27 February 2021

News Flash

काठेगल्लीत संशयास्पद वस्तूने पोलिसांची धावपळ

या स्थितीत शहराच्या मध्यवर्ती भागात आढळलेल्या बॉम्बसदृश वस्तूने पोलीस यंत्रणेची धावपळ उडविली.

काठेगल्लीत आढळलेल्या संशयास्पद वस्तूची पाहणी करताना पोलीस. 

शहरातील गुन्हेगारी घटनाक्रमाने नागरिकांमध्ये भयग्रस्त वातावरण असतानाच बुधवारी सकाळी द्वारका परिसरातील काठेगल्लीमध्ये आढळलेल्या बॉम्बसदृश वस्तूने एकच खळबळ उडवून दिली. पोलिसांनी बॉम्बशोधक व नाशक पथकाला पाचारण करत संशयास्पद वस्तू ताब्यात घेतली. प्राथमिक चौकशीत त्यात बॉम्बसदृश्य काही आढळले नसले तरी खात्रीसाठी न्याय वैज्ञानिक प्रयोगशाळेत तिची तपासणी करण्यात येणार आहे. दहशत पसरविण्यासाठी कोणीतरी जाणूनबुजून ही कृती केल्याचा पोलिसांचा संशय आहे.

शहर परिसरात गेल्या काही महिन्यांत गुन्हेगारीचा आलेख उंचावत असल्याने शहरवासीयांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या स्थितीत शहराच्या मध्यवर्ती भागात आढळलेल्या बॉम्बसदृश वस्तूने पोलीस यंत्रणेची धावपळ उडविली.

वर्दळीचे ठिकाण असलेल्या काठेगल्ली परिसरातील रवींद्र विद्यालयाच्या समोर एका झाडाखाली बॉम्बसदृश वस्तू असल्याचे स्थानिकांच्या निदर्शनास आले. सकाळी १० वाजेच्या सुमारास ही बाब उघडकीस आली. नागरिकांनी याची माहिती नियंत्रण कक्षास दिल्यानंतर भद्रकाली पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. टॅबला सेलने जोडलेले सर्किट आणि प्लास्टिक पिशवीत त्या वस्तू ठेवल्या गेल्या होत्या. त्याचा अंदाज घेऊन पोलिसांनी बॉम्बशोधक व नाशक पथकाला पाचारण केले.

दरम्यानच्या काळात पोलीस आयुक्त एस. जगन्नाथन यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या संशयास्पद वस्तूंची पथकाने शाळेच्या मोकळ्या मैदानावर नेऊन तपासणी केली. त्यावेळी घातपाताच्या दृष्टिने संशयास्पद बाब नसल्याचे स्पष्ट झाल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र खात्री करण्यासाठी त्यांची न्याय वैज्ञानिक प्रयोग शाळेत पुन्हा तपासणी करण्यात येणार आहे.

या बाबतची माहिती साहाय्यक पोलीस आयुक्त सचिन गोरे यांनी दिली. या संशयास्पद वस्तुंमध्ये आक्षेपार्ह काही नव्हते. मात्र यातील तांत्रिक जोडणीने काय होऊ शकते याचा अंदाज पोलिसांना नाही. यामुळे त्याचा अभ्यास करता यावा यासाठी या वस्तू प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आल्या असल्याचे त्यांनी नमूद केले.

दरम्यान, या संशयास्पद वस्तू या ठिकाणी कोणी ठेवल्या याचा तपास पोलीस करत आहे. गेल्या काही दिवसांपासून पोलिसांनी टवाळखोर आणि गुन्हेगारांविरुद्ध मोहीम सुरू केली आहे.

त्यामुळे कोणी जाणुनबुजून ही कृती केली काय, या दिशेने पडताळणी केली जात आहे. त्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी, या वस्तू कुठे मिळतात याची माहिती घेतली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 26, 2016 3:14 am

Web Title: suspicious objects found in nashik
Next Stories
1 राजाश्रयामुळे नाशिकमधील गुन्हेगारीला प्रोत्साहन
2 दुष्काळात पोलिसांचे असेही जलसंवर्धन
3 कृषी टर्मिनलसह केंद्राशी संबंधित अनेक प्रकल्प मंजुरीच्या प्रतिक्षेत
Just Now!
X