पालिकेच्या कार्यशैलीबद्दल विक्रेत्यांचा रोष

बांधकाम व्यावसायिकाने आकाशवाणी केंद्रासमोरील भाजी बाजार रातोरात उद्ध्वस्त केल्यानंतर विक्रेत्यांनी सुरू केलेले आमरण उपोषण सलग दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारी सुरू राहिले. पालिकेच्या कार्यशैलीबद्दल रोष प्रगट करत मुख्यमंत्र्यांनी नाशिकला दत्तक घेतले की बिल्डरला, असा प्रश्न काहींनी उपस्थित केला आहे. दरम्यान, उपरोक्त जागेवर व्यापारी संकुल बांधून झाल्यावर अधिकृत विक्रेत्यांना पुन्हा जागा दिली जाईल. यामुळे संकुलाचे काम होईपर्यंत तात्पुरते स्थलांतर करावे, यासाठी महापालिकेने आंदोलकांची मनधरणी सुरू केली आहे.

गंगापूर रस्त्यावरील एसटी कॉलनी परिसरातील आरक्षित भूखंडावर सोमवारी मध्यरात्री बांधकाम व्यावसायिकाने जेसीबीच्या साहाय्याने खोदकाम करत आणि मोठे कंटेनर आणून या जागेवरील भाजी बाजार बंद पाडला. सायंकाळी खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांना या ठिकाणी झालेले बदल धक्का देणारे ठरले.

गंगापूर रस्त्यावर पालिकेचा कुठेही अधिकृत भाजी बाजार नाही. आकाशवाणीसमोरील जागेत खुद्द पालिकेने अधिकृत परवाने देऊन हॉकर्स झोनचा फलक उभारला. विक्रेत्यांना जागा वाटप केली. अकस्मात भाजी बाजार बंद झाल्यामुळे नागरिकांनी संतप्त भावना प्रगट केल्या. बाजार बंद झाल्याने एसटी कॉलनी, पंपिंग स्टेशन, सावरकरनगर, दादोजी कोंडदेवनगर, कॉलेजरोड आदी भागातील हजारो नागरिकांना भाजीपाला मिळेनासा झाला आहे. नागरिकांनी भाजी विक्रेत्यांना पाठिंबा देत स्वाक्षरी मोहीम राबवित निषेध सुरू केला आहे. भाजी बाजार पूर्ववत सुरू करण्याची लेखी मागणी त्यांनी केली आहे.

या संदर्भात सुनीता परांजपे यांनी गंगापूर रस्ता भागातील नागरिकांसाठी हा बाजार उपयुक्त असल्याचे मत मांडले. हा बाजार बंद झाल्यास ज्येष्ठ नागरिकांनी भाजी आणण्यासाठी कुठे जावे, असा प्रश्न उपस्थित केला. अकस्मात भाजी बाजार बंद झाल्यामुळे स्थानिकांची गैरसोय झाली असून तो पूर्ववत सुरू करावा, अशी मागणी ए. एन जाधव यांनी केली. डॉ. योगिनी पाटील यांनी विक्रेत्यांच्या कुटुंबाची रोजीरोटी या व्यवसायावर अवलंबून आहे. पालिकेने त्यांना योग्य जागा उपलब्ध करावी, याकडे लक्ष वेधले.

प्रकाश जाधव यांनी पालिका प्रशासनाचा धिक्कार केला. शासनाचा उद्देश बेरोजगारांच्या हाताला काम मिळावे हा असतो. बाजार हटविताना धनदांडग्यांचा विचार झाला. या कृतीमुळे शेकडो गरिबांचा रोजगार बुडाल्याचे जाधव यांनी म्हटले आहे. विशाल लोणारी यांनी भाजी बाजारावर रातोरात झालेल्या अतिक्रमणाचा निषेध केला. ही जागा भाजी बाजार वगळता अन्य कोणत्याही व्यवसायासाठी देऊ नये असे एच. एस. देवरे यांनी म्हटले आहे. भाजी बाजार गरजेचा आहे. पूर्वी नागरिकांना पंचवटीतील गोदा काठावरील बाजारात जावे लागत होते, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

दरम्यान, विक्रेत्यांनी आपले आंदोलन स्थगित करून तात्पुरते स्थलांतर करावे, यासाठी पालिकेच्या अधिकाऱ्यांनी आंदोलकांशी चर्चा केली. काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांनी आंदोलकांची भेट घेतली. उपोषण करणाऱ्या काही ज्येष्ठ आंदोलकांची प्रकृती खालावल्याने आंदोलनस्थळी रुग्णवाहिका आणण्यात आली आहे.

विक्रेत्यांनी तात्पुरते स्थलांतरित व्हावे

गंगापूर रस्त्यावरील आकाशवाणी केंद्रासमोरील भाजी बाजाराची जागा आणि त्यालगतची जागा ठक्कर डेव्हलपर्स यांच्या मालकीची आहे. या जागेत बांधकाम करण्यासाठी बांधकाम व्यावसायिकाने परवानगीसाठी प्रकरण सादर केले आहे. मात्र, त्यांच्या जागेपैकी काही जागा ही समावेशक आरक्षणांतर्गत ठक्कर डेव्हलपर्स हे महापालिकेला विकसित करून देणार आहेत. त्याशिवाय, त्यांना उर्वरित जागेत बांधकाम परवानगी देण्यात येणार नाही. भाजी बाजाराची जागा विकसित करून त्या ठिकाणी व्यवसाय करणाऱ्या नोंदणीकृत पथविक्रेत्यांना जागा नेमून दिली जाईल. या जागेत ठक्कर डेव्हलपर्सला काम सुरू करावयाचे असल्याने तूर्तास या ठिकाणी असणाऱ्या विक्रेत्यांनी त्यांना सुचविलेल्या पर्यायी जागेत तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतरीत होऊन महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. व्यापारी संकुलाचे काम पूर्ण होताच नोंदणीकृत फेरीवाल्यांना या ठिकाणी पुन्हा सामावून घेतले जाईल, असे पालिकेने म्हटले आहे.

 – महापालिका

भाजपकडून बिल्डरांना बळ

गोरगरीब भाजीपाला विक्रेत्यांचा व्यवसाय बंद करीत पालिकेतील सत्ताधारी भाजप बांधकाम व्यावसायिकांना बळ देण्याचे काम करीत असल्याची तक्रार भास्कर शिंदे यांनी केली.  व्ही. ए. कुलकर्णी यांनी महापालिका, भाजपच्या आमदारांनी हा प्रश्न सोडवावा, अशी मागणी केली. महापालिका निवडणुकीत मुख्यमंत्र्यांनी नाशिकला दत्तक घेतल्याचे जाहीर केले होते. सध्याच्या घडामोडी पाहिल्यास त्यांनी नाशिकला दत्तक घेतले की बांधकाम व्यावसायिकांना, अशी साशंकता व्यक्त करीत मंगेश लहामगे यांनी भाजी विक्रेत्यांना न्याय देण्याची मागणी केली.