नाशिक : जानेवारीत सहा आणि ७.९ अंशाची पातळी गाठून फेब्रुवारीच्या प्रारंभी वातावरणात कायम राहिलेला गारवा आता संपुष्टात आला आहे. ढगाळ वातावरणामुळे बुधवारी तापमान वाढून पारा १९.२ वर पोहोचला. दरवर्षीप्रमाणे यंदाही फेब्रुवारीच्या मध्यावर थंडी निरोप घेण्याच्या मार्गावर आहे.

थंड हवेसाठी प्रसिद्ध असणाऱ्या नाशिकमध्ये यंदा कडाक्याच्या थंडीसाठी महिनाभर प्रतीक्षा करावी लागली होती. नंतरही हवामानात चढ-उतार कायम राहिल्याचे अधोरेखीत झाले. दरवर्षी दिवाळीनंतर गारवा जाणवू लागतो. डिसेंबर, जानेवारीत दोन-तीन वेळा थंडीची लाट येते, असा आजवरचा अनुभव. यावेळी १० अंशाची पातळी गाठण्यासाठी जानेवारीची प्रतीक्षा करावी लागली. जानेवारीच्या मध्यानंतर म्हणजे १७ तारखेला सहा अंश या नीचांकी पातळीची नोंद झाली होती. नंतर पारा आणखी खाली जाईल, अशी अपेक्षा असताना पुढील काळात तापमान वाढले. थंडीचा जोर ओसरला. थंडी गायब झाल्याचे वाटत असताना जानेवारीच्या अखेरीस तिचे पुनरागमन झाले. पुन्हा पारा सहा अंशांनी कमी झाला. वातावरणात गारवा होता. उत्तर भारतातील शीतलहरींचा हा प्रभाव हळूहळू कमी होत आहे.

फेब्रुवारीत काही दिवस गारवा जाणवला.

दिवाळीत जिल्ह्य़ात पाऊस झाला होता. पावसाळा महिनाभर पुढे ढकलला गेल्याने हिवाळा पुढे सरकेल, अशी अपेक्षा होती. परंतु, ढगाळ वातावरणाने गारवा लुप्त झाला आहे. बुधवारी सकाळी थंडी अंतर्धान पावल्याचे चित्र होते. फेब्रुवारीच्या मध्यावर थंडी निरोप घेण्याच्या मार्गावर आहे.

तापमानात वाढ

सात ते आठ फेब्रुवारीपर्यंत तापमान १० आणि १२ अंशावर होते. नंतर वातावरणात बदल झाले. थंडी तग धरू शकली नाही. आदल्या दिवशी म्हणजे मंगळवारी १५.८ अंशाची नोंद झाली होती. बुधवारी तापमानात ३.४ अंशाने वाढ होऊन ते १९.२ वर पोहोचले.