‘सोशल फोरम’च्या मोहिमेस पेठ तालुक्यातील पाच टंचाईमुक्त गावांचा प्रतिसाद

अलीकडेच टँकरमुक्त झालेल्या वाजवड, वडपाडा, शेवखंडी, खोटारेपाडा आणि फणसपाडा या पेठ तालुक्यातील पाच गावांत २३०० रोपांची लागवड करण्यात आली. पाणीटंचाईचे चटके सहन करणाऱ्या या ग्रामस्थांच्या मानसिकतेत हा बदल घडविण्याचे कार्य सोशल नेटवर्किंग फोरमने केले आहे. पाण्याच्या बदल्यात वृक्ष संवर्धन ही संकल्पना टंचाईमुक्त झालेल्या गावांमध्ये प्रत्यक्षात आणली जाणार आहे.

Baramati farmer commits suicide by drinking poisonous medicine Allegation of neglect of government agencies
बारामतीत शेतकऱ्याची विषारी औषध पिऊन आत्महत्या, शासकीय यंत्रणांच्या दुर्लक्षामुळे आत्महत्या केल्याचा आरोप
Death of two brothers
पाण्याच्या टाकीत पडून दोन भावांचा मृत्यू: दाम्पत्यावर दुःखाचा डोंगर कोसळला असताना लगेचच झोपडीवरही कारवाई, न्यायालयाने घेतली दखल
Smuggling of liquor from Goa by vehicle stuff of worth 61 lakh seized
वाहनातून गोव्यातील मद्यसाठ्याची तस्करी, ६१ लाखाचा मुद्देमाल जप्त
Villager died in tiger attack
वाघाच्या हल्ल्यात गावकरी ठार, सहा वर्षांत ४२१ जण मृत्युमुखी

या पाच गावांमध्ये काही महिन्यांपूर्वी पाण्याचे प्रचंड दुर्भिक्ष होते. पाण्यासाठी तीन-चार किलोमीटपर्यंत पायपीट करावी लागत असे. आसपासच्या झऱ्यांवर हंडाभर पाण्यासाठी तासन्तास तिष्ठत बसावे लागे. या गावांची स्थिती लक्षात घेऊन संस्थेने समाजमाध्यमांवरील युवक आणि अन्य संस्थांच्या मदतीने या गावांचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडवला. पाणी योजनांचे लोकार्पण करताना आम्ही तुम्हाला पाणी दिले, यापुढे ग्रामस्थांनी गाव परिसरात जास्तीत जास्त झाडे लावण्याची संकल्पना ग्रामस्थांसमोर मांडायला सुरुवात केली. त्यास सर्वच गावकऱ्यांनी उत्तम प्रतिसाद देऊन आपापल्या गावात वृक्ष लागवड आणि संवर्धन करण्यास सुरुवात केली. पाचही गावांतील ग्रामस्थ, शाळकरी विद्यार्थ्यांनी प्रत्येकी दोन रोपांच्या संगोपनाची वैयक्तिक जबाबदारी स्वीकारली आहे.

मे आणि जून या दोन महिन्यांत पाच गावांतील ग्रामस्थांनी आपापल्या गावांत श्रमदानातून खड्डे खोदले. लागवडीसाठी काही रोपे गावकऱ्यांनी शासकीय रोपवाटिकांमधून मिळवली, तर काही फोरमने नाशिकच्या रोपवाटिकांमधून विकत घेऊन दिली. त्यानंतर या मोहिमेंतर्गत पाच गावांतील वाजवडला एक हजार, शेवखंडी, खोटारेपाडा, फणसपाडा येथे एक हजार आणि वडपाडा येथे ३०० रोपांची लागवड झाली.

फोरमचे अध्यक्ष प्रमोद गायकवाड, हरसूल प्रतिनिधी संदीप बत्तासे, वाजवडचे सुरेश दहावाड, वडपाडय़ाचे किसन पाटील, शेवखंडीचे गणपत गावित, पांडुरंग चौधरी, ज्ञानेश्वर गावित तसेच दुनियादारी कट्टा सदस्यांच्या उपस्थितीत वृक्ष लागवड मोहिमेस सुरुवात झाली. पाण्याच्या बदल्यात वृक्ष लागवड हा सोशल फोरमचा मूलमंत्र जपत पुढील काही वर्षांत ग्रामीण भागातील वृक्ष संपदा पुनरुज्जीवित होईल, असा विश्वास फोरमच्या सदस्यांनी व्यक्त केला. अशाच प्रकारचे नियोजन त्र्यंबक तालुक्यातील माळेगाव, हेदपाडा, पांगुळघर आणि सुरगाणा तालुक्यातील कोटंबी येथेही करण्यात येणार आहे.

हौस म्हणून अनेक लोक वृक्ष लागवड करतात, परंतु या पाचही गावांतील शाळकरी मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांसह सर्व गावकऱ्यांनी पुढील पाच वर्षे प्रत्येकी दोन रोपांच्या संगोपनाची वैयक्तिक जबाबदारी स्वीकारली आहे. हे या उपक्रमाचे वैशिष्टय़ आहे. या मोहिमेद्वारे आदिवासी भाग पुन्हा जंगलमय करण्याचा फोरमचा प्रयत्न आहे.   – प्रमोद गायकवाड, संस्थापक, सोशल नेटवर्किंग फोरम