• नागरिक, वाहनचालक आणि प्रवाशांचा सवाल
  • वाहतूक कोंडीमुळे वाहनचालक आणि प्रवासी त्रस्त

राजकीय मंडळींना प्रसिद्धी मिळवायची असेल तर त्यांनी खुशाल मिळवावी, पण त्यासाठी सर्वसामान्य जनतेला वेठीस का धरता? असा नाराजीचा सूर बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या रोड शोमुळे वाहतूक कोंडीत अडकलेल्यांनी आळवला. त्यासाठी निमित्त ठरली महाजनादेश यात्रेचे स्वागत करण्यासाठी काढण्यात आलेल्या दुचाकी फेरी.

बुधवारी महाजनादेश यात्रा ही येथील पाथर्डी फाटा परिसरात दाखल झाली. यात्रेचे वेळापत्रक विस्कळीत झाल्याने प्रशासनासह पोलिसांचे नियोजन कोलमडले. याचा त्रास यात्रा मार्गावरील वाहनचालकांसह, व्यावसायिक आणि सर्वसामान्य नागरिकांना झाला. महाजनादेश यात्रेचे स्वागत पाथर्डी फाटा परिसरात झाले असले तरी हा परिसर शेती तसेच औद्योगिक वसाहतीचा आहे. सायंकाळी बाजारपेठेत मालाची ने-आण करणे, औद्योगिक वसाहतीतून मालाच्या ने-आणसह वेगवेगळ्या सत्रांत कर्मचाऱ्यांची ये-जा सुरू होते. दुपारपासून या मार्गातील काही रस्ते बंद झाल्याने वाहने ने-आण करण्यास अडथळे निर्माण झाले. दुपारी तीननंतर रस्ते पूर्णत: बंद झाल्याने या परिरातून बाहेर पडणाऱ्या कंपनी कर्मचाऱ्यांना वाहन कंपनीत सोडून पायी जाण्याचा मार्ग अवलंबला. काहींनी कंपनीचे वाहन टाळत पायी पाथर्डी फाटाच्या पुढे येत खासगी वाहनाने घरी जाणे पसंत केले. शेतकऱ्यांनीही आपली वाहने काही काळासाठी उड्डाणपुलाखाली लावून दिली.

याविषयी बोलताना यात्रा मार्गावरील वाहनचालक सुनील जाधव म्हणाले, एकाच बाजूने वाहतूक सुरू असल्याने बराच वेळ थांबावे लागत आहे. एका व्यक्तीसाठी राज्यकर्त्यांनी नागरिकांना वेठीस धरायला नको. अशा प्रकारच्या शक्तिप्रदर्शनाने मतदार आकर्षित होतील हा केवळ गैरसमज आहे. रुग्णासाठी काही अत्यावश्यक वस्तू आणण्यासाठी बाहेर पडलेल्या रुपाली जाधव यांना पोलिसांनी पुढे जाण्यास अटकाव केला. फेरीसाठी किती वेळ येथे उभे राहायचे हा प्रश्न आहे. सोबत असलेली लहान मुले ही भुकेने रडताहेत. पण पुढे जाता येत नाही. राजकीय शक्तिप्रदर्शनाने केवळ मनस्ताप सहन करावा लागत असल्याची टीका रुपाली जाधव यांनी केली. तर  शक्तिप्रदर्शन आणि स्वागत यात्रा यामुळे रस्ते बंद होतील म्हणून मुलीला घ्यायला शाळेत यावे लागले.

सर्व रस्ते बंद असल्याने घरी जाण्यासाठी कुठला पर्यायी रस्ता आहे? याविषयी पोलिसांना विचारणा केली तर त्यांच्याकडून अरेरावीची भाषा ऐकायला मिळाल्याबद्दल राजीव पाटील यांनी नाराजी व्यक्त केली.

समाधान खैरनार यांनी मुख्यमंत्र्यांच्या यात्रेमुळे अर्धा पाऊण तासापासून वाहतूक कोंडीत अडकून पडलो याविषयी त्रागा व्यक्त केला. घर हाकेच्या अंतरावर असताना लांबच्या मार्गाचा अवलंब करावा लागत आहे. सर्व कार्यालये, शाळा सुटण्याच्या वेळेत ही फेरी होत असल्याने नाहक त्रास होत असल्याचे खैरनार यांनी सांगितले.