीकरणात सहजता आणण्याचा प्रयत्न आणि नवे काही शिकण्याची उर्मी हे ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेच्या यशस्वितेचे गमक आहे. वैविध्यपूर्ण विषयांची मांडणी होत असतांना त्यात नवीन काय याची उत्सुकता आणि वेगळा विचार या माध्यमातून देण्याचा प्रयत्न होत असल्याची प्रतिक्रिया नाशिक विभागीय प्राथमिक फेरीत सहभागी स्पर्धक आणि परीक्षकांनी व्यक्त केली.

अनुभव शब्दबद्ध

मी स्वत: काही वर्षे मुंबईत राहून सिनेक्षेत्रात स्ट्रगल केले असल्याने या क्षेत्रात नव्याने येणाऱ्या तरुणाईचे प्रश्न, आर्थिक ओढाताण त्यातून येणारे नैराश्य जवळून अनुभवले होते. मोठय़ा शहरांमधील हल्लीची पिढी स्वत:चे स्वातंत्र्य जपण्यासाठी लिव्ह इनचा पर्याय स्विकारते. त्यामुळे अनेकदा मानसिक असुरक्षितेला सामोरे जावे लागते. अशा अनेक अनुभवांतून आमची एकांकिका तयार झाली.

– मनोज खैरनार  (लेखक, लोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालय, पंचवटी)

शिकण्यासाठी लोकांकिका

आम्ही छोटय़ा गावातून पहिल्यांदाच नाशिक गाठले. लोकसत्ता लोकांकिकेत सहभागी होण्यासाठी तीन वर्षांपासून प्रयत्न करत होतो. पण तशी संधी मिळत नव्हती. या माध्यमातून खूप काही शिकायचे आहे. शिकतांना आपल्या सभोवताली घडणाऱ्या घटनांवर व्यक्तही व्हायचे आहे. त्यातून काही संदेश लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी लोकांकिका महत्वाचे माध्यम ठरेल हा विश्वास वाटतो.

– गौरव वाल्हे (कलाकार, श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्थेचे कला आणि वाणिज्य महाविद्यालय, धुळे)

खूप छान अनुभव

लोकसत्ता लोकांकिका स्पर्धेत पहिल्यांदाच सहभागी होत आहे. यामुळे नाटक काय, एकूण नाटकाचा प्रवास कसा हे या माध्यमातून समजले. उमेदवारीसाठी इच्छुक ‘इलेक्टिव्ह मेरीट’ वाढविण्यासाठी कसा प्रयत्न करतात याचे उपहासात्मक विडंबन एकांकिकेत करण्यात आले. राजकीय अस्थिरता, त्याविषयी सर्वसामान्य नागरिकांना काय वाटते हे चोखपणे तसेच टोकदारपणे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. परीक्षकांनी दिलेली शाबासकीची थाप पुढील वाटचाल सुकर करेल असा विश्वास वाटतो.

– मुग्धा थोरात (कलाकार, हं.प्रा.ठा. कला महाविद्यालय, नाशिक)

खऱ्या अर्थाने आंतर महाविद्यालयीन स्पर्धा

लोकसत्ता लोकांकिका स्पर्धा खऱ्या अर्थाने आंतर महाविद्यालयीन स्पर्धा आहेत. नवीन कलाकारांना या माध्यमातून संधी मिळत असून लोकसत्ता त्यासाठी व्यासपीठ ठरते. ‘राम मोहम्मद सिंग आझाद’ विषय निवडतांना इतिहासाची पाने चाळावीशी वाटली. इतिहासात असे अनेक क्रांतीकारी अज्ञात आहेत, ज्यांनी स्वातंत्र्यलढय़ात आपल्या प्राणाची आहुती दिली. त्यातील एक बेला सिंग, राम मोहम्मद सिंग आझाद. त्यांच्या विषयी माहिती पोहचविण्याचा प्रयत्न केला

– सतीश वऱ्हाडे (लेखक, स्मिताताई हिरे कॉलेज ऑफ परफॉर्मिग आर्टस, नाशिक)

गांधीवाद महत्त्वाचा वाटतो

आजचा जमाना गांधीगिरीचा असतांना मला गांधीवाद महत्वाचा वाटतो. ‘नि:शस्त्र योध्दा’च्या माध्यमातून गांधीजीचे विचार मला समजले. हा अनुभव वेगळा होता. लोकसत्ता लोकांकिका स्पर्धेत पहिल्यांदा सहभागी होत आहे. एवढय़ा मोठय़ा मंचावर सादरीकरण करतांना एक दडपण होते. परंतु, सादरीकरणानंतर परीक्षकांनी केलेल्या सुचनांमुळे ते नाहीसे झाले.

– मानसी पाळदे (कलाकार, एस.व्ही.के.टी. महाविद्यालय, देवळाली कॅम्प)

तीन महिने सराव

पहिल्यांदाच अभिनय करत असल्याने मनात धाकधूक होती. लोकांकिकेसाठी संपूर्ण संघाने तीन महिने जोरदार तालीम केली. खूप नवीन गोष्टी या स्पर्धेच्या निमित्ताने शिकायला मिळाल्या. लोकसत्ता लोकांकिकेमुळे सादरीकरणासाठी उत्तम व्यासपीठ मिळाले. अनुभवी परीक्षकांच्या मार्गदर्शनामुळे प्रोत्साहन मिळाले. तसेच आमच्यातील अनेक नवोदित कलाकारांना अभिनय करण्याचा आत्मविश्वास आला.

-स्नेहा कुयटे (कलाकार, लोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालय, पंचवटी)

गांधीजींच्या अहिसेंवर एकांकिका लिहितांना गांधीजींची अनेक पुस्तके वाचली. त्यांचे तत्वज्ञान समजावून घेतले. त्याप्रमाणे जगण्याचा प्रयत्न केला. जहाल—मवाळ या संघर्षांचा अभ्यास केला. यातून इतिहासाच्या घटनांना उजाळा मिळावा, गांधीजींचे विचार तरुणाईपर्यंत पोहचावे या उद्देशाने ही एकांकिका बसवली. पुढच्या वेळी परीक्षकांनी केलेल्या सूचनांप्रमाणे एकांकिकेच्या मांडणीत, दिग्दर्शनात बदल करून एकांकिका आणखी जोमदार करण्याचा आमचा प्रयत्न असेल.

– प्रा. जयश्री जाधव-कदम  (मार्गदर्शक, एस.व्ही.के.टी. कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, देवळाली कॅम्प)