News Flash

‘गोटय़ा’मध्ये नाशिकच्या २४२ कलाकारांची फौज

चित्रपट कलासृष्टीत मुंबई, पुणेसह नाशिकचाही टक्का वाढला

चित्रपट कलासृष्टीत मुंबई, पुणेसह नाशिकचाही टक्का वाढला

मराठी नाटय़-चित्रसृष्टीबरोबरच दूरचित्रवाणीवरील मालिकांमध्ये मुंबई, पुणेसह आता नाशिककरांचा टक्का दिवसेंदिवस वाढू लागला आहे. ‘यंग्राड’ आणि ‘गोटय़ा’ या दोन चित्रपटांनी हे दाखवून दिले आहे.  ‘गोटय़ा’ चित्रपटाचे दिग्दर्शन नाशिकचे भगवान पाचोरे यांनी केले असून नाशिकच्या तब्बल २४२ कलाकारांना त्यांनी संधी दिली आहे. चित्रीकरणही नाशिकसह जिल्ह्य़ातील पास्ते, सिन्नर येथे झाले आहे.

बदलत्या काळाबरोबर खेळही बदलले आहेत. ‘हुतूतू’, ‘लपंडाव’, ‘आंधळी कोशिंबीर’, ‘विटी दांडू’, लगोरी हे पारंपरिक खेळ दुर्मिळ होण्याच्या मार्गावर आहेत. काही अपवाद वगळता हल्लीची मुले हे खेळ फारसे खेळताना दिसत नाही. आजच्या पिढीला विस्मृतीत गेलेला ‘गोटय़ा’ हा असाच खेळ. गल्लीतल्या खेळाने आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत घेतलेली धाव असा रंजक प्रवास ‘गोटय़ा’ चित्रपटात मांडण्यात आला असल्याचे दिग्दर्शक भगवान पाचोरे यांनी सांगितले.

नाशिकमध्ये आपली जडणघडण झाली असून शहरातील अनेक कलावंत रूपेरी, चंदेरी पडद्यावर झळकत आहेत, असे असतांना  आजही शहरात कलावंतांमध्ये स्पर्धा नसल्याची  खंत पाचोरे यांनी व्यक्त केली. स्पर्धेसाठी शहरात पोषक वातावरण निर्माण व्हावे या उद्देशाने दिग्दर्शन क्षेत्रात उतरल्याचे त्यांनी नमूद केले.

गोटय़ामध्ये नाशिककर कलाकारांना संधी देण्यात आली असून बहुतांश चित्रीकरणही जिल्ह्य़ातच करण्यात आले आहे. नाशिकसह जिल्ह्य़ातील छायाचित्रणाच्या दृष्टीने आकर्षक असणारी स्थळे या चित्रपटातून पुढे येत असल्याचे पाचोरे यांनी नमूद केले. खास मुलांच्या भावविश्वाशी जोडल्या जाणाऱ्या मातीतल्या या खेळांमुळे रंजनातून मुलांमधील सर्जनशीलता, त्यांची विचारक्षमता आणि विवेक वाढीस लागतो, हा विचार सर्वदूर पोहचविण्याचा प्रयत्न असल्याचे पाचोरे यांनी मांडले.

संगीतकार अवधूत गुप्ते यांनी चित्रपटाची गाणी संगीतबद्ध केली आहेत.

पाचोरे यांनी लिहिलेल्या ‘चला सारे जग जिंकू या’, ‘ढाय लागली’, ‘गोल गोल गोटीचा गोल’ ‘गोटीवर गोटी’ या गाण्यांना अवधूत गुप्ते, बेला शेंडे, आदर्श शिंदे, जसराज जोशी, कौस्तुभ गायकवाड, आकाश आगलावे यांचा स्वर लाभला आहे. चित्रपटात ऋषिकेश वानखेडे, राजेश शृंगारपुरे, सयाजी शिंदे, आनंद इंगळे, कमलाकर सातपुते, सुरेखा कुडची, हेमांगी राव, शरद सांखला, शशांक दरणे, पौर्णिमा आहिरे आदी कलाकारांच्या भूमिका आहेत.

छायांकन बाशालाल सय्यद यांनी केलं असून, राहुल भातणकर यांनी संकलन केलं आहे. नृत्य दिग्दर्शन गणेश आचार्य यांचे आहे. कलादिग्दर्शन संदीप इनामके यांचे आहे. रंगभूषा ललित कुलकर्णी यांची तर वेशभूषा नामदेव वाघमारे यांची आहे. बाबासाहेब पाटील आणि विशाल चव्हाण या सिनेमाचे कार्यकारी निर्माते आहेत.

खेळाचा गल्ली ते आंतरराष्ट्रीय प्रवास

गोटय़ा चित्रपटाची कथा अत्यंत साधी, सरळ आहे. प्रत्येक जण आपल्या लहानपणी गोटय़ांचा खेळ खेळले आहेत. आता खेळाचे रूप बदलल्याने मातीतील खेळ मागे पडले. एक शाळकरी मुलगा गोटय़ा खेळण्यात पटाईत असतो. त्याने अभ्यासात गती धरावी यासाठी खेळापासून परावृत्त करण्यासाठी पालक प्रयत्न करतात. मात्र शाळेचे क्रीडा प्रशिक्षक आणि त्याची गट्टी जमल्याने गोटय़ा या खेळात गल्ली ते आंतरराष्ट्रीय पातळीवर कसा प्रवास करतो, ते चित्रपटात मांडण्यात आल्याचे पाचोरे यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 4, 2018 12:12 am

Web Title: youngraad gotya marathi movies
Next Stories
1 बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी अभियंत्याला अटक
2 सप्तशृंग गडाच्या विकासाला प्राधान्य
3 भाम धरणग्रस्तांचा जीव टांगणीला
Just Now!
X