आज पाणीपुरवठा बंद, उद्या कमी दाबाने पाणी

नाशिक : बारा बंगला जलशुद्धीकरण केंद्रालगत पंचवटी विभागास पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीची दुरुस्ती तसेच इतर विभागांत पाणीपुरवठय़ाशी निगडित इतर कामांमुळे बुधवारी जवळपास संपूर्ण शहरातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. यामुळे शहराला पाणीबाणीला तोंड द्यावे लागणार आहे. गुरुवारी सकाळी कमी दाबाने पाणीपुरवठा होईल.

नाशिक पश्चिम विभागातील सिद्धार्थनगर झोपडपट्टी येथे पंचवटी विभागास पाणीपुरवठा करणारी ९०० मिलीमीटर व्यासाची वाहिनी नादुरुस्त झाली आहे. तिच्या दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेतले जाणार आहे. बारा बंगला जलशुद्धीकरण केंद्र, पंचवटी निलगिरी बाग, गांधीनगर जलशुद्धीकरण केंद्रावरून होणारा पाणीपुरवठा आणि नाशिकरोड तसेच सिडकोत अंबड येथे रस्ता वाहिन्यांचे काम प्रलंबित आहे. हे कामही बुधवारी केले जाणार आहे. यामुळे पंचवटी विभागासह नाशिक पश्चिम विभागातील प्रभाग क्रमांक सातमधील थत्तेनगर, सौभाग्यनगर, लोकमान्यनगर, पंडित कॉलनी, पाटील लेन, कॉलेज रोड, श्रीरंगनगर, जोशीवाडा, मल्हारखान झोपडपट्टी, अशोक स्तंभ, गंगावाडी, गोळे कॉलनी, रॉकेल गल्ली, मेहेर सिग्नल परिसर, घारपुरे घाट, रविवार पेठ, तसेच प्रभाग क्रमांक १२ मधील शरणपूर रोड, विसे मळा, होलाराम कॉलनी, टिळकवाडी, गडकरी चौक, सहवासनगर, कालिकामाता झोपडपट्टी, कुटे मार्ग, मातोश्रीनगर, सीबीएस परिसर, प्रभाग क्रमांक १३ मधील वकीलवाडी, घनकर लेन, फावडे गल्ली, सराफ बाजार, रविवार पेठ परिसर, गोरेराम लेन, मुरलीधर कोट, नेहरू चौक, भद्रकाली परिसर, दूध बाजार, पंचशीलनगर, गंजमाळ, एन. डी. पटेल रोड आदी परिसरांत आणि नाशिक पूर्वमधील जुने नाशिक, आगर टाकळी, द्वारका परिसर, नाशिक रोड विभागातील जय भवानी रोड, सदगुरूनगर, चव्हाण मळा, अश्विन सोसायटी, आशर इस्टेट, विहित गांव, आर्टिलरी सेंटर, लाम रोड आदी भागांत बुधवारी पाणीपुरवठा होणार नसल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाने दिली आहे. गुरुवारी कमी दाबाने पाणीपुरवठा होईल.

मुख्य जलवाहिनी आणि इतर भागांतील अन्य कामांमुळे शहरास पाणी टंचाईला तोंड द्यावे लागण्याची शक्यता आहे. सुमारे १२५ जलकुंभातून शहरास पाणीपुरवठा केला जातो. तीव्र टंचाईला सामोरे जावे लागू नये म्हणून हे जलकुंभ सायंकाळी भरून घेतले जातील. सकाळी शक्य त्या भागात पाणी उपलब्ध केले जाईल, परंतु दुरुस्ती काम सुरू झाल्यानंतर पाणीपुरवठा पूर्णपणे बंद होईल. वेगवेगळ्या भागांतील कामे लक्षात घेतल्यास जवळपास संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

मंगळवारी शहरातील १२५ जलकुंभात पाणी भरून घेतले जाईल. सकाळी ज्या भागात पाणीपुरवठा होतो, तिथे हे पाणी देऊन दिलासा देण्याचा प्रयत्न आहे. शहरात काही भागांत सकाळी, काही भागांत दुपारी तर काही भागांत सायंकाळी पाणीपुरवठा होतो. एकूण क्षेत्राच्या साधारणत: ३० टक्के भागात सकाळी पाणीपुरवठा होतो.

– पी. व्ही. चव्हाण (पाणीपुरवठा विभाग, मनपा)