महात्मा गांधी रस्त्यावरील अपघातामुळे वाहतुकीचा खोळंबा; ‘नो हॉर्न डे’चा बोजवारा

नाशिक : शहरातील मध्यवर्ती महात्मा गांधी रस्त्यावर कोणत्या ना कोणत्या कारणाने वाहतूक कोंडी नित्याची झाली आहे. कधी टोइंग, तर कधी वाहनांचा धक्का लागून होणारे अपघात, यामुळे होणारी वाहतूक विस्कळीत होत असते. सोमवारी सायंकाळी पाच वाजता चारचाकी वाहन आणि दुचाकी यांच्यात धक्का लागल्याचे निमित्त होऊन दोघा वाहनचालकांमध्ये झालेली हमरीतुमरी पाहण्यासाठी गर्दी वाढत गेली आणि वाहतूक कोंडी झाली. वाहतूक कोंडीत अडकलेल्या अनेक वाहनचालकांना नेमका काय प्रकार झाला हे माहीत नसताना ‘नो हॉर्न डे’ची ऐसी की तैशी करत महात्मा गांधी रस्ता काही वेळ भोंग्यांच्या कर्णकर्कश आवाजाने दणाणला.

सोमवारी सायंकाळी दुचाकीस्वार भगवान साळुंके हे पत्नीसमवेत गावातील काही महत्त्वाची कामे करून आपल्या फॅसिनो या दुचाकीने घरी परतत होते. महात्मा गांधी रस्त्यावर त्यांची दुचाकी आली. त्याच वेळी हॉटेल अन्नपूर्णासमोरून चालक चारचाकी वाहन वळवत होता. चारचाकी वळत असल्याने दुचाकीस्वार साळुंके हे वेगावर नियंत्रण मिळवण्याच्या नादात दुचाकी घसरून पडले. या अपघातात कोणालाही दुखापत झाली नसली तरी दोन्ही वाहनांचे काही अंशी नुकसान झाले. अपघातानंतर दोन्ही चालक आपआपल्या वाहनांच्या नुकसानावर एकमेकांशी वाद घालत राहिले. त्यामुळे बघ्यांची गर्दी वाढत जाऊन वाहतूक ठप्प झाली. साळुंके यांची पत्नी चारचाकी वाहनात बसली आणि वाहन थेट सरकारवाडा पोलीस ठाण्यात नेण्याचा आग्रह धरू लागली. चारचाकी वाहनचालकानेही वाहन पुढे नेत त्यांना वाहनातून उतरवून देत वादास सुरुवात केली. चारचाकी वाहनचालकानेही पोलीस ठाण्यात जाण्याची ठाम भूमिका घेतल्याने या वादावर पडदा पडला. हा वाद सुरू असताना वाहतुकीचा खोळंबा झाल्याने अन्य वाहनचालकांनी गर्दी पुढे सरकावी म्हणून भोंगे वाजविणे सुरू केले.

दरम्यान, काही दिवसांपासून टोइंगची वाहने, वाहनावरील कर्मचारी आणि अन्य वाहनचालक यांच्यात सातत्याने वाद होण्याचे प्रकार घडत आहेत. दोन दिवसांपूर्वी टोइंग कर्मचाऱ्यांविरोधात ‘भीक मांगो आंदोलन’ करत दुचाकीचालकांनी कर्मचाऱ्यांच्या उर्मट वागण्याचा निषेध नोंदविला होता. वाहने उचलण्याची कारवाई होत असताना महात्मा गांधी रस्त्यावर वाहतूक कोंडी होणे हे नित्याचे झाले आहे. दुसरीकडे, व्यापारी संकुलांमध्ये खरेदीसाठी येणारे ग्राहक आपली वाहने रस्त्यावर अस्त्याव्यस्तपणे उभी करत असल्याने वाहतूक कोंडीत भर पडते. कोडींमुळे बऱ्याचदा किरकोळ अपघातही होतात.