News Flash

एकतर्फी युती अशक्य

उद्धव ठाकरे यांचे प्रतिपादन; आगामी निवडणुकांत स्वबळावर लढण्याचे संकेत

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे यांचे प्रतिपादन; आगामी निवडणुकांत स्वबळावर लढण्याचे संकेत

राज्यात नजीकच्या काळात होणाऱ्या महापालिका व इतर निवडणुका शिवसेना स्वबळावर लढवेल, असे संकेत देतानाच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी युती एकतर्फी होणे शक्य नसल्याचे स्पष्ट केले. तसेच भाजप आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष सध्या युतीच्या मानसिकतेत नाहीत. दोन्ही पक्षांमध्ये युती होण्यास हिंदुत्व हा मुद्दा होता. परंतु तो मुद्दाही मागे पडला तर भाजपसोबत युती करणार नाही. भविष्यात भाजपशी युती करायची की नाही, हे कार्यकर्ते ठरवतील, असे उद्धव यांनी ठणकावले. येथे आयोजित शिवसेनेच्या उत्तर महाराष्ट्र पदाधिकारी मेळाव्यात उद्धव बोलत होते.

उत्तर महाराष्ट्र विभागीय शिवसेना पदाधिकारी व लोकप्रतिनिधींचे रविवारी येथे शिबीर झाले. यावेळी बोलताना उद्धव यांनी भाजप-शिवसेना युतीवर मतप्रदर्शन केले. ते म्हणाले की, ‘युतीची आवश्यकता दोन्ही पक्षांना हवी. मात्र, सध्या तसे दिसत नाही. युती होण्यास हिंदुत्व हा मुद्दा होता. मात्र, तोच बाजूला झाल्यास युती ही केवळ व्यावहारिक तडजोड ठरते. १९९४ मध्ये नाशिकला शिवसेनेचे अधिवेशन झाल्यानंतर राज्यात युतीची सत्ता आली होती. अशा या पवित्र शहरापासून सुरुवात केल्यावर यश हमखास मिळते म्हणून महाराष्ट्रभर आयोजित करण्यात येणाऱ्या शिबिरांना नाशिकपासून सुरुवात करण्यात आली. पक्षातील नवीन कार्यकर्त्यांना तसेच इतर पक्षांमधून प्रवेश केलेल्यांना शिवसेनेचे कार्य कसे आहे, शिवसेनेत कसे काम करावे, याविषयी मार्गदर्शनासाठी प्रामुख्याने अशा प्रकारच्या शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे’.

दुष्काळाचे राजकारण नको

दुष्काळ आणि टंचाईची परिस्थिती लक्षात घेता सर्वप्रथम महाराष्ट्राला सावरण्याची गरज आहे. त्यामुळेच या प्रश्नावर कोणत्याही प्रकारचे राजकारण न करता सर्वच पक्षांनी प्रयत्न करण्याची गरज आहे. मेंढेगिरी समिती असो किंवा इतर कोणत्याही समितीच्या अहवालाने काय म्हटले आहे यापेक्षा राज्यातील जनता तहानलेली असताना त्यांना त्वरित पाणी मिळणे महत्त्वाचे आहे. जनताच जर तहानलेली असेल तर सत्ता असली काय किंवा नसली काय. दारू महत्त्वाची की पिण्यासाठी पाणी हा प्राधान्यक्रम ठरवावाच लागेल, असेही ठाकरे यांनी स्पष्ट केले.

कन्हैयाकुमारचे जन्मदाते कोण ?

भारत हा तरुण देश आहे. युवावर्ग ही देशाची शक्ती असून ते देशाचे भवितव्य ठरवू शकतात. त्यांना मार्गदर्शन करण्याची गरज आहे. युवकांपैकी रोहित वेमुला गेला अन् कन्हैयाकुमार आला. कन्हैयाकुमारचा जन्म का झाला, त्याचे जन्मदाते कोण, याचा प्रत्येकाने विचार करण्याची वेळ आली असल्याचे नमूद करत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर शरसंधान साधले. हार्दिक आणि कन्हैयाकुमारला देशद्रोही ठरविण्यात आले. जो युवक येतो त्यास देशद्रोही ठरविले जात असल्याबद्दल ठाकरे यांनी चिंता व्यक्त केली.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 25, 2016 1:10 am

Web Title: uddhav thackeray targets bjp government
टॅग : Bjp,Uddhav Thackeray
Next Stories
1 सामाजिक लोकशाहीतूनच समताधिष्ठित समाज निर्मिती – रावसाहेब कसबे
2 भविष्यात युती करायची की नाही हे शिवसेना ठरवेल- उद्धव ठाकरे
3 शिवसेनेचे आज उत्तर महाराष्ट्र विभागीय शिबीर
Just Now!
X