आरोग्य तपासणी अभियानात प्रश्न उघड

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महापालिकेने ‘स्वस्थ मुलं. स्वस्थ नाशिक’ उपक्रमांतर्गत शाळा व अंगणवाडीतील विद्यार्थ्यांच्या राबविलेल्या आरोग्य तपासणी अभियानांतर्गत १३०० विद्यार्थ्यांना विशेष उपचारांची गरज असल्याचे समोर आले आहे. या अभियानात महापालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांसह अंगणवाडीतील बालके अशा एकूण ३४ हजार विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. काहींना प्राथमिक उपचारासाठी औषधे देण्यात आली. यातील १३०० विद्यार्थ्यांना विशेष उपचारांची गरज असून लवकरच जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या सहकार्याने संबंधितांवर मोफत उपचार करण्यात येणार आहे. तपासणीत काही बालकांना त्वचाविकार, काहींना दंत, नेत्र, हृदय तसेच मानसिक आजार असल्याचे निष्पन्न झाले. याबाबत पालकांचे प्रबोधन सुरू असून हे आजार तसेच उपचाराची आरोग्यपत्रिकेत नोंद केली जात आहे.

पालिकेच्या आरोग्य विभागाने राबविलेल्या अभियानासाठी वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी यांचे सहा स्वतंत्र पथक तयार करण्यात आले. त्यात २४ वैद्यकीय अधिकारी, सहा औषधनिर्माणशास्त्र तज्ज्ञ, सहा परिचारिका यांचा समावेश होता. ऑक्टोबर व नोव्हेंबरमध्ये झालेल्या या अभियानात बालकांचे वजन, उंची, हृदय, पोट व नेत्रविकार, कान, नाक, घसा यांचे आजार, दंत आजार, त्वचारोग, सांधेदुखी, जीवनसत्त्वाची कमतरता, रक्ताक्षय, झटके येणे, मनोविकार, बहुविकलांग, स्वमग्न, सेलेब्रल पाल्सी आदींची तपासणी करण्यात आली. संबंधित तपासणीची नोंद त्या त्या विद्यार्थ्यांला दिलेल्या आरोग्यपत्रिकेत करण्यात आली आहे. या कालावधीत किरकोळ आजारांवर तत्काळ उपचार करण्यात आले.

तपासणीत १३०० विद्यार्थ्यांना विशेष उपचारांची गरज असल्याचे लक्षात आले. त्यात काही बालकांवर हृदयाशी निगडित आजार, त्वचाविकार, दात, कान, नेत्रविकार तसेच मानसिक आजार असल्याचे आढळले आहे. विशेष उपचारांची गरज असलेल्या विद्यार्थ्यांवर महापालिका आरोग्य विभाग व जिल्हा शासकीय रुग्णालय यांच्यामार्फत पुढील उपचार सुरू होणार आहेत. २३ व २४ डिसेंबर रोजी आरोग्य अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली झाकीर हुसेन रुग्णालयात १३०० जणांची पुन्हा तपासणी होणार आहे. संबंधितांचा आजार कोणत्या टप्प्यात आहे, याआधी त्यावर काही उपचार झाले असतील तर त्याची कागदपत्रे, त्यांना तातडीने उपचार सुरू करण्यासाठी आवश्यक औषधे देण्यात येणार आहे. तसेच पालकांचे प्रबोधन करण्यात येणार असून यातील विशेष बालकांवर राजीव गांधी योजनेंतर्गत मोफत उपचार करण्यात येणार असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जितेंद्र धनेश्वर यांनी सांगितले.

बहुतांश विद्यार्थ्यांमध्ये रक्ताची कमतरता

महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना विविध आजारांची लागण झाल्याचे समोर आले. त्यात त्वचाविकारामध्ये सोरायसिस व फंगल इन्फेक्शन, दंत तपासणीत दाढा किडलेल्या, हिरडय़ांना सूज, नेत्रविकारात तिरळेपणा, कमी नजर, मोतीबिंदूचा त्रास, टॉन्सिल, सहा विद्यार्थ्यांना हृदयाशी संबंधित आजार, बहुतांश विद्यार्थ्यांमध्ये रक्ताक्षय अर्थात रक्ताची कमतरता आणि काही विद्यार्थ्यांना मानसिक आजार असल्याचे समोर आले आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 1300 municipal school students suffer with diseases
First published on: 16-12-2016 at 03:23 IST