वंजारी समाजास आरक्षण वाढवून मिळावे या मागणीसाठी क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक आरक्षण कृती समितीच्या वतीने बुधवारी येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मोर्चेकऱ्यांनी ‘आम्ही वंजारी वंजारी, आरक्षणाची घेऊ भरारी’ अशी घोषणा देत परिसर दणाणून सोडला. मोर्चामुळे वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली.

हातात झेंडे, डोक्यावर ‘आम्ही वंजारी’, ‘वाढीव आरक्षण’ असे लिहिलेल्या टोप्या घातलेले मोर्चेधारक ‘आम्ही वंजारी वंजारी, आरक्षणाची घेऊ  भरारी’ म्हणत टाळ मृदुंगच्या तालावर व्ही. एन. नाईक संस्थेच्या आवारात जमले. यावेळी नरेंद्र दराडे, किशोर दराडे, बाळासाहेब सानप या आमदारांसह नाईक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पंढरीनाथ थोरे आदी उपस्थित होते.

नरेंद्र दराडे यांनी लोकसंख्येच्या प्रमाणात वंजारी समाजाला वाढीव आरक्षण मिळावे, या मागणीसाठी वंजारी समाज एकवटला असल्याचे सांगितले. वंजारी समाजाला आरक्षण मिळावे म्हणून  प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात आंदोलन उभे करण्यासाठी मोर्चेबांधणी करण्यात आली आहे. आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत मोठय़ा संख्येने मोर्चे काढण्यात येतील, अशी माहिती दराडे यांनी दिली.

आरक्षण मागणीसाठी मोर्चात सहभागी झालेला प्रत्येक सर्वसामान्य माणूस वंजारी समाजाचा नेता आहे. राज्यातील प्रत्येक वंजारी समाजबांधवांच्या प्रगतीसाठी हे निवेदन सरकार दरबारी सादर केले जाईल. अधिवेशन सुरू होताच वंजारी समाजासाठी १० टक्के आरक्षण मंजूर करवून घेतले जाईल, असे आश्वासन यावेळी देण्यात आले.

मोर्चा व्ही. एन. नाईक शिक्षण संस्थेच्या आवारातून शहर परिसरात फिरून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. या मोर्चामुळे राजीव गांधी भवन परिसर तसेच गंगापूर रोड परिसरात काही काळासाठी वाहतूक विस्कळीत झाली. या काळात शाळा, महाविद्यालय भरण्याची आणि सोडण्याची वेळ असल्याने विद्यार्थ्यांसह पालकांना वाहतूक कोंडीला तोंड द्यावे लागले. मोर्चेकऱ्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन दिले.

निवेदनातील मागण्या

आरक्षण वाढवून देत असताना प्रवर्गातील अ, ब, क, ड वर्गवारी काढून टाकावी, ‘एनटी’साठी सरसकट एकच आरक्षण ठेवावे, राज्यात वंजारी जातीची जनगणना करण्यात यावी, विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वसतिगृह बांधण्यात यावे, एनटी-ड भटक्या जमातीसाठी नॉनक्रिमीलेयर प्रमाणपत्राची अट रद्द करावी, उद्योग व्यवसायासाठी बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून द्यावे, आश्रमशाळेतील भत्त्यांमध्ये वाढ करावी.