निवृत्त सैनिकाने धारदार शस्त्र आणि हवेत गोळीबार करुन धाक दाखवल्यामुळे एका शिक्षकाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. किरकोळ वादातून भांडण झाल्यानंतर निवृत्त सैनिक असलेल्या शेजाऱ्याने संबंधित शिक्षकाला धारदार हत्यार आणि हवेत गोळीबार करुन घाबरवले. बुधवारी सायंकाळी नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील सोयगाव नववसाहत भागात ही घटना घडली. सुरेश पंडित काळे (वय ५६) असे मयत शिक्षकाचे नाव असून त्याला धाक दाखवणाऱ्या किशोर रामदास शेवाळे (वय ३९) या निवृत्त सैनिकाला अटक करण्यात आली आहे.

काळे हे नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील आघार खुर्द येथील जनता माध्यमिक विद्यालयात कार्यरत होते. येथील सोयगाव नववसाहतीमध्ये ते वास्तव्यास होते. त्यांच्या शेजारीच सेना दलातील निवृत्त जवान शेळके राहत होते. दोन्ही कुटुंबियांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद निर्माण झाले होते.

बुधवारी काळे यांची कार अंगणात लावण्यावरून त्यांच्यात पुन्हा वाद उद्भवला. त्यातून शेवाळे या निवृत्त जवानाने काळे यांच्या कारवर आणि घरावर दगडफेक करत काचा फोडल्या. तसेच हातात कोयता घेत शिविगाळ केली. इतकेच नव्हे तर स्वत:जवळ असलेल्या बंदुकीतून त्याने हवेत गोळीबार देखील केला. यामुळे भेदरलेल्या काळे यांना ह्रदय विकाराचा तीव्र झटका आला. त्यानंतर त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.  या प्रकरणी शेवाळे याच्या विरोधात मालेगाव कँप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास अटक करण्यात आली.