आर्थिक तपशील देण्यास धर्मादाय आयुक्त कार्यालयाची टाळाटाळ

धर्मादाय आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली मे महिन्यात येथील चोपडा लॉन्स परिसरात झालेल्या सामुदायिक विवाह सोहळ्याचे राज्यात सर्वत्र गोडवे गायले गेले. मात्र या उपक्रमासाठी किती निधी संकलित झाला, त्यातील किती रक्कम वापरली गेली यासह अन्य काही महत्त्वपूर्ण विषय उपस्थित होत असताना धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडून जबाबदारी झटकण्यात आली आहे. या संदर्भातील तपशील जाहीर करण्यास धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडून टाळाटाळ होत असल्याचा आरोप रमेश जुन्नरे यांनी केला आहे.

मे मध्ये चोपडा लॉन्सवर धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांच्या उपस्थितीत आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील इच्छुक वधू-वर तसेच समाजातील वंचित घटकांतील वधू-वरांचा सामुदायिक विवाह सोहळा झाला. सोहळ्यास आशीर्वाद देण्यासाठी समाजातील प्रतिष्ठित पदाधिकाऱ्यांसह पाच हजार वऱ्हाडी मंडळी उपस्थित होते. यासाठी अंदाजे ५० ते ६० लाख रुपये खर्च आला. प्रत्येक जोडप्याचे कपडे, मंगळसूत्र (अर्धा तोळा), संसारोपयोगी साहित्य, जोडप्यांच्या १०० वऱ्हाडय़ांची जेवणाची व्यवस्था अशी सुविधा सामुदायिक विवाह सोहळ्यात उपलब्ध करून देण्यात आली होती. यासाठी प्रत्येक जोडप्याकरिता ५० ते ६० हजार रुपये खर्च अपेक्षित होता. समारंभ होऊन नऊ महिन्यांहून अधिक कालावधी लोटला असला तरी या सोहळ्याचा आर्थिक ताळेबंद, जमा झालेली लाखो रुपयांची रक्कम आणि झालेला खर्च याचा हिशेब कोठेही जाहीर झाला नसल्याकडे जुन्नरे यांनी लक्ष वेधले आहे.

जुन्नरे यांनी माहिती अधिकार अंतर्गत याबाबत माहिती मागवली असता धर्मादाय सहआयुक्त (नाशिक) यांनी ही माहिती देण्यास टाळाटाळ करीत माहिती समिती अध्यक्षांकडे उपलब्ध असेल, असे नमूद केले. वास्तविक यावर सहधर्मादाय आयुक्तांचे नियंत्रण अपेक्षित आहे. मात्र त्यांनी सर्व जबाबदारी सामुदायिक विवाह सोहळा समितीकडे सोपविल्याने याविषयी त्यांच्याकडे कुठलीच माहिती उपलब्ध नाही, असे माहिती अधिकार अंतर्गत केलेल्या अर्जाला उत्तर देताना स्पष्ट करण्यात आले आहे.

दुसरीकडे, समिती सदस्यांनी सामुदायिक विवाह सोहळा समिती ही माहिती अधिकाऱ्याच्या कार्यकक्षेत येत नसल्याने याबाबत कोणाला काही माहिती उपलब्ध करून देण्याचा प्रश्न उपस्थित होत नाही. तसेच या संदर्भातील ‘ऑडिट’ पूर्ण होत आले असून लवकरच याविषयी माहिती जाहीर केली जाईल, असे समितीकडून सांगण्यात आले.

समितीने काही प्रश्नांची उत्तरे द्यावीत

धर्मादाय आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली निवडण्यात आलेल्या समिती सदस्यांची निवड कुठल्या निकषांवर झाली, विवाह सोहळ्यास कोणकोणत्या संस्थांनी किंवा व्यक्तींनी देणग्या दिल्या, विवाह सोहळ्यासाठी एकूण जमा झालेली रक्कम, झालेला खर्च समितीने कोणाकडे सादर केला, याची माहिती आणि संपूर्ण जमा-खर्च जाहीर करावा, सामूहिक विवाह सोहळ्यात काही व्यावसायिकांनी मदत केली. ती कुठल्या निकषावर. या सेवेसाठी त्यांना कुठल्या निकषावर रक्कम अदा करण्यात आली, ही सेवा स्वीकारताना धर्मादाय आयुक्तालयाच्या नियमानुसार जाहिरात देत निविदा मागविण्यात आल्या होत्या का, हा विवाह सोहळा सामुदायिकरीत्या करण्यासाठी, विवाह सोहळ्यासाठी आलेल्या देणग्या कोणत्या व्यक्ती अथवा पदाधिकाऱ्यांकडे, ही रक्कम कशा स्वरूपात स्वीकारली गेली, आदी प्रश्नांची उत्तरे देण्यात यावीत.    – रमेश जुन्नरे (तक्रारदार)

समितीकडून माहिती घ्यावी

सामुदायिक विवाह सोहळ्याच्या आर्थिक नियोजनासह अन्य नियोजनाची माहिती ही नेमून दिलेल्या समितीच्या अध्यक्षांकडून घ्यावी. यामध्ये केवळ विवाह नियोजनात धर्मादाय आयुक्त कार्यालयाचा सहभाग होता. आर्थिक किंवा अन्य बाबींशी कार्यालयाचा संबंध नव्हता. ही सर्व कामे समितीने पार पाडली आहेत.    – बुवा (धर्मादाय सहआयुक्त कार्यालय, माहिती अधिकारी)