नाशिकजवळील ‘नीलमाती’ गावाचा भीषण जलआकांत
सकाळचे ११ वाजलेले असोत किंवा दुपारचे चार.. त्र्यंबकेश्वरपासून १९ किलोमीटर अंतरावरील नीलमाती या गावाजवळील सार्वजनिक विहिरीभोवती अनेक जण जमा होतात.. विहिरीत आधीच बहुतेकांनी दोरीच्या साहाय्याने बादली, प्लास्टिकचे डबे टाकून ठेवलेले. सर्वाच्या नजरा गावाकडे येणाऱ्या वाटेकडे लागलेल्या असतात.. नेहमीपेक्षा आज टँकर येण्यास काहीसा उशीर झाल्याने गर्दीची अस्वस्थता वाढते.. मग अचानक दूरवरून वाहनाचा आवाज ऐकू येतो.. मरगळलेल्या गर्दीत एकदम जिवंतपणा येतो.. झाडाखाली सावलीत बसलेलेही विहिरीकडे धावतात.. ‘टँकर आला रे..!’ ची हाक सगळीकडे पसरते. गावात टँकर आल्याची वार्ता पसरताच प्रत्येक घरातील लहान मोठे सर्वच जण जे भांडे हाती लागेल ते घेऊन विहिरीच्या दिशेने अक्षरश: जिवाच्या आकांताने धावू लागतो.. विहिरीकडे जाणाऱ्या वाटेवर फक्त हंडा, कळशी, बादली, पिंप दिसू लागतात. रणरणत्या उन्हात पाण्यासाठी जणू काही ‘कोण पुढे पळे तो’ अशी स्पर्धा लागते. समोर फक्त विहीर आणि पाणी हेच दिसत असताना अनवाणी धावतांना टोचणाऱ्या खडय़ांची अन् काटय़ांची कोणाला फिकीर असते.. नीलमाती गावाच्या पाणीदैनेचा हा शिरस्ता न संपणारा.. थकवून सोडणारा..
टँकर रिता होत नाही तोच विहिरीत आधीच सोडलेल्या बादल्या, प्लास्टिकचे डबे भराभर पाण्याने भरून वर खेचले जाऊ लागतात. लहान मुली टँकरमधून गळणारे थेंब थेंब पाणी बादलीत जमा करतात. विहिरीभोवती असलेल्या कठडय़ावर उभे राहून बादली ओढताना प्रत्येक जण ‘पाणी हेच जीवन’ असल्याचा अनुभव घेतो. किंचित जरी तोल गेला तरी जीवन देणारी विहीर ‘मौत का कुंवा’ होईल या भीतीचा कोणाच्याच चेहऱ्यावर मागमूसही नसतो. त्यांच्या लेखी हा दररोजच मरणाला हुलकावणी देणारा प्रसंग.दुष्काळ आणि तीव्र टंचाईमुळे सध्या ग्रामीण भागात फक्त पाणी याच विषयाची चर्चा होत आहे. ‘पाणीदार नेतृत्व’ असलेल्या गावांनी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था योग्य पद्धतीने करून घेतलेली. परंतु, अशा नेतृत्वाचा दुष्काळ असणारी गावे आजही तहानलेली आहेत. पावसाळा सुरू होईपर्यंत या गावातील गावकऱ्यांसमोर पाण्याशिवाय दुसरी कोणतीही चिंता नाही.

कित्येक वर्षांपासून निवडणुकीच्या वेळी गावातील पाणी समस्या दूर करण्याचे आश्वासन
पुढाऱ्यांकडून दिले जात आहे. परंतु, कोणीच समस्या दूर केली नाही.
– सुरेश ठाकरे, गावकरी