‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ या ब्रीदाची अमलबजावणी करतांना नागरिकांना सुरक्षा आणि समाजकंटकांवर वचक निर्माण करण्यासाठी शहर पोलीस कटिबद्ध असले तरी समाजकंटकांसोबतच बेशिस्त वाहनचालकांची शहर परिसरात वाढणारी संख्या चिंताजनक आहे. त्यामुळेच वाहतूक नियम मोडणाऱ्यांना चपराक बसावी यासाठी लवकरच शहरात ‘ई-सेवा’च्या माध्यमातून बेशिस्त वाहनचालकांच्या थेट घरी वाहतूक नियम मोडल्याची पावती पाठविण्याची व्यवस्था करण्यात येत आहे.

सध्या शहर परिसरात नाक्यावर, चौफुलीवर वाहतूक पोलिसांकडून बेशिस्त वाहनचालक अर्थात हेल्मेट न घालणाऱ्यांना लक्ष्य करत त्यांच्यावर कारवाई सुरू आहे. तसेच, पुढील आसनावर प्रवासी वाहतूक करणारे किंवा आसन क्षमतेपेक्षा जादा प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी वाहनचालकांना लक्ष्य केले जात असल्याचे चित्र दिसत आहे. बऱ्याचदा या कारवाईत पोलीस आणि वाहनचालक यांच्यात वाद होतात. काही वेळा तर हे वाद खाकी वर्दीवर हात उचलण्यापर्यंत गेले आहेत. वाहनचालकाची चूक असतानाही पोलिसांवरच वेगवेगळे आरोप केले जातात. त्यामुळे  पोलिसांनी आता खबरदारीचा उपाय म्हणून ‘बॉडी वॉर्न’ कॅमेरे लावण्यास सुरुवात केली आहे. जेणेकरून वाहनचालकांनी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केल्यास ते न्यायालयात सिद्ध करता येईल. या सर्वात होणारा कालापव्यय आणि खर्च होणारी ऊर्जा, उपलब्ध असलेले मनुष्यबळ पाहता शहर वाहतूक पोलिसांनी आता पुढचे पाऊल उचलले आहे. शहरात ठिकठिकाणी वेगवेगळ्या कोनांतून ८०० सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहे. यातील २०० कॅमेरे हे वाहतूक व्यवस्थापनाअंतर्गत रस्ता चौफुली, सिग्नलसह अन्य ठिकाणी ज्यामध्ये वाहनचालकाचा चेहरा, त्याच्या गाडीचा क्रमांक स्पष्ट दिसतील, अशा ठिकाणी लावण्यात येणार आहेत. चालकाने झेब्रा क्रॉसिंगची मर्यादा ओलांडली, हेल्मेट घातले नाही, सीट बेल्ट लावले नाही, दुचाकीवरून तिघांचा प्रवास, सिग्नल तोडला तसेच आसन क्षमतेपेक्षा जादा प्रवासी भरणे, यावर सीसीटीव्ही देखरेख ठेवणार असल्याची माहिती  पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौघुले-शिंगे यांनी दिली. सीसीटीव्हीकडून होणाऱ्या चित्रीकरणाच्या माध्यमातून तसेच छायाचित्रांचा वापर करत बेशिस्त वाहनचालकाला घरपोच दंडाची पावती पाठविली जाईल. सोबत पुरावाही देण्यात येणार असल्याने वाद टळण्यास मदत होईल. यासाठी अत्याधुनिक प्रणाली तयार करण्यात आली असून ई-सेवाच्या माध्यमातून लवकरच ‘ई-कारवाईस’ वाहनचालकाला सामोरे जावे लागेल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.