निऱ्हाळे विद्यालयाचा ‘आमची शाळा, आमचा अभ्यास’ उपक्रम

नाशिक : करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे ‘ऑनलाइन’ शिक्षणाचा पर्याय स्वीकारण्यात आला असला, तरी त्यामुळे वेगवेगळ्या समस्या निर्माण झाल्या आहेत. अशा प्रकारच्या शिक्षणासाठी शहरी भागात पालकांकडून वेगवेगळी साधनसामग्री विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली जात असताना ग्रामीण भागातील मुले यापासून दूर आहेत. या अडचणींवर मात करण्यासाठी सिन्नर तालुक्यातील निऱ्हाळे माध्यमिक विद्यालयाने ‘आमची शाळा, आमचा अभ्यास’ हा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमास पालकांसह विद्यार्थ्यांचा प्रतिसाद लाभत आहे.

करोना संकटाला तोंड देताना विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये यासाठी शिक्षण विभागाने ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय स्वीकारला. अगदी शिशुवर्ग ते महाविद्यालयीन स्तरावर हा पर्याय सर्रास अवलंबला जात आहे. ग्रामीण भागात भ्रमणध्वनीशी संपर्क न होणे, भ्रमणध्वनी संच नसणे यापासून अडथळ्यांना सुरुवात होते. ऑनलाइन अभ्यास आलाच तर तो कितपत समजतो हाही प्रश्न आहे. त्यातही पालक ऑनलाइन आलेला अभ्यास मुलांना देतातच असे नाही. असाच काहीसा अनुभव सिन्नर तालुक्यातील निऱ्हाळे येथील माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक साहेबराव कुटे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना आला. शासकीय नियमाप्रमाणे १५ जूनपासून ऑनलाइन शिक्षण सुरू झाले. परंतु, या ऑनलाइन शिक्षणाला पाचवी ते १० वीपर्यंत २६५ पैकी केवळ ५० टक्के विद्यार्थ्यांचा प्रतिसाद लाभला. उर्वरित विद्यार्थ्यांचे काय, हा प्रश्न कुटे यांना सतावत होता. काही विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांनी अभ्यास वही चाळली असता अक्षरे, काय लिहिले, विषय काय, याचा कुठलाच अंदाज आला नाही. दुसरीकडे शिक्षकांनाही घरी बसून मिळणाऱ्या रिकाम्या वेळेचे काय करायचे, हा प्रश्न सतावत होता.

या पाश्र्वभूमीवर ‘आमची शाळा, आमचा अभ्यास’ उपक्रम निऱ्हाळे विद्यालयाने हाती घेतला. याअतंर्गत ऑनलाइन शिक्षण सुरूच ठेवत ऑनलाइन पद्धतीने दिलेला अभ्यास विद्यार्थ्यांना कितपत समजला, हे जाणून घेण्यासाठी शिक्षक विद्यार्थ्यांच्या घरी भेट देत आहेत. कुटे आणि त्यांचे सहकारी राजाराम आव्हाड, जितेंद्र पाटील, देवीदास गर्जे, आर. के. शेळके, व्ही. एच. शेळके, कल्पना रासणे, संगीता गीते, किशोर सरवार, रवि गीते, तानाजी मेंगाळ, राजू कर्डक हे कामाला लागले. विद्यार्थ्यांना ऑनलाइन अभ्यास दिल्यानंतर दोन दिवसांनी विषयनिहाय शिक्षक विद्यार्थ्यांच्या घरी जातात. त्यांना त्या विषयातील काय समजले नाही हे विचारतात. वही तपासली जाते. अडचणी समजून घेतल्या जातात. यामुळे आपल्यावर कोणाचा तरी अंकुश असल्याची आदरयुक्त भीती मुलांच्या आणि पालकांच्या चेहऱ्यावर दिसत असून पालकांकडून शिक्षकांना तुम्ही कधी येणार, अशी विचारणा होत आहे.आदिवासी कुटुंबातील काही विद्यार्थ्यांकडे भ्रमणध्वनीही नसल्याने त्या मुलांना गावात एका ठिकाणी बोलावून त्या विषयाचे अवलोकन करत त्यांच्याकडून अभ्यास करून घेतला जात आहे. यामुळे अभ्यासापासून, शिक्षणापासून कोणीही वंचित राहणार नाही, याची दक्षता घेतली जात असल्याचे कुटे यांनी नमूद केले.