जळगाव : शहरासह परिसरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. भटक्या कुत्र्यांनी बंद गोठ्यातील ११ बकर्‍यांवर हल्ला करुन त्यांचा फडशा पाडल्याची धक्कादायक घटना जळगावमधील आसोदा रस्त्यावरील वाल्मीकनगर भागात घडली. मालकाचे दीड ते दोन लाखांचे नुकसान झाले आहे.

जळगावमधील आसोदा रस्त्यावरील वाल्मीकनगर परिसरातील रहिवासी प्रकाश कोळी यांच्या मालकीच्या ११ बकर्‍या शनिवारी रात्री त्यांच्या घरानजीकच्या गोठ्यात बांधण्यात आल्या होत्या. मध्यरात्री मोकाट कुत्र्यांनी गोठ्यात घुसून बकर्‍यांवर हल्ला करून त्यांचा फडशा पाडला. हा प्रकार रविवारी सकाळी उघड झाला. सर्व बकऱ्या मृत्युमुखी पडल्याचे दिसताच प्रकाश कोळी यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांना  मोठा धक्का बसला. मोकाट कुत्र्यांमुळे कोळी यांचे दीड ते दोन लाखांचे नुकसान झाले आहे. तलाठी राहुल सोनवणे यांनी पाहणी करून घटनेचा पंचनामा केला. शासनाकडून तातडीने आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी कोळी कुटुंबियांकडून करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही.

हेही वाचा >>>नाशिकमध्ये रहाडींमध्ये डुंबण्याची चढाओढ यासाठी…

दरम्यान, शहराच्या अनेक भागांत मोकाट कुत्र्यांचा उच्छाद वाढला आहे. लहान मुलांच्या अंगावर हल्ला करण्याचे प्रकार घडत आहेत. रात्री-अपरात्री मोकाट कुत्र्यांच्या पाठलागामुळे दुचाकीधारकांची अनेक भागातून जाताना पाचावर धारण बसते. मोकाट कुत्र्यांनी अनेकांचे जीव गेले आहेत. एमआयडीसीतील विविध कंपन्यांतून रात्रपाळी करून कर्मचारी, कामगार दुचाकीवरून घरी परतताना मोकाट कुत्री पाठलाग करतात. त्यामुळे अनेकांना अपघात होतात. तसेच चावाही घेतल्याच्या घटना घडल्या आहेत. महापालिकेला वारंवार मोकाट कुत्र्यांच्या समस्यांबद्दल कळविले जाते. कुत्र्यांना पकडण्यासाठी वाहन पाठविण्याची मागणी केली जाते. मात्र, वाहन वेळेवर पाठवले जात नाही. महापालिका प्रशासनाच्या दुर्लक्षपणामुळे मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी जळगावकरांकडून केली जात आहे.