पोलिसांकडून समाजकंटकांविरुद्ध कारवाई सुरू

विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी प्रशासनाची तयारी सुरू असताना राजकीय क्षेत्रात निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांचे तळ्यात-मळ्यात सुरू आहे. उमेदवारीवरून वातावरण तापलेले असताना निवडणुकीच्या रिंगणात कोण कोण उतरलेले आहे, हे चित्र शुक्रवारी स्पष्ट होईल. राजकीय अस्थिरतेमुळे प्रशासकीय पातळीवर पोलिसांनाही अद्याप संवेदनशील केंद्रे कोणती हे निश्चित करण्यास विलंब होत आहे. दुसरीकडे, नाशिक शहर आणि जिल्हा पोलिसांनी निवडणुकीच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी वेगवेगळ्या मोहिमा राबवत समाजकंटकांवर वचक बसविणे सुरू केले आहे.

निवडणूक काळात राजकीय वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी साम-दाम-दंड-भेद नीतीचा वापर पाहता या काळात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्न करत आहे. यासाठी शहर पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षक यांच्याशी समन्वय साधत प्रतिबंधात्मक उपाययोजना अंतर्गत सराईत गुन्हेगारांना तडीपार करणे, काहींवर स्थानबद्धतेची कारवाई करणे आदी उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. लोकसभा निवडणुकीच्या काळात जिल्ह्य़ात ६० मतदान केंद्रे संवेदनशील होती. परंतु, विधानसभा निवडणुकीच्या काळात ही संख्या वाढू शकेल. उमेदवार ज्या भागातून मतदान करणार ते केंद्रही संवेदनशील मानले जाते. राजकीय पक्षांकडून उमेदवारांची यादी प्रसिद्ध होत असताना बंडखोर, अपक्ष निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत.

शुक्रवारी अर्ज भरण्याचा अंतिम दिवस असल्याने सायंकाळी उशिराने निवडणुकीच्या रिंगणात कोण कोण आहे, या विषयी चित्र स्पष्ट होईल. त्यानंतर संवेदनशील केंद्रे निश्चित करण्यात येतील, असे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी सांगितले.

सराईत गुन्हेगारांसाठी वेगवेगळ्या उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. प्रशासनाकडून संवेदनशील मतदान केंद्रांवर विशेष लक्ष ठेवण्यात येणार असून त्यासाठी विविध पथके तैनात करण्यात आली आहेत.

१५०० गुन्हेगार

प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर पोलीस आयुक्तालयाकडून एमपीडीए कायद्यान्वये १० सराईत गुन्हेगारांवर स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. तसेच, राजकीय पाश्र्वभूमी असलेले, परंतु इतर गुन्हे दाखल असलेल्या १५०० लोकांची यादी तयार असून त्यांच्यावर वेगवेगळ्या कायद्यान्वये कारवाई करण्यात येईल. यामध्ये शांतता भंग करणारे, सराईत गुन्हेगार आदींचा समावेश प्रतिबंधात्मक कारवाईत करण्यात आला आहे. ज्यांच्याविरुद्ध दोन किंवा अधिक गुन्हे असतील अशा ४१ आरोपींविरुद्ध हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. उर्वरित आरोपींवर कारवाई प्रस्तावित आहे. पोलीस आयुक्त हद्दीत बेकायदेशीररीत्या अग्नीशस्त्र बाळगणाऱ्यांविरुद्ध २५ गुन्हे दाखल असून बेकायदेशीररीत्या धारदार शस्त्र बाळगणाऱ्या १५ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मोक्का कायद्यान्वये एकावर कारवाई करण्यात आली असून एक जणाविरुद्ध कारवाई प्रस्तावित असल्याची माहिती पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी दिली.