जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिन विशेष * सॅनिटरी नॅपकिनमुळे जंतुसंसर्ग आणि अन्य तक्रारी  

नाशिक : मासिक पाळीच्या त्या चार  दिवसांत वापरण्यात येणाऱ्या सॅनिटरी नॅपकिनमुळे पर्यावरणाला धोका निर्माण होत आहे. महिलांचे आरोग्य आणि पर्यावरण संवर्धनासाठी महिलांनी कापडी पॅड किंवा मासिक धर्म कप वापरावा, असा आग्रह पर्यावरणप्रेमींकडून करण्यात येत आहे.

जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिनाच्या पार्श्वभूमीवर महिलांना त्या चार दिवसांत होणाऱ्या त्रासाविषयी आणि हा त्रास कमी करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या साधनांविषयी तज्ज्ञांनी मत मांडले आहे. महिन्यातील चार दिवसांचा त्रास महिलांसाठी असह्य़ असतो. दडपण, समाज मनाची भीती त्यामुळे  याविषयी फारशी चर्चा होत नाही. बदलत्या काळात चार दिवसांत वापरण्यात येणाऱ्या कपडय़ाची जागा पॅडने घेतली. कपडे धुण्याच्या कंटाळ्यामुळे महिला मासिक पाळीत सॅनिटरी पॅड वापरतात. मुळात हे पॅड प्लास्टिक आणि हानिकारक रसायनांपासून बनविले आहेत. पाळीदरम्यान याचा वापर केल्याने खाज येणे, घाम येणे, जंतुसंसर्ग होणे अशा अनेक तक्रारी निर्माण होतात. याशिवाय पॅडच्या वापरामुळे कर्करोग होण्याचा धोका असतो. दुसरीकडे वापरलेले पॅड फेकून दिल्यावर कचरा विभाजन करणाऱ्या कामगारांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते, याकडे मेडफेमच्या सहसंस्थापिका अश्विनी चौमाल यांनी लक्ष वेधले.

पॅडच्या वापरामुळे महिलांचे आरोग्य ढासळत असून पर्यावरणाला हानी पोहोचत असल्याचा विषय डॉ. वैभव दातरंगे यांनी मांडला. पॅडमुळे निर्माण होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यास कोणतीही यंत्रणा नसल्याने मोठय़ा प्रमाणावर कचरा निर्माण होत आहे. हा कचरा जनावरे खात असल्याने ते आजारी पडतात. तो कचरा जाळला तर मोठय़ा प्रमाणावर वायुप्रदूषण होते. त्यामुळे मासिक धर्म कापड आरोग्यास लाभदायक असून पुनर्वापरास योग्य आहे. मासिक स्राव त्वचेच्या संपर्कात येत नसल्याने त्यामुळे कोणत्याही प्रकारचे जंतुसंक्रमण होत नाही. कसलीही दुर्गंधी नाही. कापडी पॅडही उत्तम पर्याय असल्याचे चौमाळ यांनी नमूद केले.

आज थेट संवाद

नाशिक येथील मेडलाइफ फाऊंडेशनच्या वतीने मासिक पाळीसंदर्भात, येणाऱ्या समस्या, वापरावयाच्या साधनांविषयी शंकांचे निरसन व्हावे आणि समाजातील प्रत्येकापर्यंत आरोग्य संदेश पोहोचावा यासाठी जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिनाचे औचित्य साधत गुरुवारी दुपारी तीन वाजता फेसबुकच्या माध्यमातून थेट संवाद आयोजित करण्यात आला आहे. या वेळी पर्यावरण संवर्धन आणि आरोग्य जपवणूक याची शपथ घेण्यात येणार आहे.