महिलांच्या सुरक्षेसाठी पोलिसांना सहकार्य

नाशिक : शहरासह राज्यात ठिकठिकाणी घडत असलेल्या महिला आणि युवतींवरील अत्याचार आणि छेडछाडीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शहर पोलिसांना टवाळखोरांविरुद्धच्या मोहिमेत पोलिसांना साथ देण्याचे ठरविले आहे. त्यासाठी ‘मनसे’ने अशा घटना रोखण्यासाठी फिरते पथक तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात ‘मनसे’च्या शिष्टमंडळाने पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांची भेट घेऊन भूमिका मांडली.

नाशिक शहरात पोलिसांच्या वतीने असे प्रकार रोखण्यासाठी ‘निर्भया’ पथकापासून वेगवेगळे उपाय करण्यात येत असले तरी छेडछाड, सोनसाखळी चोरी, विनयभंग असे प्रकार होतच आहेत. अशा घटनांमुळे महिलांमध्ये मोठय़ा प्रमाणावर असुरक्षिततेची भावना वाढत आहे. शाळा, महाविद्यालयातील मुली आणि महिला छेडछाडीच्या घटनानंतरही भीतीपोटी गप्प बसत असल्याने गुंडांची हिंमत वाढून ते अत्याचार करण्यास धजावतात. शहरातील आसारामबापू पुलासारख्या भागात महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनींकडून असभ्य वर्तणूक केली जाते. पालकांनीही आपल्या मुला-मुलींच्या वर्तणुकीची माहिती ठेवावी. पोलीस यंत्रणेने शहरातील सर्व शाळा, महाविद्यालयांजवळ कायमस्वरूपी महिला पोलिसांची नेमणूक करावी. त्यामुळे विद्यार्थिनी आणि शिक्षिकांना सुरक्षित वाटेल, असे ‘मनसे’ने निवेदनात नमूद केले आहे. महिला अत्याचाराच्या या वाढत्या घटनांना पायबंद बसावा, समाजात जनजागृती व्हावी तसेच पोलीस यंत्रणेला मदत व्हावी, या भावनेतून एक फिरते पथक निर्माण करण्यात येत असल्याचे ‘मनसे’ने म्हटले आहे. शहरातील विविध शाळा, महाविद्यालय, बस, रेल्वे स्थानक, बाजारपेठ येथे गस्त घालून महिलांची छेड काढणाऱ्या टपोरी, गावगुंडांना पोलिसांच्या सहकार्याने समज देण्यात येईल. पथकातील सदस्यांचे संपर्क क्रमांक लवकरच जाहीर करण्यात येणार आहेत. महिला, मुली, पालक, शिक्षकांनी कोणी जर छेड काढत असेल, त्रास देत असेल तर नि:संकोचपणे मनसे शाखा किंवा पदाधिकाऱ्यांना अश्या घटना कळविल्यास त्यांना योग्य ती सुरक्षा पुरविण्यात येईल, अशी हमी ‘मनसे’ने दिली आहे.

मनसेच्या पथकास सहाय्य करण्यासाठी पोलीस आयुक्तांनी यंत्रणेस सूचना करावी, अशी मागणीही मनसेच्या वतीने प्रदेश सरचिटणीस अशोक मुर्तडक, जिल्हाध्यक्ष अनंता सूर्यवंशी, शहराध्यक्ष अंकुश पवार, जिल्हा उपाध्यक्ष मनोज घोडके, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा कामिनी दोंदे आदींनी केली आहे.