नाशिक – समाज माध्यमात आक्षेपार्ह संदेश टाकत भावना दुखावल्याच्या निषेधार्थ नांदगाव शहरासह तालुक्यातील जातेगाव, बोलठाण व न्यायडोंगरी येथे बंद पाळण्यात आला. याप्रकरणी नांदगाव पोलिसांत दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले असून दोन्ही गुन्ह्यात १६ संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून त्यातील आठ अल्पवयीनांना बाल सुधारगृहात पाठवण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दोन दिवसांपासून या घटनेने शहर व परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. राममंदिर सोहळ्यानंतर नांदगाव, जातेगाव, बोलठाण, न्यायडोंगरी येथे वेगवेगळे आक्षेपार्ह संदेश समाज माध्यमात टाकण्यात आले होते. यामुळे समाजातील सलोखा बिघडून तणाव निर्माण होण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतले. बुधवारी सर्वत्र बंद पाळण्यात आला. सकाळी ११ वाजता श्रीराम मंदिरापासून सकल हिंदू समाजाच्या वतीने पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्यात येवून समाजात दुही पसरविणाऱ्या संशयितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, उपविभागीय अधिकारी सोहेल शेख, पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी, नायब तहसीलदार कोनकर यांच्या उपस्थितीत शांतता समितीची बैठक होऊन संशयितांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर कारवाई केली जात असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाल्यानंतर वातावरण निवळले.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 16 suspects detained in case of offensive message in nandgaon taluka nashik amy