आरोग्य विद्यापीठाच्या दीक्षान्त सोहळ्यात विनोद तावडे यांची खंत
गेल्या काही वर्षांत अत्याधुनिक तंत्रप्रणालीचा अंगीकार करून अभ्यासक्रमात बदल करण्यात आले. शिक्षणाचा दर्जा सुधारला जात आहे. जेणेकरून बदलत्या काळात स्पर्धेत तग धरून संशोधनाला चालना मिळावी. मात्र आम्हाला विद्यार्थीच मिळत नाही. यामुळे ‘केम’ सारख्या रुग्णालयातील महत्त्वाचे वैद्यकीय अधिकारी पद रिक्त आहे. एकीकडे मागणी करायची आणि दुसरीकडे शिक्षण घेणारेच नसावे हा विरोधाभास असल्याची खंत शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केली.
येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या १७ व्या पदवीदान सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी राज्य शासनाच्या आरोग्य विभागाचे सचिव सरबजित सिंग, कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर, कुलसचिव काशिनाथ गर्कळ आदी उपस्थित होते. यावेळी तावडे यांनी चौफेर टोलेबाजी करत आपल्या मिश्कील स्वभावाचा प्रत्यय दिला. आज दीक्षान्त समारंभ आहे याचा अर्थ शिक्षणाचा अंत असा नसून दीक्षा देणे संपले शिक्षण सुरूच राहील. पदवी प्रदान सोहळ्यास राजकीय मंडळीपेक्षा त्या त्या क्षेत्रातील मान्यवरांना बोलावत त्यांचे व्याख्यान ठेवणे गरजेचे आहे. या दृष्टीने आमचे प्रयत्न राहतील असेही ते म्हणाले. समाजाने काही मोजक्याच क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या शिक्षणाशी संबंधित पदवी लावण्याचे अधिकार दिले आहे.
त्यात शिक्षण, विधी, संरक्षण व सुरक्षा खाते आणि वैद्यकीय यांचा समावेश आहे. समाजाप्रति आपण काही देणे लागतो, समाजाच्या आपल्याकडून काही अपेक्षा आहेत याची जाणीव त्यांना राहावी यासाठी हा अधिकार त्यांना आहे. हे अधिकार मिळत असताना ते पेलण्याची क्षमताही हवी. ही जबाबदारी आताच्या पिढीवर असल्याचे त्यांनी सांगितले.
वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी जपत आगामी काळातील आव्हाने काय असतील, अभ्यासातून त्या आव्हानावर काय संशोधन करता येईल, यावर कायमस्वरूपी उपाययोजना काय असतील याचा विचार करत पुढील वाटचाल करणे गरजेचे आहे. समाजातील प्रत्येक घटकाचा आपल्या शिक्षणात वाटा आहे याची जाणीव ठेवत तळागाळातील प्रत्येकासाठी काम करण्याची तयारी असावी असे आवाहन त्यांनी केले. कुलगुरू डॉ. म्हैसेकर यांनी विद्यापीठाच्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला. विद्यापीठ पुढील काळात योगाचा अभ्यासक्रम सुरू करत असून राज्यातील पहिले विद्यापीठ असे आहे जेथे योगावर स्वतंत्र अभ्यासक्रम सुरू होत असल्याचे त्यांनी सांगितले. तावडे यांच्या सहकार्याने विद्यापीठातील ८३ अतिरिक्त पदे मंजूर झाली असून शासकीय कर्मचाऱ्यांना सेवा निवृत्तिवेतन मंजूर झाल्याचे त्यांनी सांगितले.

तावडेंच्या कोपरखळ्या..
आज पदवीदान सोहळ्यास केंद्रीय आरोग्यमंत्री जगतप्रकाश नड्डा उपस्थित राहणार होते. त्यांचा रात्री फोन आला. उद्याच्या कार्यक्रमास मी अनुपस्थित राहिलो तर ‘नीट’ आणि ‘सीईटी’चा निकाल काही दिवसांवर पुढे ढकलला जाईल काय करू? मी त्यांना सांगितले ‘तिथेच राहा..’ कारण इथल्या तुमच्या उपस्थितीपेक्षा ‘सीईटी’ आणि ‘नीट’चा निकाल विद्यार्थ्यांना जास्त महत्त्वाचा आहे.

हे आयुर्वेदाचे विद्यार्थी
पदवीदान सोहळा आहे. कुठल्या शाखेचा विद्यार्थी यापेक्षा ते त्या शाखेतील शिक्षणाचा उपयोग शिक्षणासाठी कसा करता हे महत्त्वाचे आहे. तावडे यांच्या वक्तव्यानंतर कोपऱ्यात काही विद्यार्थ्यांनी टाळ्या वाजवल्या. हे टाळ्या वाजविणारे विद्यार्थी नक्कीच आयुर्वेदाचे आहेत असे तावडे यांनी सांगितले असता जोरदार हशा पिकला आणि टाळ्यांचा कडकडाट झाला. मी आयुर्वेदाचा विद्यार्थी नसलो तरी अचूक नाडी परीक्षण करता आले अशी टिप्पणीही त्यांनी केली.

टोपी आडवी आली..
मागील दीक्षान्त सोहळ्यापेक्षा यावेळी वेळ लागला. कारण पदवी, पदव्युत्तर पदवी प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना यावेळी जी टोपी देण्यात आली, त्यामुळे पदक घालताना अडचणी येत होत्या. ते पदक डोक्यातून व्यवस्थित घालताना टोपी आडवी येत होती.