शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर, मुकणे धरणातील जलसाठय़ाचा ऑगस्टअखेरीस आढावा घेऊन पाणीकपात करायची की नाही याविषयी निर्णय घेतला जाईल, असे महापौर सतीश कुलकर्णी यांनी शुक्रवारी सर्वसाधारण सभेत सांगितल्याने नाशिककरांवर पाणी कपातीची टांगती तलवार कायम आहे. पावसाअभावी धरणांमध्ये समाधानकारक जलसाठा नसल्याने शहरात एकवेळ पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने ठेवला होता. तो प्रस्ताव फे टाळल्याने तूर्तास शहरावरील पाणीकपातीचे संकट टळले आहे.

शुक्रवारी महापौर सतीश कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाइन सभा पार पडली. हंगामाचा पूर्वार्ध उलटून गेल्यानंतरही अपेक्षित पाऊस न झाल्याने गंगापूर धरण समूह आणि मुकणे धरणात समाधानकारक जलसाठा झाला नसल्याने पाटबंधारे विभागाच्या सूचनेनंतर पालिका प्रशासनाने शहरात एकवेळ पाणीपुरवठय़ाचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेसमोर ठेवला. शहरात काही भागात दोन वेळा तर काही भागात एकवेळ पाणीपुरवठा केला जातो. ज्या भागात दोनवेळा पाणीपुरवठा होतो, तिथे एक वेळ आणि जिथे एक वेळ होतो तिथे १५ ते २० मिनिटे कपात करण्याचे प्रस्तावित होते. यावर सभेत चांगलीच चर्चा झाली. दोन दिवसांपासून संततधार सुरू असल्याने पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर, काश्यपी, गौतमी गोदावरी धरणासह मुकणे धरणातील जलसाठा उंचावत आहे. त्यामुळे लगेचच पाणीकपातीची गरज नसल्याचा मुद्दा अनेक नगरसेवकांनी मांडला. प्रशासनाने जेव्हा प्रस्ताव तयार केला होता, त्यापेक्षा आता धरणांमध्ये जलसाठा उंचावलेला आहे. पाणी कपात केली तरी त्याची बचत होणे गरजेचे आहे. अनेक भागात मोठय़ा प्रमाणात पाणी चोरी होते. काही हॉटेलला कमी व्यासाची जोडणी दाखवून अधिक पाणी दिले जाते. पाणी चोरांवर कारवाई न करता प्रशासन कपातीसाठी आग्रही असते, असा आरोप काही नगरसेवकांनी केला. या शिवाय गळतीचे प्रमाण मोठे आहे. वितरण व्यवस्था सुधारण्यास प्राधान्य देण्याचा मुद्दाही चर्चेत मांडला गेला. सर्वाचे म्हणणे जाणून घेत महापौरांनी तूर्तास लगेच कपातीची गरज नसल्याचे स्पष्ट केले. महिनाअखेरीस पुन्हा एकदा आढावा घेतला जाईल. त्यावेळी कपातीची गरज आहे की नाही हे ठरवले जाईल असे नमूद केले. पाणी चोरांवर प्रशासनाने कठोर कारवाई करायला हवी. पाणी वितरण प्रणालीतील त्रुटी दूर करण्याचे निर्देशही कुलकर्णी यांनी दिले.

गोंधळाची परंपरा कायम

सफाई कर्मचाऱ्यांची बदली, बाह्य़मार्गाने सफाई कर्मचाऱ्यांच्या भरतीत पैसे घेणाऱ्या ठेकेदारावर न झालेली कारवाई, औषध फवारणी करणाऱ्या ठेकेदारास काळ्या यादीत समाविष्ट करण्यास चालढकल या मुद्यांवरून विरोधी शिवसेना आणि काँग्रेसच्या नगरसेवकांनी महापौरांना धारेवर धरले. ऑनलाइन महासभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर काँग्रेसच्या डॉ. हेमलता पाटील आणि शिवसेनेचे प्रवीण तिदमे हे महापौर ज्या दालनातून सभेचे संचलन करत होते तिथे धडकले. बेरोजगार युवकांकडून पैसे घेणाऱ्या ठेकेदाराला प्रशासन, सत्ताधारी पाठिशी घालत असल्याचा आरोप केला. करोनाचे संकट असताना काही प्रभागातून सफाई कर्मचाऱ्यांची अकस्मात बदली करण्यात आली. सफाई कर्मचारी भरती करताना ठेकेदाराने १५ हजार रुपये घेतल्याचे मान्य केलेले आहे. त्याच्याकडून मागितलेला लेखी खुलासा दोन महिने उलटूनही आला नाही. प्रशासनाच्या कार्यपध्दतीवर नगरसेवकांनी संशय व्यक्त करत महापौरांना जाब विचारला. या बाबत महापौरांनी प्रशासनाला उत्तर द्यायला सांगितले. अकस्मात झालेल्या या घटनाक्रमाने ऑनलाईन सभेतही गोंधळाची परंपरा राखली गेली. घनकचरा व्यवस्थापन संचालक डॉ. कल्पना कुटे यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात आली.