पोलिसांचा कोणताही धाक न उरल्याने शहरात गुंडगिरीने थैमान घातले असताना डोक्यात मुसळी घालत चाकूने वार करून महिलेसह तिच्या सहा वर्षांच्या चिमुरडय़ाची हत्या केल्याची घटना रविवारी रात्री उघडकीस आली. श्रमिकनगर परिसरात हे हत्याकांड घडले आहे. हत्येचे कारण समजू शकलेले नाही. या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
श्रमिकनगर परिसरात कचरू संसारे हे पत्नी पल्लवी, तीन मुली आणि मुलगा विशाल यांच्यासह एका खोलीत राहतात. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने मुली अहमदनगर येथील आश्रमशाळेत शिक्षण घेत आहेत. रविवारी रात्रपाळी असल्याने संसारे कामावर गेले असता घरी पल्लवी व मुलगा विशाल हे दोघेच होते. ही संधी साधत संशयितांनी घरात प्रवेश केला. पल्लवी व विशाल यांच्या डोक्यात मुसळी घालत हत्याराने त्यांच्यावर वार केले. त्यानंतर संशयिताने पलायन करताना घराला बाहेरून कुलूप लावून घेतले. कचरू संसारे सोमवारी सकाळी कामावरून परतल्यावर घराला कुलूप पाहून हैराण झाले. बंद दाराच्या फटीतून आतमध्ये डोकावले असता संसारे यांचा थरकाप उडाला. रक्ताच्या थारोळ्यात पत्नी आणि मुलाचा मृतदेह पाहून संसारे यांनी आक्रोश करताच परिसरातील लोकांनी घराकडे धाव घेतली. या हत्याकांडामागे अनैतिक संबंध हे कारण असल्याची चर्चा असून संसारे यांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.