‘कैलास राणा शिवचंद्र मोळी’, ‘बम बम भोले’चा गजर सोमवारी पहाटेपासून जिल्हा परिसरातील शिव मंदिरांमध्ये निनादला. श्रावणातील पहिल्या सोमवारचे औचित्य साधत काही शिवभक्तांनी ब्रह्मगिरी प्रदक्षिणा पूर्ण केली. शिव मंदिरांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रम करण्यात आले. पहिल्या श्रावणी सोमवारनिमित्त शिव मंदिरांना आकर्षक विद्युत रोषणाईस फुलांनी सजविण्यात आले.

त्र्यंबकेश्वर येथे रविवारी सायंकाळपासूनच भाविकांनी गर्दी करण्यास सुरुवात केली होती. पहाटे मंदिरात दर्शन होण्यासाठी भाविकांनी रात्रीपासून रांगेत थांबणे पसंत केले. पहाटे पाच वाजता मंदिर खुले झाल्यानंतर भाविकांना पूर्व दरवाजातील दर्शनबारीतून प्रवेश देण्यात आला. पहाटे जिल्हा सत्र मुख्य न्यायाधीशांच्या हस्ते त्र्यंबकराजाचे विधिवत पूजन  करण्यात आले. उत्तर दरवाजाने २०० रुपयांची पावती देत देणगी दर्शनाची व्यवस्था करण्यात आली. गर्दीमुळे दर्शनरांगेसाठी किमान पाच ते सहा तास, तर देणगी दर्शनासाठी दोन ते तीन तासांचा कालावधी भाविकांना लागला. भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी देवस्थानच्या वतीने मदत कक्ष सुरू करण्यात आला. दर्शनरांगेत भाविकांना बसण्यासाठी व्यवस्थेसह अन्य सोयी-सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. त्र्यंबकसाठी नाशिकहून जाणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी राज्य परिवहन महामंडळाने ५० जादा गाडय़ा सोडल्या. ब्रह्मगिरी फेरी मार्गावर कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी पोलिसांनी बंदोबस्त ठेवला आहे. सोमवारी दुपारी तीन वाजता कुशावर्त परिसरातून त्र्यंबकराजाची पालखी काढण्यात आली. त्र्यंबक येथे भाविकांची गर्दी नवी नाही, परंतु मोठय़ा प्रमाणात येणाऱ्या भाविकांकडून शहर परिसरात निर्माण होणारा कचरा, फुलांचे निर्माल्य, फळे तसेच अन्य खाद्य पदार्थ इतरत्र टाकल्याने निर्माण होणारी दरुगधी याचे करायचे काय, असा प्रश्न नगरपालिका प्रशासनाला पडला आहे.

शहर परिसरातील कपालेश्वर, सोमेश्वर, नीलकंठेश्वरसह गोदाकाठावरील अन्य मंदिरांमध्येही भाविकांनी पहाटेपासून गर्दी केली होती. कपालेश्वर येथे भाविकांची होणारी गर्दी पाहता या ठिकाणी वाहतूक मार्गात बदल करण्यात आला होता. हा बदल श्रावणाच्या चारही सोमवारी कायम राहणार असल्याचे मंदिर प्रशासनाने सांगितले.

बेल-फुलांच्या किमतीत वाढ

श्रावण महिन्याचे धार्मिक महत्त्व या काळातील व्रतवैकल्यात बेल फुलांसह तुळशीला विशेष महत्त्व असते. पूजेनिमित्त विशेष मागणी असल्याने फुले तसेच बेलाच्या किमती वाढल्या आहेत.