News Flash

नाशिकमध्ये प्रजासत्ताक दिनी कार्यक्रमात अश्लील नृत्य

भाजप सहयोगी आमदारासह नगरसेवकांचीही उपस्थिती

नाशिक येथे आयोजित भोजपूरी गाण्यांचा कार्यक्रम.

भाजप सहयोगी आमदारासह नगरसेवकांचीही उपस्थिती

प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत  येथे आयोजित भोजपुरी गाण्यांच्या कार्यक्रमात युवतींनी अश्लील नृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला. या कार्यक्रमास भाजपचे सहयोगी आमदार डॉ. अपूर्व हिरे यांच्यासह सेना-भाजपचे काही नगरसेवकही उपस्थित होते. यावेळी काही उत्साही कार्यकर्त्यांनी पैशांची उधळण केल्याचे सांगितले जाते. हा घटनाक्रम सुरू असताना लोकप्रतिनिधींनी मौन बाळगल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. संयोजकांनी मात्र तसे काहीही घडले नसल्याचे म्हटले आहे.

सिडकोतील डीजीपीनगर येथील एका मंगल कार्यालयात शुक्रवारी सायंकाळी शिवसेनेशी संबंधित एकाने ‘भोजपुरी गित का रंगारंग कार्यक्रम’ या नावाने  सोहळ्याचे आयोजन केले होते. देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम असल्याने तो बघण्यासाठी गर्दी झाली होती. या ठिकाणीच हा प्रकार घडला. कार्यक्रमास भाजपचे आ. अपूर्व हिरे यांच्यासह सेना-भाजपचे काही नगरसेवक आवर्जुन उपस्थित होते. संयोजकांनी हिरे यांचा सत्कार केला. नंतर त्यांनी मनोगत व्यक्त केले. व्यासपीठावर तिरंगा ध्वज हाती घेऊन देशभक्तीपर गीतांवर काही युवती नृत्य करीत होत्या. काही वेळाने गाणी बदलली आणि युवतींच्या नृत्याचे स्वरुप बदलले. त्यांच्या नृत्यछटा महिलांसह काही प्रेक्षकांना खटकल्या. या कारणास्तव ते कार्यक्रम अर्ध्यावर सोडून निघून गेले. दुसरीकडे अश्लील नृत्याने सभागृहातील वातावरण बदलले. उत्साही कार्यकर्ते नाचू लागले. काहींनी व्यासपीठावर धडकत नृत्यात सहभाग घेतला. त्यांच्याकडून पैशांची उधळण झाल्याचे प्रत्यक्षदर्शीकडून सांगण्यात आले. परंतु, संयोजक बी. एल. श्रीवास्तव यांनी कार्यक्रमात पैशांची उधळण झाली नसल्याचा दावा केला. सहा वर्षांपासून या कार्यक्रमाचे आम्ही आयोजन करीत आहोत. नेहमीप्रमाणे यंदाही भक्तीगीत आणि राष्ट्रभक्तीपर गीतांचा कार्यक्रम पार पडल्याचे त्यांनी नमूद केले.

त्या घटनेची निंदा

कार्यक्रमाचे स्वरुप वा आयोजन विषयक बाबींशी आपला संबंध नाही. भोजपुरी समाजातर्फे आलेल्या निमंत्रणावरून लोकप्रतिनिधी म्हणून आपण तिथे केवळ दहा मिनिटे हजेरी लावली. दीप प्रज्वलन केले. भोजपूरी मंडळींचा आपल्या हस्ते सत्कारही झाला. नंतर मनोगत व्यक्त करून आपण निघून गेलो. पुढे संयोजकांनी काय कार्यक्रम केला, याची कुठलीही कल्पना नाही. कार्यक्रमात घडलेल्या प्रकाराची आपणही निंदा करतो. – आ. डॉ. अपूर्व हिरे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 28, 2018 3:03 am

Web Title: vulgar dance on republic day event in nashik
Next Stories
1 अग्निसुरक्षा वाऱ्यावर
2 मुद्रांक दरवाढीने ‘न्याय’ महाग
3 १० हजार विद्यार्थ्यांचे देशभक्तीपर समूहगान
Just Now!
X