पारा १०.५ अंशावर

नाशिक : दिवाळीत नीचांकी पातळी गाठून नंतर गायब झालेल्या थंडीचे जोरदार पुनरागमन झाले आहे. सोमवारी पारा १०.५ अंशांवर आल्यामुळे हंगामातील नीचांकी पातळी नोंदविली जाते की काय, अशी स्थिती आहे. वाऱ्यामुळे दिवसाही कमालीचा गारठा जाणवत असून थंडीची लाट येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

डिसेंबरच्या प्रारंभापासून तापमान खाली येत होते. मागील सात दिवसांत तापमान ७.३ अंशांनी कमी झाले. थंड हवेसाठी ओळखल्या जाणाऱ्या नाशिकसाठी थंडी नवीन नाही. दरवर्षी दिवाळी झाली की गारवा जाणवायला लागतो. नेहमीच्या या समीकरणाला बदलत्या ऋतुमानामुळे या वेळी छेद मिळाला. नोव्हेंबरच्या सुरुवातीपासून तापमान कमी झाले होते. ऐन दिवाळीत तापमानाने १०.४ अंशांची नीचांकी पातळी गाठली. पुढील काळात हवामान पुन्हा बदलले. तापमानात वाढ झाली. नंतर अवकाळी पाऊसदेखील झाला. नोव्हेंबरच्या अखेरीस किमान तापमान २० अंशांवर गेले होते. तेव्हापासून गायब झालेल्या थंडीचे डिसेंबरमध्ये पूर्वार्धात पुन्हा आगमन झाले आहे. १ डिसेंबरला १७.८ अंशांची नोंद झाली होती. त्यापुढील प्रत्येक दिवशी तापमान कमी झाले. आदल्या दिवशी म्हणजे रविवारी सकाळी १०.६ अंशांची नोंद झाली होती. रात्री गारठय़ात चांगलीच वाढ झाली. सोमवारी सकाळी १०.५ अंशांची नोंद झाली. वाऱ्यामुळे हुडहुडी भरल्याचे चित्र आहे.

द्राक्ष उत्पादक चिंतेत

उत्तरेकडील शीत लहरींचा प्रभाव नाशिकच्या तापमानावर पडतो. मागील काही हंगामातील नोंदी पाहिल्यावर डिसेंबर, जानेवारीत कडाक्याची थंडी पडते. याच काळात तापमान नीचांकी पातळी गाठते. पारा घसरत असल्याने द्राक्ष उत्पादकांची चिंता वाढली आहे. तापमान कमी झाल्यास द्राक्ष मण्यांना तडे जाणे, पाने-मुळांचे काम मंदावण्याची शक्यता आहे