लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नाशिक : काँग्रेसने पाच न्याय योजना आणि वचननामा जाहीर केल्यानंतर भाजपच्या पायाखालची वाळू सरकली आहे. लोकसभा निवडणुकीत पराभव दिसू लागल्यामुळे विकास, शेतकरी, महागाई, बेरोजगारीच्या मुद्यांवर न बोलता भाजपकडून प्रचारात धर्माचा वापर आणि मंगळसूत्राचा विषय घेऊन जनतेची दिशाभूल आणि महिलांचा अपमान केला जात असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते राजेंद्र बागूल आणि शहराध्यक्ष आकाश छाजेड यांनी पत्रकार परिषदेत केला.

काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर अलीकडेच भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी यांनी येथे पत्रकार परिषदेत टिकास्त्र सोडले होते. देशाची सामाजिक घडी पूर्णपणे मोडून केवळ मुस्लिमांच्या लांगूलचालनाचे घातक राजकारण उघडे पडल्यामुळे आता काँग्रेस हादरून गेली असून, संपत्तीचे फेरवाटप करण्याचा माओवादी कट काँग्रेसने रचल्यामुळे सावध राहणे गरजेचे आहे, असे आवाहन भंडारी यांनी केले होते. त्यांच्या विधानाचा निषेध करीत काँग्रेसने प्रत्युत्तर दिले. स्वत:च्या पक्षात दुर्लक्षित झालेले नेते शहरात येऊन बेताल वक्तव्य करतात. काँग्रेसने महिलांची सुरक्षा, महालक्ष्मी महिला योजनेच्या निमित्ताने महिलांना सुरक्षित उत्पन्न, बेरोजगार युवकांच्या हाताला काम, शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव आणि जातनिहाय जनगणना व्हावी, आदी मुद्दे घेऊन वचननामा जनतेसमोर ठेवला आहे. स्वतःच्या जाहीरनाम्याबद्दल न बोलता काँग्रेसच्या वचननाम्याविषयी बोलण्याइतकी वाईट परिस्थिती भाजप नेत्यांवर आल्याकडे बागूल आणि छाजेड यांनी लक्ष वेधले.

आणखी वाचा-निवडणुकीत संशयास्पद आर्थिक व्यवहारांवर नजर ठेवा, खर्च निरीक्षकांची सूचना

काँग्रेसच्या वचननाम्यात मंगळसूत्र अथवा जनतेची संपत्ती याबाबत कुठलाही उल्लेख नसताना भाजप नेत्यांची विधाने त्यांची असाक्षरता दर्शवित आहेत. जिल्ह्यात दोन खासदार, नाशिकमध्ये तीन आमदार आणि ७० नगरसेवक असूनही भाजपमध्ये एकमत नाही. त्यांच्यातील असमन्वयामुळे नाशिकमध्ये महायुतीला अजूनही उमेदवार मिळत नसल्याचा टोला छाजेड यांनी हाणला. स्मार्ट सिटीच्या नावाखाली चाललेली लूट, वाढती गुन्हेगारी, अमली पदार्थांचा सुळसुळाट असे स्थानिक मुद्दे घेऊन काँग्रेसचे पदाधिकारी प्रचारात उतरणार असल्याचे बागूल यांनी स्पष्ट केले.