महापालिकेच्या दोन योजना दुर्लक्षित

नाशिक : महानगरपालिकेच्या समाजकल्याण विभागाच्या वतीने अपंगांसाठी राबविल्या जाणाऱ्या १० पैकी अपंगांच्या पालकांना शिक्षण, प्रशिक्षणासाठी अर्थसाहाय्य आणि बहुविकलांगांना दुर्धर आजारावरील शस्त्रक्रिया, उपचारासाठी अर्थसाहाय्य या दोन योजनांना प्रतिसाद मिळालेला नाही. उर्वरित आठ योजनांमध्ये प्रौढ अपंगांना अर्थसाहाय्य आणि १० वर्षांपुढील अपंगांसाठी अर्थसाहाय्य या योजनेला अधिक प्रतिसाद लाभला. सर्व योजनांमधून आतापर्यंत ४७५ जणांना लाभ मिळाला. अटी-शर्तीची पूर्तता करू न शकणाऱ्या १०० जणांचे अर्ज अपात्र ठरले. उर्वरित अर्ज कागदपत्रांच्या अपूर्णतेमुळे प्रलंबित आहेत.

महानगरपालिकेच्या समाजकल्याण विभागाने अपंगांसाठी १० कल्याणकारी योजना कार्यान्वित केलेल्या आहेत. या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन या विभागाने केले आहे. महापालिकेच्या अंदाजपत्रकात अपंगांसाठी विशिष्ट प्रमाणात निधी राखून तरतूद करण्याचे बंधन आहे. परंतु तो निधी संबंधितांवर खर्च केला जात नसल्यावरून काही वर्षांपूर्वी महापालिकेत विद्यमान राज्यमंत्री बच्चू कडू आणि तत्कालीन आयुक्तांमध्ये जोरदार वाद झाले होते. या प्रकरणी पोलीस ठाण्यात कडू यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता. या घडामोडीनंतर महापालिकेने अपंगांसाठीच्या योजनांना चालना देण्यास सुरुवात केली. पुढील काही महिन्यांत अपंगांचे सर्वेक्षण आणि तत्सम बाबी पार पडल्या. अपंगांसाठी योजनाही कार्यान्वित केल्या गेल्या.

समाजकल्याण विभागांतर्गत कर्णबधिरांच्या शस्त्रक्रियेसाठी, अपंगांसाठी, बेरोजगार अपंगांसाठी, विद्यार्थ्यांच्या पालकांना शिक्षण, प्रशिक्षणाकरिता, अपंगांना शिष्यवृत्ती-व्यवसाय प्रशिक्षणाकरिता, अपंगांना साहाय्यभूत साधने-तंत्रज्ञानासाठी, विशिष्ट गरजा असणाऱ्या व्यक्तींना, मनपा क्षेत्रातील या क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था आणि संघटनांचे सक्षमीकरण, मेंदू पीडित तसेच बहुविकलांग (१० वर्षांपुढील) बालक, व्यक्ती अशांसाठी अर्थसाहाय्य योजना आहे. तसेच अपंग खेळाडू ज्यांनी राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रीडा स्पर्धेत विशेष प्रावीण्य मिळविले. अथवा अशा स्पर्धामध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या खेळाडूंना अर्थसाहाय्य करण्यात येणार आहे. या संदर्भात अर्ज घेऊन आवश्यक त्या संपूर्ण कागदपत्रांसह सादर करून जास्तीतजास्त अपंगांनी या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपायुक्त (समाजकल्याण) अर्चना तांबे यांनी केले.

अपंग व्यक्तींकरिता त्यांच्या पालकत्व कायद्यानुसार पालकत्व धारण केलेली व्यक्ती अर्ज करू शकते. या योजनांसाठी अपंगत्वाच्या प्रमाणपत्राची छायांकित प्रत, आर्थिक वर्षांत योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदारास कोणतेही शासकीय, निमशासकीय किंवा मनपामार्फत राबविण्यात येणाऱ्या अपंगांसाठीच्या योजनेचा लाभ घेतलेला नाही किंवा घेणार नाही या स्वरूपाचे स्वयंघोषणापत्र सादर करणे बंधनकारक आहे. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर अर्ज, कागदपत्रांची पूर्तता केल्यास त्या अर्जदारास लाभ देण्यात येणार आहे. दहापैकी दोन योजनांचा कोणी लाभ घेतलेला नाही. अपंगांच्या पालकांना शिक्षण, प्रशिक्षणासाठी अर्थसाहाय्य केले जाते. या योजनेचा लाभ घेण्यास पालक पुढे आलेले नाही. तसेच बहुविकलांग व्यक्तींना दुर्धर आजारासाठी मदत केली जाते. या योजनेंतर्गत केवळ चार ते पाच अर्ज प्राप्त झाले. आतापर्यंत सर्व योजनांसाठी ८०० जणांनी अर्ज केले. त्यातील ४७५ जणांना आठ योजनांचा लाभ मिळाला. जवळपास १०० जणांचे अर्ज अपात्र ठरले. उर्वरित अर्जात कागदपत्रांची अपूर्णता आहे. संबंधितांना त्याची पूर्तता करण्यास सांगण्यात आल्याचे समाजकल्याण विभागाने म्हटले आहे.