त्र्यंबकेश्वर तालुक्यात चिमुरडीवर झालेला अत्याचाराचा प्रयत्न आणि त्यामुळे उफाळलेला जनक्षोभ हा विषय संवेदनशीलपणे हाताळण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांनी केला. तथापि, या संदर्भाने झालेल्या काही विधानांमुळे आगीत तेल ओतले गेल्याची स्थिती निर्माण झाली. त्याचा लाभ गावगुंडीच्या राजकारणाने घेतला. विरोधकांना लक्ष करून आपले राजकीय हिशेब चुकते करण्यावर भर दिला गेला. दोन दिवसानंतर जिल्ह्यातील तणाव निवळत असताना उपरोक्त घटनेचे असे काही पदर समोर येत आहेत.

त्र्यंबकेश्वरमधील तळेगाव येथे शनिवारी पाच वर्षांच्या बालिकेवर अत्याचाराचा प्रयत्न झाल्याची घटना घडली. त्या दिवशी रात्रीच हजारोंचा जमाव त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यासमोर जमला होता. खरेतर यंत्रणेला तेव्हाच परिस्थितीचे गांभिर्य लक्षात यायला हवे होते. दरम्यानच्या काळात समाज माध्यमांवरून अफवांची अशी काही राळ उडाली की, स्थिती पोलिसांच्या नियंत्रणाबाहेर गेली. एकाच दिवसात संतप्त जमावाने ठिकठिकाणी सुमारे २३ बसगाडय़ांची जाळपोळ व तोडफोड केली. त्यातून पोलिसांची वाहनेही सुटली नाहीत. या प्रकरणी दोनशेहून अधिक जणांविरुध्द गुन्हे दाखल करत काहींना अटक करण्यात आली आहे. पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या आक्षेपार्ह विधानाने वातावरण अधिक चिघळल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. तळेगावमध्ये त्यांनी पीडित बालिकेच्या वैद्यकीय अहवालाचा संदर्भ देऊन केलेल्या विधानाने जमावाने त्यांच्या निषेधार्थ प्रचंड घोषणाबाजी केली. अखेरीस त्यांना माफी मागणे भाग पडले. पालकमंत्री गावातून बाहेर पडल्यानंतर जमावाने विशेष पोलीस महानिरीक्षक आणि पोलिसांच्या अन्य वाहनांची तोडफोड केली. अत्याचार झाला नसल्याचे विधान पालकमंत्र्यांनी इतक्या घाईत केल्याबद्दल वैद्यकीय क्षेत्रातून नाराजीचा सूर उमटला.

या घडामोडींमुळे दोन्ही गटातील टारगटांना निमित्त मिळाले. गावातील राजकीय मतभेद प्रकर्षांने समोर आले. इगतपुरी तालुक्यातील शेवगेडांग, आंबेबहुला, गोंदे येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले. काही युवकांनी मारहाण व शिवीगाळ केल्या प्रकरणी  पोलीस ठाण्यात ‘अ‍ॅट्रॉसिटी’ कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले. अन्य काही गावांमध्ये असे प्रकार घडल्याचे एका गटाचे म्हणणे आहे. परंतु, या स्वरुपाचे जिल्ह्यातील तीनच गुन्हे दाखल आहेत. स्थानिक पातळीवर अनेक राजकीय हेवेदावे असतात. त्याचे उट्टे काढण्याचा प्रयत्न यानिमित्ताने झाल्याचे लक्षात येते. बाहेरील मंडळी गावांमध्ये येऊन चिथावणी देण्याचेही प्रकार घडत आहेत. नाशिक शहरात विशिष्ट झेंडे लावून महापुरूषांच्या नावे घोषणाबाजी करत भरदिवसा टवाळखोरांचा दुचाकीवरून धुडगूस सुरू आहे. यामुळे तणावात भर पडत असताना पोलिसांनी संबंधितांवर कारवाई करण्याऐवजी बघ्याची भूमिका घेतल्याचा आक्षेप घेतला जात आहे. जनक्षोभात कोटय़वधींचे नुकसान झाले. राज्य परिवहन महामंडळाच्या नुकसानीचा आकडा दीड कोटींच्या घरात आहे. बस वाहतूक बंद राहिल्याने झालेले दीड कोटीचे नुकसान वेगळेच. ऐन सणोत्सवातील आर्थिक व्यवहारावर याचा परिणाम झाला.

इगतपुरी तालुक्यातील शेवगेडांग येथे झालेल्या मारहाण व शिवीगाळ प्रकरणी संशयितांविरुध्द अ‍ॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या स्वरुपाच्या तक्रारी आल्यास गुन्हा दाखल करण्यात येईल. ग्रामीण भागातून कोणत्याही घटकाला स्थलांतर करावे लागलेले नाही. नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेऊ नये.

अंकुश शिंदे (पोलीस अधीक्षक, नाशिक ग्रामीण)